ऑनलाईन पैसा मिळवा फोटोग्राफीमधून

jobs in buldana

आजच्या युगात नोकरी, रोजगारासाठी अनेक जण धडपडत असतात. आपलं शिक्षण पूर्ण करून स्वतः च्या पायावर उभं राहण्यासाठी अनेक जण छोटे मोठे उद्योग करीत असतात तर काही नोकरी करतात. ज्यांना स्वतः चा व्यवसाय करायचा आहे अशांसाठी सरकार सुद्धा काही योजना राबवित असते. प्रत्येक वेळेस व्यवसायासाठी जागा आणि भांडवल असलंच पाहिजेत असं नाही. आज तुम्हाला याबद्दल काही सांगणार आहोत.

सध्या लग्नकार्याचे दिवस सुरु झालेत. सर्वत्र धामधुम दिसून येत आहे. ज्यांच्याकडे लग्नकार्य आहे त्यांच्याकडे आणि त्यांना सेवा पुरविणाऱ्यांना सुद्धा सवड मिळत नाही. या लग्नकार्यात सर्वांचा आवडता विषय आणि माणूस म्हणजे- फोटोग्राफर! तसे आपण नेहमीच फोटो काढत असतो परंतु आयुष्यातील ह्या मौल्यवान क्षणाला बंदिस्त करण्यासाठी आपण कुठलीही कसर सोडत नाही. आपल्यापैकी अनेक जण फोटोग्राफर असतील. शहरातील व खेड्यातील. आपल्या व्यवसायाला सांभाळून किंवा जे छंद म्हणून फोटोग्राफी करतात असे लोक घरबसल्या पैसे कमवू शकतात. ते कसे हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच !

तुम्ही उत्तम फोटोग्राफर असाल, कॅमेरा अँगल, लाईट इ. चे ज्ञान असेल तर तुम्ही स्वतःचा ‘पोर्टफोलिओ’ बनवू शकता आणि त्याचे प्रमोशन करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकता. सध्याच्या ट्रेंडप्रमाणे “प्रिवेड फोटोशूट’ ला मागणी आहे. यामध्ये तुम्ही तुमचं कसब पणाला लावून आपलं नाव करून घेऊ शकता. याशिवाय तुमच्या कडे कम्प्युटर, इंटरनेट असेल आणि ‘फोटोशॉप’ च चांगलं ज्ञान असेल तर फोटो एडिटिंग करून ऑनलाईन काम घेऊ शकता अथवा तुम्ही काढलेले उत्तम फोटो इंटरनेट वर असलेल्या अनेक वेबसाईट वर विकू शकता. अनेक वेबसाईट आहेत ज्या ऑनलाईन फोटो सेल करतात.

जाहिरातीसाठी, प्रेझेन्टेशन, वेबसाईट, ब्रॅण्डिंग इ. ठिकाणी फोटो ची मागणी असते. त्यानुसार तुम्ही काढलेले फोटो सेल करू शकता. ‘इमेजबझार’ नावाची भारतीय वेबसाईट आहे जी भारतातील अनेक कंपन्याला फोटो पुरवीत असते. यासारख्या इतर वेबसाईट आहेत जिथे तुम्ही आपलं अकाउंट ओपन करून ऑनलाईन फोटोविक्री चालू करू शकता. जर तुम्हाला स्वतः ची वेबसाईट बनवून हा व्यवसाय चालू करायचा असेल तर वेबसाईट बनवून सुद्धा फोटो सेल करू शकता.

काही जणांना आऊटडुअर फोटोग्राफीचा छंद असतो. त्यांच्यासाठी सुद्धा आपला छंद जोपासत आपलं नाव आणि पैसे कमावण्याची अनेक दार इंटरनेट द्वारे उघडी आहेत. हे सर्व करण्यासाठी तुम्हाला इंटरनेटचं ज्ञान मात्र आवश्यक आहे. चला मग विचार कसला करतांय उचला कॅमेरा आणि करा ‘क्लिक.. क्लिक..क्लिक’