शेतीतील उपयोगी अवजारे…

आपल्या कृषीप्रधान देशात शेती म्हणजे काय असे क्वचितच कुणी म्हणेल. कारण सर्वांना शेती माहित आहे पण शेतीची पूर्ण माहिती आहे का असे विचारल्यास कित्येकांकडून नाही असे उत्तर प्राप्त होईल कारण शालेय अभ्यासक्रमातच आपण वरचे वर शेतीची तोंडओळख केलेली असते पण वास्तविकतेत शेती मध्ये काम कसे केले जाते त्यासाठी कुठली अवजारे वापरली जातात त्यांचे उपयोग काय हे सांगणे थोडे कठीणच आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी आपण आज बघणार आहोत शेतीसाठी आवश्यक असणारी अवजारे जी कधी ऐकण्यात सुद्धा आलेली नसतील किंवा परिचयाची असतील.

खुरपे : हे लोखंडी पात्यांचे अर्धचंद्रकार असते. याची मूठ लाकडाची असते. गवत काढणी, खुरपणी या करता हे अवजार उपयुक्त ठरते. याचा उपयोग फक्त शेतातच होतो असा नाही आपल्या परसबागेत सुद्धा आपण याचा वापर करू शकतो.

मोठे खुरपे : उंच वाढलेले गवत, धान्य व भाजीपाला कापण्यासाठी मोठ्या खुरपाचा वापर हा केला जातो.

सिंकी : म्हणजे खुरपे लावलेला लाकडी दांडा होय. झाडाच्या उंच शेंडयावरील फांद्या काढण्यासाठी या खुरपे लावलेल्या दांड्याचा वापर केला जातो.

खुरपी : ही खुरपी अॅल्युमिनिअम अथवा लोखंडाची असून अनेक आकारात बाजारात उपलब्ध आहे. टोपल्यात माती भरण्यासाठी व माती काढण्यासाठी याचा वापर केला जातो.

कोयता : हा लोखंडी व जाड असतो, एका बाजूला धार असते व याला लाकडाची मूठ असते. झाडाच्या मोठ्या फाद्या तोडण्यासाठी याचा वापर केला जातो.

कुऱ्हाड : झाडाच्या मोठ्या फाद्या तोडण्यासाठी व लाकडे तोडण्यासाठी याचा वापर केला जातो.

कुदळ : मुरमाड व कठीण जमीन खोदण्यासाठी कुदळीचा वापर हा केला जातो.

फावडे : जमीन उकरण्यासाठी, माती उचलण्यासाठी, माती समांतर करण्यासाठी फावड्याचा वापर हा केला जातो.

नांगर : हे लाकडी किंवा लोखंडी असतात.काही नांगर लाकडाचे असून त्यास खाली लोखंडी फाळ लावण्यात येतो. नांगर म्हणजे शेतात नांगरणी साठी वापरण्यात येणारे उपकरण. बैलांच्या साहाय्याने हे चालविले जाते. याचा उपयोग सरी तयार करण्यासाठीही केला जातो. याद्वारे जमीन नीट उकरल्या जाते.

गोफण : शेतीतील धान्य पक्षांनी, प्राण्यांनी खाउ नये म्हणुन त्यांना दगड मारुन पळविण्यासाठी वापरण्यात येणारे एक मानवचलीत उपकरण आहे. हे गोफासारखे विणलेले असते. याच्या दोन दोऱ्यांच्या मध्ये असलेल्या विशिष्ट जागेत दगड ठेवल्या जातो. त्यानंतर गोफण हातात धरुन वेगाने स्वतःचे डोक्याभोवती चक्राकार आणि जमिनीस समांतर अशी फिरविल्या जाते.आवश्यक वेग आल्यावर मग त्यातील एक दोरी सोडल्या जाते. त्यामुळे दगड वेगाने सुटतो आणि नियोजित जागी जाऊन पक्षी,प्राणी यांना पिकाची नासाडी करण्यापासून दूर ठेवण्यास मदत करतो.

डवरा : म्हणजे शेतात डवरणीसाठी वापरण्यात येणारे अवजार आहे. जे बैलांच्या साहाय्याने चालविले जाते.

तिफण : शेतीसाठी वापरण्यात येणारे एक अवजार आहे. याचा वापर पेरणी करण्यासाठी केला जातो.

अ‍ऊत : औत असेही म्हणतात. हे लाकडाचे असते, ज्याला समोर ओढण्यासाठी एक किंवा दोन बैल जोडायला आडवी काठी असते, आणि मागे लोखंडी टोक असते. अ‍ऊताच्या खालच्या भागाला फाळ असे म्हणतात. फाळ जमीन उकरते व जमीन नांगरली जाते.

कुळव : शेतजमीन नांगरल्यानंतर निघालेली ढेकळे फोडून तणकटे मोकळी करणे, जेणेकरून ती वेचून जमीन स्वच्छ करता येईल आणि माती भुसभूशीत करण्यासाठी कुळवाचा वापर केला जातो.

हँडपंप : या पंपाची बॉडी व इतर पार्टस पितळ या धातूचे बनलेले असतात. यास कीटकनाशक फवारणीचा पंप देखील म्हणतात. रोपांकर पडलेलीली कीड, किडे व पतंग नष्ट करण्यासाठी हँडपंप चा वापर केला जातो.

कटर : हा कटर कात्रीसारखा दोन पात्यांचा असतो. गवत कापण्यासाठी या अवजाराचा वापर केला जातो.