डाॅ. अंभोरे यांचे सामाजिक कार्य दिशादर्शकः प्रा. विजय जोशी

एकीकडे स्वतःपुरता विचार करण्याची प्रवृत्ती वाढत असताना दुसरीकडे वंचितांसाठी सामाजिक भावनेतून कार्य करणारे डाॅ. प्रकाश अंभोरे यांच्या सारखे व्यक्तीमत्व समाजासाठी दीपस्तंभाप्रमाणे दिशादर्शक ठरत आहेत, असे मत प्रा. विजय जोशी यांनी व्यक्त केले.  येथील क्रीडा संकुल नजीकच्या नंदनवन आश्रमातील अनाथ व विद्यार्थ्यांसोबत १३ मार्च रोजी साई दातांचा दवाखान्याचे संचालक डाॅ. प्रकाश अंभोरे यांनी आपला वाढदिवस साजरा करतांना या विद्यार्थ्यांसोबत रंगपंचमी साजरी करून त्यांना अपूर्व आनंदाची अनुभूती दिली.
यावेळी नंदनवनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रबोधन विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक प्रा. विजय जोशी बोलत होते. श्री. साई दातांच्या दवाखान्याचे संचालक तथा सुप्रसिद्ध दंतशल्य चिकित्सक डाॅ. प्रकाश अंभोरे हे दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवून आपला वाढदिवस साजरा करतात. यंदा वाढदिवसालाच  रंगपंचमीचा सण आल्याने डाॅ. अंभोरे यांनी येथील क्रीडा संकुल नजीकच्या नंदनवन अनाथ आश्रमाला भेट देवून तेथील अनाथ व विद्यार्थांची दंततपासणी केली. त्यांना औषधीचे वाटप करून सर्व मुलांना रंग व पिचकारीचे वाटप केले. या मुलांसोबत उपस्थितांनी उत्साहात रंगपंचमी साजरी केली. कौटुंबिक वातावरणात येथील मुलांनी सणाचा अपूर्व आनंद लुटला. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना मिठाई व फराळाचे वाटप करण्यात आले. नंदनवनच्या मुलांसोबतच डाॅ. अंभोरे यांनी वाढदिवसाचा केक कापला. अनपेक्षितपणे सर्व घडल्याने येथील  मुलांच्या जीवनात डाॅ. अंभोरेंचा वाढदिवस आनंदाचे रंग घेवून आला. नाचगाणी, मिठाई, होळीचे रंग, भेटवस्तू व  मायेची उब यामुळे नंदनवन हरखून गेले होते. ४० वर्षाच्या आयुष्यात पहिल्यांदाच होळीचा खरा आनंद घेता आला, अशी भावना डाॅ. प्रकाश अंभोरे यांनी यावेळी व्यक्त केले.