एसटी प्रवासभाड्यात १८ टक्के वाढ होणार !

fare hike in MSRTC

सातत्याने वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे अखेर एसटी महामंडळाने सुद्धा आपल्या प्रवास भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एकंदरीत ३० वाढ होणार हे अपेक्षित होते परंतु प्रवाशांना लक्षात घेता फक्त १८ टक्के होणार आहे. यापुढे पाच रुपये पटीने ही दरवाढ होणार आहे.

मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेल च्या किमतीत सातत्याने दरवाढ होत आहे. कच्च्या तेलाची किंमत वाढल्याने ही दरवाढ होत आहे. त्यातच ह्या दरवाढीने नागरीक सुद्धा त्रस्त झाला आहे. अशातच अखेर एसटी महामंडळाने इंधन दरवाढ आणि एसटी कामगारांची नुकतीच करण्यात आलेली वेतनवाढ यामुळे प्रवास भाड्यात दरवाढ केली आहे. ही भाडेवाढ ३० टक्के होणार होती परंतु प्रवाशांचा विचार करता १८ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापुढे पाच रुपये पटीने प्रवास भाडे वाढणार आहे. उदा . -म्हणजे एखाद्या प्रवासाचे तिकीट ७ रुपये असेल तर त्याऐवजी ५ रुपये आकारले जातील. तसेच ८ रुपये तिकीट असल्यास १० रुपये तिकीटदर आकारला जाईल. सुट्ट्या पैशांसाठी प्रवासी आणि वाहकांदरम्यान नेहमी वादावादी होते. या निर्णयामुळे सुट्ट्या पैशांचा प्रश्न सुटणार असून ही वादावादी थांबेल, असे एसटी महामंडळाने कळविले आहे. एसटी महामंडळावर मोठा आर्थिक बोजा पडला आहे. त्यामुळे नाईलाजास्तव दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे असे राज्य परिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणाले. यावेळी राज्य शासनाने डिझेलवरील विविध कर माफ करावेत अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं दिवाकर रावते यांनी स्पष्ट केलं आहे. या मागणीला मुख्यमंत्र्यांसह वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ही मागणी मान्य झाल्यास तिकीट दरवाढीचा फेरविचार करण्यात येईल, असे संकेत दिवाकर रावते यांनी दिले आहेत.