भीमा कोरेगाव इथं विजय स्तंभास अभिवादन करताना घडलेल्या घटनेचे पडसाद आज औरंगाबाद येथे सुद्धा पाहावयास मिळाले. औरंगाबाद शहरातील मुख्य क्रांती चौक भागासह अनेक ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. तसेच औरंगाबाद शहरातील उस्मानपुरा, टीव्ही सेंटर भागात काही काळ तणाव निर्माण झाला होता. शहरात संचारबंदी लागू झाल्याही अफवा सुद्धा पसरली होती. परंतु तसे काही झाले नाही.
औरंगाबाद शहरातील सर्व मुख्य चौकात आणि ठिकठिकाणी पोलिसांचा पहारा असून सर्व परिस्थितीवर आयुक्त यशस्वी यादव नजर ठेवून आहेत. परिस्थिती आटोक्यात ठेवण्यासाठी आणि कुठलेही अनुचित कार्य न घडण्यासाठी राज्य राखीव दलाची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे.
भीमा कोरेगाव येथे दलित संघटनांतर्फे १ जानेवारी हा शौर्य दिनम्हणून साजरा केला जात आहे. त्यासाठी भीमा कोरेगावात हजारो लोक जमले होते. . १ जानेवारी १८१८ला पुण्याजवळ भीमा कोरेगावात झालेल्या ऐतिहासिक लढाईत महार सैनिकांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या इंग्रजांनी पेशव्यांचा पराभव केला होता. या घटनेला आज २०० वर्ष पूर्ण झाल्याने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रम दरम्यान काही समाजकंटकांनी आज गाड्यांवर दगडफेक केली. रस्त्यावर टायरही जाळण्यात आले. त्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. या घटनेचे पडसाद आज औरंगाबाद मध्ये सुद्धा पहावयास मिळाले.
थोडा तणाव उस्मानपुरा, टीव्ही सेंटर भागात निर्माण झाला होता परंतु पोलिसांनी परिस्थिती तांबडतोड नियंत्रणात आणली. दरम्यान शहरातील अनेक दुकाने संध्याकाळपासूनबंद होती तर क्लासेस आणि ऑफिस ला लवकर सुटी देण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त दिसून येत होता.