जळगाव जा. येथे एसटी बस- कंटेनर अपघात

ST bus accident in buldana

आज दुपारी एसटी महामंडळाची बस जळगाव जामोद येथून बुलडाणा येथे प्रवासी घेऊन येत होती. दरम्यान येरळी येथे येताच पूर्णा नदीच्या पुलावर समोरून येणाऱ्या भरधाव कंटेनरने बसला दिली. यामध्ये कंटेनर चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर इतर जखमी असण्याची शक्यता आहे.

नेहमीप्रमाणे आज दुपारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस जळगाव जामोद येथून बुलडाणा येथे निघाली होती. येरळीतील पूर्णा नदीच्या पुलावरून बस जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरने बसला जोरदार धडक दिली. दुपारी एकच्या सुमारास हा अपघात झाला. नदीवरील पूल अरुंद असल्याने भरधाव कंटेनर बसला धडक देवून थेट नदीपात्रात कोसळला. उंचावरून कोसळल्याने कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला तर इतर जखमी असण्याची शक्यता आहे. कंटेनरने धडक दिल्याने बसचा मागील भाग पुलाखाली गेला. परंतु पुलावरील दगडांमुळे बस पुलाखाली कोसळली नाही आणि सुदैवाने जीवीतहानी टळली. बसमध्ये ५५ प्रवाशी प्रवास करीत होते. कुणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. या अपघातामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक विस्कळीत झाली होती. तर घटनास्थळी पोलीस आणि नागरिकांच्या वतीने बस पुलावरून काढण्याचे सुरु होते.

जळगाव वर नजर ‘तिसऱ्या डोळ्याची’

jalgon jamod cctv

आता जळगाव जा. शहरावर नजर असणार आहे ‘तिसऱ्या डोळ्याची’. दिवस असो वा रात्र संपूर्ण शहर नजरेखाली असणार आहे. त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न कायमचा निकाली काढण्याच्या दृष्टीने एक पाऊल उचलले आहे. आ. संजय कुटे यांनी केलेल्या संकल्पनेनुसार जळगाव जा. ची स्मार्टसिटी कडे वाटचाल सुरु झाली आहे. आज जळगाव जामोद येथे सर्वत्र नाईट व्हिजन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. त्यामुळे आता शहरात होणाऱ्या अनेक अवैध धंद्यास, चोरी, छेडखानी यासारख्या प्रकारास आळा बसणार आहे.

येथील बस स्थानक चौक, न्यूईरा हायस्कुल, दुर्गा चौक, के के कॉलेज, मानाजी चौक, डॉ. दलाल हॉस्पिटल परिसर, सुनगाव वेस, जगदंबा मंदिर, सुलतानपूरा, खेर्डा वेस, भाजी बाजार, आंबेडकर पुतळा, चावडी इ. ठिकाणी नाईट व्हिजन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. यामुळे शहरातील शांतता भंग करणाऱ्या गुन्हेगारास वचक बसणार आहे. शहरातील शांतता आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पोलिसांना सहाय्य्य होणार असून शहरात वाढत असलेल्या चोरी, चिडीमारी, गुंडागर्दी सारख्या घटना कॅमेऱ्यात कैद होणार आहे. हे कॅमेरे थेट पोलीस स्टेशन ला जोडले असल्याने सर्व हालचाली स्टेशनातून टिपल्या जाणार आहे. बुलडाणा जिल्ह्यात सर्वप्रथम जळगाव जा. ला हा दर्जा मिळणार आहे. शहरवासी या कामाने आनंदित झाले असून नगर परिषदेचे कौतुक होताना दिसून येत आहे.