भारतमातेचा शूरवीर योद्धा महाराणा प्रताप

Maharana Pratap

भारतमातेचा शूर, पराक्रमी योद्धा ज्याच्या पराक्रमाचे पोवाडे आजही गायल्या जातात त्या महापराक्रमी महाराणा प्रताप यांची आज जयंती. महाराणा प्रताप हे राजस्थानमधील एक शूर आणि स्वाभिमानी राजे होते. शुक्ल तृतीया रविवार विक्रम संवत १५९७ तदानुसार ९ मे १५४० ला कुम्भलगढ़, राजस्थान येथे झाला. त्यांच्या पित्याचे नाव उदयसिंग तर आईचे नाव जयवंताबाई होते. लहानपणी ‘किका’ नावाने सुद्धा त्यांना ओळखले जायचे. उदयपुर, मेवाड़ च्या सिसोदिया राजवंशाचे थे राजा होते. त्यांच्या काळात मुघल सम्राट ‘अकबर’ याने आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते आणि अनेक राजपूत राजांनी त्याचे मांडलिकत्व स्वीकारले होते. परंतु ‘महाराणा प्रताप’ एकमेव असे राजा होते की त्यांनी आपल्या जीवनात कधीही ‘अकबर’ चे मांडलिकत्व स्वीकार केले नाही.

महाराणा प्रताप हे स्वाभिमान तथा धार्मिक आचरण यांसाठी ओळखल्या जायचे. त्यांनी सदैव मर्यादेचे पालन केले. लहानपणापासून सर्वसाधारण शिक्षा घेतल्या पेक्षा तलवारबाजी, भालाफेक याशिवाय शस्त्र बनवण्याची कला शिकण्यास त्यांचा कल होता. एकदा जयपूरचा राणा मानसिंग याने अकबरापासून आपल्या राज्याला धोका पोहोचू नये; म्हणून आपली बहीण देऊन त्याच्याशी सोयरीक केली होती. एकदा तो राजपुतान्यातून दिल्लीस जात असता वाटेत जाणूनबुजून आपल्या वैभवाचे प्रदर्शन करण्याकरता कुंभलगडावर असलेल्या राणा प्रताप यांच्या भेटीस गेला. राणा प्रताप यांनी त्याचा यथायोग्य आदरसत्कार केला; पण त्याच्या पंक्तीत बसून जेवण्यास नकार दिला. मानसिंगाने याचे कारण विचारता राणा प्रताप म्हणाले, “स्वत:च्या समशेरीच्या बळावर आपल्या राज्याचे रक्षण करण्याकरिता जे राजपूत आपल्या मुली-बहिणी मोगलांना देऊन त्यांच्यापासून राज्याचे रक्षण करतात, अशा स्वाभिमानशून्य राजपुतांच्या पंक्तीला मी बसत नाही.” याद्वारे आपल्याला समजू शकते की महाराणा प्रताप हे स्वतः च्या मातृभूमीसाठी किती तत्पर होते आणि त्यांचा स्वाभिमान आपल्याला यातून दिसून येतो. महाराणा प्रताप ज्या वंशात जन्मले होते त्या सिसोदिया वंशातील एकही शासकाने आपली कन्या मुघलास अथवा त्याचे मांडलिकत्व स्वीकारलेल्या राजास दिली नाही. अशा प्रकारच्या वैवाहिक संबंधास महाराणा प्रताप यांनी लगाम लावला होता अर्थात ते याच्या विरोधात होते.

महाराणा प्रताप हे राजा उदयसिंग यांचे थोरले पुत्र असतानाही मरते वेळी राजा उदयसिंग यांनी आपल्या छोट्या पुत्रास जग्माल यांस उत्तराधिकारी घोषित केले. परंतु तरीही आपल्या छोट्या भावासाठी त्यांनी आपल्या अधिकारास बगल दिली यावरून त्यांची त्यागवृत्ती दिसून येते. परंतु इतर लोक राजा उदयसिंग यांच्या या निर्णयाने खुश नव्हते. त्यामुळे सर्वांनी मिळून घेतलेल्या निर्णयाने व खुद्द प्रजेलाच त्या जागेवर महाराणा प्रताप यांना बसवायचे होते त्यामुळे जग्माल यांस ते सोडावे लागले. यांचा राग मानून जग्माल अकबरास जावून मिळाला आणि स्वत:च्या भावाविरोधात षड्यंत्र करू लागला होता.

महाराणा प्रताप यांच्या कारकिर्दीत महत्वाचे ठरलेले युद्ध म्हणजे ‘हल्दी घाटी’ चे युद्ध. 18 जून, 1576 साली अकबर आणि महाराणा प्रताप यांच्या मध्ये हे युद्ध झाले होते . उदयपुर ते नाथद्वारा दरम्यान असेल्या डोंगराळ प्रदेशात हे युद्ध झाले. या युद्धात महाराणा प्रताप यांनी पराक्रम गाजवला. या युद्धात महाराणा प्रताप यांच्या कडून लढणारे एकमेव योद्ध होते हकीम खान सूर. महाराणा प्रताप यांनी स्वतः या युद्धाचे नेतृत्व केले होते. तर मुघलांकडून मानसिंह तथा आसफ खाँ यांनी मोर्चा सांभाळला होता. या युद्धात महाराणा प्रताप यांच्या तलवारी व भाल्याने अनेक मुघलांचे प्राण घेतले त्वेषेने लढत महाराणा प्रताप मुघलांच्या सैन्यामध्ये घुसले होते आणि मानसिंह यांस शोधत होते परंतु तो नाही मिळाला पण अकबराचा पुत्र ‘सलीम’ मात्र महाराणा प्रताप यांच्या पुढ्यात आला. हत्तीवर बसलेला सलीम थोडक्यात महाराणा प्रताप यांची शिकार झाला नाही; नाही तर अकबरास आपला उत्तराधिकारी गमवावा लागला होता. महाराणा प्रताप चहुबाजूने मुघलांच्या वेढ्यात अडकले होते या वेळी झालासिंग यांनी आपल्या प्राणाचे बलिदान देऊन महाराणा प्रताप यांचे प्राण वाचवले होते. महाराणा प्रताप आपल्या तळपत्या तलवारीने वेढा कापून निसटून जाण्याचा प्रयत्न करू लागले. तेवढ्यात कुणा शत्रूसैनिकाने त्यांचा घोडा चेतक याच्या एका पायावर तीर सोडून त्याचा पाय निकामी केला. तशाही स्थितीत तो स्वामिनिष्ठ घोडा चौखूर दौडत पाठीवरच्या धन्याला घेऊन त्या वेढ्याचा भेद करून दूर दूर जाऊ लागला. तेवढ्यात वाटेत एक ओढा लागला. चेतकने उडी घेऊन तो ओढा पार केला आणि ऊर फुटेपर्यंत धावल्यामुळे त्याने त्याच क्षणी प्राण सोडला. चेतक च्या जाण्याने त्यांना अपार दुख झाले होते.

महाराणा प्रताप यांनी आपल्या जीवनात असे कार्य केले होते की लोक त्यांच्यावर जीवापाड प्रेम करीत होते. त्यांच्या घोड्याने सुद्धा तेवढाच आपल्या मालकास जीव लावला होता. अशा या पराक्रमी वीरपुत्राचे 29 जनवरी 1957 ला राजधानी चावंड येथे आजारपणाने निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता ऐकून त्यांचा कट्टर दुश्मन व क्रूर सम्राट अकबर सुद्धा हळहळला त्याच्या पण डोळ्यातून अश्रू आले. अश्या या भारतमातेच्या वीरपुत्रास एम एच २८ तर्फे त्रिवार अभिवादन.