सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि अनेक शहरात उन्हाचा पार खूप चढलेला असतो. अनेक जण दुपारी घराबाहेर जाणे शक्यतो टाळतात. परंतु लग्नसराई आणि इतर कामानिमित्त बाहेर जाणे आलेच. मग स्कार्फ, रुमाल, टोप्या यांचा वापर करतांना अनेक जण दिसून येतात. ज्या व्यक्तींची त्वचा तेलकट त्यांना तेलकट त्वचेची उन्हाळ्यात जास्त काळजी घ्यावी लागते, त्यावर एक सोपा उपाय म्हणजे दिवसातून दोनवेळा बर्फ चेहर्यावरून फिरवावा, तसेच निदान चार पाच वेळा तरी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावा. उन्हामुळे त्वचा काळवंडली(टॅन) असेल तर बटाटय़ाचा रस चेहर्यावर लावावा, चेहर्याची त्वचा उजळते कारण बटाटा हा नैसर्गिक ब्लिचिंग एजंट आहे.
नेहमीसाठी एक घरगुती आणि चांगला फेसपॅक म्हणजे चार चमचे काकडीच्या रसात, चार ते पाच थेंब लिंबाचा रस मिसळावा व बेससाठी आवश्यक एवढी मुलतानी माती ह्या मिश्रणात घालावी. हा पॅक चेहर्यावर साधारण १५-२० मिनिटे ठेवून चेहरा धुवावा. चेहर्याची त्वचा मऊ आणि चमक्दार होते.
तसेच चंदन, बदाम आणि आंबेहळद दुधात उगाळून चेहर्यावर लावल्यास चेहरा तजेलदार व उजळ होतो. पण आंबेहळदीचे प्रमाण ह्या लेपात बरेच कमी असावे.
१) आपली त्वचेत अनेक सुक्ष्म रंध्रे ( छिद्रे) असतात. तुमची त्वचा जितकी स्वच्छ, मोकळी असेल clean असेल तेवढे त्वचेचे आरोग्य उत्तम. स्त्रियांनी उन्हाळ्यात शक्यतो गडद मेक-अप करणे टाळावे. मेक-अपमुळे त्वचेची रंध्रे ही बंद होत असल्याने त्वचेला एक विचित्र कोरडेपणा येतो. दिर्घकाळ रंध्रे बंद राहीली तर, एखाद्या बंदिस्त खोलीप्रमाणे त्वचेचीही घुसमट होते, व पोत बिघडायला सुरुवात होते. मेक-अप केल्यानंतर, फंक्शनहुन परतल्यावर आळस टाळुन तो आठवणीने काढायला हवा. क्लिन्झर्स लावुन मेक-अप काढुन त्वचा स्वच्छ धुवुन मग साधे मॉईश्चरायझर लावुन ठेवा
२) दिवसातुन किमान चार वेळा थंड पाण्याने अलगदपणे चेहरा-मानेच्या त्वचेवर हबकारे मारल्याने त्वचा टवटवीत होते, त्यानंतर मऊ कापडाने किंवा टॉवेलने ती हलकेच टिपुन घ्यावी, खसाखसा चोळु नये.
३) आठवड्यातुन एकदा तासभर वेळ काढुन वस्त्रगाळ चंदन पावडर २ चमचे, गुलाबपाणी ३ चमचे आणि चमचाभर मुलतानी मिट्टी यांचे एकत्र मिश्रण करुन त्याने फेशिअल घरच्या घरी केलंत तरी त्वचेचा पोत सुधारुन चेहरा फ्रेश होतो. पंधरा दिवसांतुन एकदा तरी उत्तम मसाज क्रिम आणुन त्वचेला घरच्या घरी व्यवस्थितपणे मसाज करणे खुपच चांगले. मसाजमुळे त्वचेखालचे रक्तसंचालन उत्तम रहाते. मसाज हलक्या हाताने गोलाकार ( circular clockwise) करावा
४) कडक उन्हाचे त्वचेवरील दुष्परिणाम टाळण्यासाठीचा रामबाण उपाय म्हणजे फक्त पिकलेल्या टॉमेटोचा गर काढुन त्याने संपुर्ण चेहरा, मान, हात यावर एक हलकासा थर देऊन पंधरा मिनिटांनी तो स्वच्छ धुवुन टाकला तरी त्वचेचे रापणे ( टॅनिंग) कमी होते
५) उन्हाळ्यात जंकफुड, मसालेदार पदार्थ, मद्यपान टाळणे. मांसाहार करत असाल तर तो अगदी माफक प्रमाणात करणे, आहारात अधिकाधिक द्रवपदार्थांचा समावेश केल्यानेही खुप फरक पडतो. उन्हाळ्यात दुधी, पालक, कोबी, टॉमेटो यांचे सेवन हितकर असुन. द्रवपदार्थांत ताक, लिंबुपाणी, पन्हे, कोकम सरबत, आवळा सरबत अशा क्षुधानाशक द्रव्यांचे सेवन हे त्वचेबरोबर आरोग्यासही अत्यंत लाभदायक आहे.
६) शक्य असेल तर दुपारी १२ ते ४ यावेळात घराबाहेर पडणेच टाळावे. दुपारचा आहार माफक असावा (सध्या आंब्यांचा सिझन असल्याने ते शक्य नाही पण तरीही आहारावर किंचित मर्यादा असु देणे) उन्हाळ्यत नैसर्गिक रित्याच पचनयंत्रणा मंद होत असल्याने जडान्न, अतीगोड पदार्थ, मिठाया, मटनासारखे जड अन्न यांच अतिरेक टाळावा. कोल्ड्रिंगने तुमच्या त्वचेवर विपरित परिणाम होतो. त्यात कार्बनडायॉस्काईडचे प्रमाण जास्त असल्याने जठरातील पचनास आवश्यक असणारा प्राणवायु कमी होतो व एकंदरीतच यकृत, आतडे यांची कार्यक्षमता मंदावते. प्रत्येक शीतपेयात साखरेचे प्रमाण अवास्तव असल्याने त्याचा इतर अवयवांवरही परिणाम होतो
७) सध्या सनस्क्रिन किंवा सनब्लोक क्रिम चांगली उपलब्ध आहेत त्यातील ज्यांचा SPF (Sun protection factor) किमान १५ आहे अशी क्रिम्स वापरणे केव्हाही उत्तम.
८) परमेश्वराने किंवा निसर्गाने प्रत्येकाला एक छान त्वचा दिलेली आहे. तिची काळजी घेणे. ऋतुंनुसार तिच्या आरोग्यास जपणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, तरच तुम्ही दीर्घकाळपर्यंत तरुण दिसु शकता. उत्तम त्वचेच्या व्याखेत रंग हा मुद्दा सर्वस्वी नसुन त्वचेचा दर्जा, चकचकीतपणा, स्वच्छता, पोत हे घटकही आंतर्भुत आहेत, त्यांची जपणुक प्रत्येकाने मनापासुन करावी.