गौराई माझी

सोनियाच्या पावलांनी,
गवर माझी आली.
बसण्यासाठी तिला जागा,
सुशोभित केली.

सडा रांगोळीने अंगणे,
न्हाऊन निघाली.
हळदी – कुंकवांनी ठसे,
पाऊले उभारली.

साज श्रुंगार पाहुन तिचा,
अंगे शहारली.
धुप, दिप, पुष्प – सुवासांनी,
घरे – दारे बहरली.

लाडु, चिवडा, करंज्यांनी,
ताटे भरलेली.
पहिल्या दिवशी भाजी भाकरीची,
न्याहारी त्यांनी केली.

दुसऱ्या दिवशी गौरीला,
पंच पक्वान्न वाहिली.
आंबील – कथलीच्या प्रसादाने,
शोभा ताटांची वाढवली.

तिसऱ्या दिवशी माय,
रूप गौरीचं पडलेलं.
असे वाटे नेत्र जणू,
अश्रूंनी ढळलेलं.

अडीच दिवसांचे माहेर,
मला असं घडलेलं.
पुढच्या वर्षी येईल पुन्हा,
आता माहेर मी सोडलेलं.

सौ. अनिता भागवत येवले (बुलढाणा)