मकर संक्रांत

सूर्य ज्या दिवशी दक्षिणायनातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो त्या तिथीला मकरसंक्रांत साजरी केली जाते. या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. पृथ्वी वरुन पाहिले असता,सुर्याच्या उगविण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते. मकरसंक्रांत तशी तीन दिवस साजरी केल्या जाते भोगी,संक्रांती,किंक्रांती. स्त्रियांसाठी महत्वाचा उत्सवाचा दिवस.

भोगी:-
संक्रांतीच्या आधीच्या दिवशी म्हणजे आज भोगी आहे. भोगीच्या दिवशी रोज पेक्षा थोडे वेगळे पदार्थ करण्याची पध्दत आहे. मुगाची डाळ व तांदूळ घालून केलेली खिचडी, बाजरीची किंवा ज्वारीची तीळ लावून केलेली भाकरी व लोणी, व दोन तीन भाज्या एकत्र करून भाजी बनवल्या जाते. प्रत्येकाचे श्रद्धास्थान व सूर्यनारायणाची पूजा करून नैवेद्य दाखवितात. या दिवशी घरातील सर्व स्त्रिया डोक्यावरून पाणी घेतात अर्थात केस धुतात.
भोगी देणे- भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ करून सुवासिनीला जेवावयास बोलावतात. तसे शक्य नसल्यास वरील पदार्थांचा शिधा तिच्या घरी पोहोचता केला जातो. यालाच भोगी देणे म्हणतात.
संक्रांत:-
सूर्य एका राशीतून दुस-या राशीत जाणे यालाच ‘संक्रमण’ म्हणतात. मकर राशीमध्ये सूर्य जाणे यालाच ‘मकर संक्रमण’ असे म्हणतात.
हा सण पौष महिन्यात येतो. यावेळी सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते. दिवस हळू हळू मोठा होऊ लागतो.
संक्रांतीस घरातील सर्व लवकर उठून अंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून आंघोळ करतात.घरातील स्त्रियांची सकाळ पासूनच लगबग सुरु होते. प्रत्येक घरातील स्त्री तिच्या नवऱ्या जवळ हट्ट करते कि मला यावेळी एवढ्याची साडी पाहिजेत, अशी साडी तशी साडी आणि तिचा हट्ट ती पूर्ण करतेच. घराची साफ-सफाई करणे. घराचा पूर्ण परिसर स्वच्छ करतात.अंगणात सडा टाकतात, त्यावर दारात सुशोभीत रांगोळी काढल्या जाते, नित्य नियमाने तुळशीची पूजा करणे,देवपूजा करणे हे त्यांचे नित्याचेच. शेजारी-पाजारी तिळगुळ वाटल्या जातो.. ‘तिळगुळ घ्या आणि गोड बोला’ असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याची शुभकामना दिल्या जातात जुनी भांडणे-वैरे विसरून, पुन्हा स्नेहाचे, सलोख्याचे संबंध निर्माण करण्यासाठी ही मोठीच संधी असते. आणि स्त्रियांची प्रतीक्षा सुरु होते दुपारच्या हळदी कुंकवाची. छान तयारी करून नवऱ्याने घेऊन दिलेली साडी नेसून,झक-पक तयारी करून, गंध,टिकली,पावडर लावून, वेणी-फणी करून केसांत गजरा गुंफून तयार होते. जसे एक सात्विकतेचे वातावरणच निर्माण होते…. उत्साहित होऊन हळदी कुंकवाची तयारी जोमात सुरु होते, तशी आपली संस्कृती ही कृषी संस्कृती असल्याने या दिवसांमध्ये शेतात आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण अगोदरच्या दिवशीच वाणाच्या सर्व वस्तू आणून सुरीने कापून छोटे छोटे तुकडे करून ठेवल्या जातात. कारण त्यांचे म्हणणे आहे कि संक्रांतीच्या दिवशी काही चिरू येत नाही. तीळ गूळ वाटून विवाहित स्त्रिया या दिवशी हळदी-कुंकू करतात. एकमेकींच्या घरी जातात, एकत्र येऊन प्रत्येकीला वाण वाटतात. वाणा मध्ये प्रामुख्याने हरभरे,वाटाणे,गाजर,बिब्याची फुले,ऊस,गहू,बोर,तीळ, आणि एखादी विशेष वस्तू प्रामुख्याने असतेच जसे कुंकाचा करंडा, टिकल्यांचे पाकीट याप्रकारे, अश्या कित्येक वस्तू एकत्रित करून सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात. आणि एकमेकींना वाटल्या जातात. आणि उखाणे घेण्यात येतात प्रत्येक स्त्री आपल्या ‘प्राणप्रिय नवऱ्याचे’ लयबद्ध पद्धतीने नाव घेते.
उदा. इंग्रजी भाषेत चंद्राला म्हणतात ‘मुन’…….. रावांचे नाव घेते. मी आहे……….घराण्याची ‘सून’ अशे यमक जुळवून नाव घेतल्या जाते.

जणू हि प्रथाच आहे. यादिवशी सर्वत्र पतंग उडवण्याची प्रथा आहे सर्व मुले लगबगीने सकाळ पासूनच पतंग उडवण्याचे काम अगदी नचुकता करतात. भूक लागली म्हणजे तीळ-गुळाचा लाडू खायचा तसा तो आईच्या हातचा प्रेमाने बनवलेला लाडू चवीला खूपच छान लागतो त्यामध्ये गुळाची मिठास तर असतेच पण आईची ममता पण त्या गुळासोबत असतेच. आणि संध्याकाळी घरचे सर्व एकत्र येऊन गुळाची पुरण पोळी आणि लोणी लावून यथेच्छ भोजन करतात. .याच दिवसात एक वर्षा पर्यंतच्या लहान मुलांची लूट केली जाते अर्थात लहान मुलाला चौरंगावर किंवा पाटावर बसवून त्याच्या वयाची व थोडी मोठी बालगोपाल यांना घरी बोलवून मुलांची हौस म्हणून मुरमुरे,गोळ्या,चॉकलेट,बत्तासे,बोर,रेवड्या,अश्या विविध गोष्टी त्याच्या अंगावर टाकल्या जातात त्यावर जणू खाऊचा वर्षाव होतो. आस-पासची सर्व मुले तिथे उपस्थित राहून खाऊ गोळा करतात व त्यांचा आनंदोत्सव साजरा होतो.
तसे थंडीच्या दिवसात उष्ण अशा तीळ आणि गुळाचे सेवन करणे आरोग्याला हितकारक मानले जाते. शरीराला जास्त उष्मांक देणारे तीळ व गूळ या पदार्थांना या दिवशी फार महत्त्व असते. कारण दिवस थंडीचे असल्यामुळे प्रत्येकाला उब हवी असतेच

आपणा सर्वांना मकरसंक्रांतीच्या एमएच २८. इन परिवारा तर्फे खूप खूप हार्दिक शुभेच्छा…….. तीळ गूळ घ्या व गोड गोड बोला…….