श्री मॉं नवदुर्गा यज्ञ व पुनः प्राणप्रतिष्ठा उत्सव

दुर्गामाता उत्सव

कारंजा चौक, दुर्गामाता उत्सव समिती, बुलडाणा अंतर्गत श्री मॉं नवदुर्गा यज्ञ व पुनः प्राणप्रतिष्ठा उत्सवाचे बुलडाण्यात आयोजन करण्यात आलेले आहे. हा उत्सव ३ दिवस म्हमजेच दिनांक २९ डिसेंबर ते ३१ डिसेंबर पर्यंत ठेवण्यात आलेला आहे. कारंजा चौक, दुर्गामाता उत्सव समितीने सर्व भाविक-भक्तांना सहभागी होण्याचे आमंत्रण दिलेले आहे तरी सर्व बुलडाणा वासियांनी या ३ दिवसीय उत्सवामध्ये सहभागी व्हावे.

दिनांक २९ डिसेंबर २०१८ शनिवार रोजी, मार्गशीष वद्य, सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत.
दशविध स्नान,
पुण्याहवचन,
प्रायश्चितत होम,
मातृकापुजन,
मंडप प्रवेश,
नंदश्रध्दांत कर्म,
गणपती पुजन.

दुपारी २ ते ५ पर्यंत
देवतस जालाधीवास नंतर वास्तू मंडल,
योगीनी मंडल, क्षेत्रपाल मंडल,
मुख्य मंडल स्थापन सप्तशती पाठ.

दिनांक २९ डिसेंबर २०१८ शनिवार रोजी दर्शन सोहळा सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत.

महाआरती दररोज सायंकाळी ७ वाजता.

टिप – दिनांक २९ डिसेंबर शनिवार रोजी पारंपरिक वेषात लाल साडी परिधान करून सहभागी व्हावे.

विनीत तथा आयोजक
कारंजा चौक, दुर्गामाता उत्सव समिती, बुलडाणा
ज्या भक्तांना यज्ञ विधी, महाआरती व महाप्रसादाकरिता दान द्यावयाचे असेल त्यांनी मंदिर समितीशी संपर्क करावा.
मो. नं. ९४२२१८११५९, ९४२१३९३८८७, ९८३२३६४५५०

बुलडाणा येथे जावेद हबीब सलूनचे शुभारंभ

THE JAWED HABIB Unisex Salon

बुलडाणा जिल्ह्यात प्रथमच वातानुकूलित, अत्याधुनिक सुविधायुक्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे ख्याती प्राप्त THE JAWED HABIB Unisex Salon रिया वेलनेस द्वारा संचालित प्रशस्त फॅमिली सलूनचे शुभारंभ.
रिया वेलनेस अंतर्गत सौ. स्मिता चेकटकर व श्री. महेश चेकटकर बुलडाणा जिल्ह्यात प्रथमच वातानुकूलित, अत्याधुनिक सुविधायुक्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे ख्याती प्राप्त THE JAWED HABIB Unisex Salon सेवा देणार आहे. शुभारंभ दिनांक २९ जुन २०१८ ला सकाळी ११ वाजता असून स्थळ रिया वेलनेस डिएसडी मॉल, इलाहाबाद बँकेच्या बाजूला, चैतन्यवाडी, बुलडाणा येथे उदघाटन मा. जावेद हबीब सेलिब्रिटी हेअर आर्टिस्ट करणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री. राधेश्यामजी चांडक संस्थापक, अध्यक्ष बुलडाणा अर्बन परिवार तसेच मा. श्री. सुकेशजी झंवर सिएमडी, बुलडाणा अर्बन यांची उपस्थिती राहणार आहे. या शुभारंभामध्ये मा. आ. श्री. हर्षवर्धन सपकाळ – बुलडाणा, मा. आ. श्री. चैनसुखजी संचेती – मलकापूर, मा. आ. डॉ. संजयजी कुटे – जळगांव जामोद, मा. आ. श्री. आकाशजी फुंडकर – खामगांव, मा. श्री. धृपतरावजी सावळे – माजी आमदार, मा. सौ. उमाताई तायडे – अध्यक्ष जिल्हा परिषद, मा. श्री. विजयराजजी शिंदे – माजी आमदार, मा. नजमुन्नीसा सज्जाद – अध्यक्ष नगर परिषद बुलडाणा, मा. सौ. श्वेताताई महाले – सभापती विशेष उपस्थिती राहणार आहे.

बुलडाणा औरंगाबाद बस ब्रेक डाउन

Buldhana ST buses

बुलडाणा येथून औरंगाबाद ला निघालेली बस अचानक सिल्लोड नजीक ब्रेक डाऊन झाल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. तर औरंगाबाद येथून बुलडाणा कडे येणाऱ्या प्रवाशांना औरंगाबाद बस स्थानकावर ताटकळत बसावे लागले. यामुळे प्रवाशी रोष व्यक्त करताना दिसून आले. दुपारी ३.३० वाजता बुलडाणा येथून औरंगाबाद करीता फेरी आहे. सदर बस औरंगाबाद येथे रात्री ७. ३० वाजता पोहोचते आणि परत बुलडाणा कडे परतीच्या प्रवासास निघते. रात्री ७. ४५ ला औरंगाबाद हुन सुटणारी ही शेवटची बस आहे. परंतु ही फेरी अनेकदा नियमित असल्याची तक्रार प्रवाशी करतांना दिसून येतात.

आज बुलडाणा येथून औरंगाबाद ला निघालेली बस वेळेप्रमाणे बुलडाणा बस स्थानकावरून सुटली होती परंतु सिल्लोड नजीक ब्रेक डाऊन झाल्याने पुढील प्रवासास बस मार्गस्थ होऊ शकली नाही. परिणामी या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मागून येणाऱ्या बुलडाणा ते नाशिक बस मध्ये बसून देण्यात आले. या बाबत बुलडाणा आगारा सोबत संपर्क केला असता त्यांना झालेल्या प्रकाराची कुठलीही माहिती नसल्याचे समजते. या बसच्या प्रतीक्षेत असलेले अनेक प्रवाशी औरंगाबाद येथे अडकून पडलेले होते. औरंगाबाद येथील चौकशी कक्षात संपर्क केल्यावर बस रद्द झाल्याचे समजले. याशिवाय सदर फेरी बंद झाली असे सुद्धा औरंगाबाद येथील चौकशी कक्षात बसलेले अधिकारी प्रवाशांना सांगत असताना दिसून आलेत. सदर बस अनेक वेळा उशिरा धावतांना दिसून येते तर काही वेळेस कुठलीही सूचना न देता फेरी रद्द केल्या जाते. निदान या बस ला नियमित करावे किंवा बसमध्ये बिघाड असल्यास दुसरी बस या मार्गावर देण्यात यावी अशी मागणी प्रवाशी करीत आहेत.

उद्या बुलडाण्यात मशाल मार्च

बुलडाण्यात बुलडाणा जिल्हा दारूमुक्ती समिती अंतर्गत दिनांक २ ऑक्टोबर २०१७ रोजी गांधी जयंती निमित्य दारूमुक्तीसाठी मशाल मार्च चे आयोजन करण्यात आलेले आहे.

महात्मा गांधी पुतळा (जि. प. बुलडाणा) येथून हुतात्मा स्मारक पर्यंत हा दारूमुक्तीसाठी मशाल मार्च निघणार असून संध्याकाळी ६ वाजेला मार्च ला सुरुवात होणार आहे. बुलडाणा जिल्हा दारूमुक्ती समितीने राष्ट्रमाता जिजाऊंच्या मातृतीर्थातून दारूला हद्दपार करण्याच्या निर्धारासाठी सर्व सामाजिक संस्था, संघटना, युवक-युवती, पुरुष-महिला तसेच संपूर्ण बुलडाणा जिल्ह्याच्या जनतेला आवाहन केले आहे की हजारो-लाखोंच्या संख्येत या मध्ये सहभागी व्हा. ज्यामुळे राष्ट्रमाता जिजाऊंच्या मातृतीर्थातून दारूला हद्दपार करता येईल.

 

संपर्क : ९८२२८५६१३२, ९६३७२१९१०७, ९०११०४४८५३.

माझी व्यथा

घडी दोन घडीचा प्रश्न नाही,
आयुष्य भराची साथ होती.
ज्यावर विश्वास टाकला मी,
ती एका माणसाची जात होती…

पती त्याचे नाव,
देव त्याला मानत होती.
गणागोताचा त्याग करून,
सोबत त्याच्या राहत होती…

जिवापाड जपले त्याला,
दूर जाऊ नये म्हणून.
त्रास त्याचा सहन केला,
नाराज होवू नये म्हणून…

त्याच्यासाठी मरमर,
कष्ट करत होती.
ओझं माझे होईल तुला,
म्हणून संसार सारा पेलत होती…

सोन्यासारखे दिवस,
चांदीसारखी रात्र होती.
द्रुष्ट कुणाची लागु नये,
म्हणून वारंवार जपत होती…

माझ्यासाठी नाही स्वतः साठी जग,
हेच तुला सांगत होती.
व्यसन तुझे सुटून जावे,
यासाठीच धडपडत होती…

ही अट तुला मान्य नव्हती,
म्हणून सोडून तु गेलास.
भरला पुरला संसार माझा,
मोडुन तु गेलास…

काय मिळाले असे वागुन तुला,
भावना माझी दुखावली होती.
विसरून जाशिल मला तु,
नियती हेच सांगत होती…

सौ. अनिता भागवत येवले (बुलडाणा)

गौराई माझी

सोनियाच्या पावलांनी,
गवर माझी आली.
बसण्यासाठी तिला जागा,
सुशोभित केली.

सडा रांगोळीने अंगणे,
न्हाऊन निघाली.
हळदी – कुंकवांनी ठसे,
पाऊले उभारली.

साज श्रुंगार पाहुन तिचा,
अंगे शहारली.
धुप, दिप, पुष्प – सुवासांनी,
घरे – दारे बहरली.

लाडु, चिवडा, करंज्यांनी,
ताटे भरलेली.
पहिल्या दिवशी भाजी भाकरीची,
न्याहारी त्यांनी केली.

दुसऱ्या दिवशी गौरीला,
पंच पक्वान्न वाहिली.
आंबील – कथलीच्या प्रसादाने,
शोभा ताटांची वाढवली.

तिसऱ्या दिवशी माय,
रूप गौरीचं पडलेलं.
असे वाटे नेत्र जणू,
अश्रूंनी ढळलेलं.

अडीच दिवसांचे माहेर,
मला असं घडलेलं.
पुढच्या वर्षी येईल पुन्हा,
आता माहेर मी सोडलेलं.

सौ. अनिता भागवत येवले (बुलढाणा)

आले गणराया आमच्या दारी

आला आला घरी,
गणपती हा भारी.
सोबत त्यांच्या आली,
मूषकांची स्वारी.

हिरवळीवर त्यांनी मज्जा केली सारी,
मस्तकी त्यांच्या दुर्वा वाहिल्या भारी.
मोदकांचे ताट, सरीवर सरी,
खावून खावून त्यांची फुगली आहे ढेरी.

सुशोभित मखर सुंदर हा भारी.
लाडू-मोदक-केळी ह्यांची गर्दी झाली सारी.
पाहुणे किती छान आले आमच्या घरी,
करतो त्यांची आरती नर आणि नारी.

पार्वती त्यांची माता, पिता जटाधारी,
आनंदाला उधाण आले आहे भारी.
गणेशाचे स्थान सर्वात आहे भारी.
अष्टविनायकाची करा एकदा तरी वारी.

आला आला घरी,
गणपती हा भारी.
सोबत त्यांच्या आली,
मूषकांची स्वारी.

सौ. अनिता भागवत येवले (बुलढाणा)

बुलडाण्यात चंदन शेतीच्या कार्यशाळेचे एक दिवसीय आयोजन .

बुलडाण्यात महाराष्ट्र सँडल ग्रोवर फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी अंतर्गत चंदन व मिलीया डूबिया लागवड एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत चंदन शेती त्याची शास्त्रीय लागवड पद्धत, रोपांची निवड, खत व पाणी व्यस्थापन, संरक्षण व तोडणी आणि विक्री या संदर्भात सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. तरी चंदन लागवड करू इच्छिणाऱ्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा.

या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन बुलढाणा येथे हॉटेल कृष्णा पॅलेस, संगम चौकाजवळ दिनांक १३ ऑगस्ट २०१७ ला होणार आहे. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी देणगी मुल्य ५००/- रुपये द्यावे लागेल. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे.

या कार्यशाळेचे संयोजक श्री. शुभम रवींद्र कोल्हे बुलडाणा यांचा भ्रमणध्वनी क्रंमाक आहे – ९६७३७३२०५२

कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणीसाठी संपर्क करा.
९९२२३६४३३३, ९९२२६१७३३३, ९९२२५८८३३३.

महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळात व्यवस्थापक पदासाठी भरती

महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ (MSRDC) तर्फे सध्या बुलडाणा, जालना, अहमदनगर, नाशिक, वर्धा, नागपुर, औरंगाबाद व वाशिम या ठिकाणी व्यवस्थापक (Manager) पदासाठी भरती करण्यात येणार आहे. (Contract Basis) कंत्राटी पद्धतीने 05 वर्षे करीता एकूण १६ जागांकरिता भरती करण्यात येणार असून त्यासाठी उमेदवार हा Civil Engineering (BE) पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारास सम्बंधित क्षेत्रातील 03 वर्षे अनुभव असावा. उमेदवारास संगणकाचे ज्ञान (Excel, Powerpoint ) असणॆ आवश्यक आहे.

पद नाम (Post Name) : व्यवस्थापक
जागा तपशील (Post Details) :
खुला (Open) – ०८ जागा
अ.जा. (SC)- ०२ जागा
अ.ज. (ST)- ०१ जागा
वि.जा.(अ) (VJ-A)- ०१ जागा
भ.ज.(ब) (NT-B) – ०१ जागा
इ.मा.व. (OBC)- ०३ जागा

वेतनश्रेणी : ठोक वेतन : दरमहा रु.50,000/- + शासकीयनियमानुसार घरभाडे भत्ता.
वय मर्यादा (Age Limits) : खाजगी क्षेत्रातील उमेदवार असल्यास वयोमर्यादा कमाल 35 वर्षे पर्यंत. शासकीय / निमशासकीय / केंद्र शासनातील उमेदवार असल्यास वयोमर्यादा कमाल 62 वर्षे पर्यंत.

उमेदवाराने अर्ज हे जाहिरातीत दिलेल्या अर्ज नमुन्यात अचूक भरून दिलेल्या पत्त्यावर पोच देय डाकेने सादर करावा.
अर्ज करण्याचा पत्ता खालीलप्रमाणे :
General Manager (Administration),
M.S.R.D.C. (Ltd), Opp. Bandra Reclamation Bus Depot,
Near Lilavati Hospital,
Bandra (W), Mumbai – 400 050.

यासंबंधी अधिक माहितीसाठी www.msrdc.org ह्या अधिकृत संकेतस्थळास भेट दयावी.  जाहिरातीसाठी दिलेली लिंकवर क्लिक करा अथवा आपल्या ब्राऊजर मध्ये ओपन करा.
http://www.msrdc.org/Site/Upload/Images/ManagerforNMSCEW.pdf

बुलडाणा येथे "गझलरंग"

gajhlrang event in buldana

गर्दे वाचनालय बुलडाणा शताब्दी वर्षानिमित्त शहर-ए-गझल अकादमी यांनी दर्जेदार गझलचा मुशायरा “गझलरंग” कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. रविवार दि . २३ एप्रिल रोजी गर्दे वाचनालयाच्या सभागृहात सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

“गझलरंग” कार्यक्रमात डॉ. गणेश गायकवाड, अजीम शाद, प्रमोद खराडे, सुरेश इंगळे, रमेश आराख, फ़रहात इन्सानि (आनंद रघुनाथ) , रियाज अन्वर,गणेश शिंदे -दुसरबीडकर, जयदीप विघ्ने, सतिष दराडे यांचा सहभाग असणार आहे. “गझलरंग” कार्यक्रमाचे संयोजक श्री नरेंद्र लांजेवार हे असून सूत्रसंचालन शाहीर सुरेशकुमार वैराळकर (पुणे) हे करणार आहे. तरी “गझलरंग” कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेस सुरुवात

sailani baba darga

बुलडाणा येथून जवळच प्रसिद्ध सैलानी तीर्थक्षेत्र आहे. देशभरातून अनेक भक्त सैलानी येथे येत असतात. उन्हाळ्याच्या सुरुवातीला सैलानी येथे भव्य दिव्य यात्रा भरत असते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा सैलानी यात्रेस सुरुवात झाली असून. अनेक भक्त सैलानी येथे जात आहेत. बुलडाण्यातील एकमेव सर्व धर्मीय असे धार्मिक स्थान म्हणजे हाजी अब्दुल रहेमान सरकार सैलानी बाबा यांची दर्गा होय. या दर्गेचे वैशिष्टे म्हणजे येथे फक्त महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारतातील व विदेशातील देखील भक्त गण येथे दर्शनाला येतात.

बाबा सैलानीचे भक्त गण दरवर्षी ज्या क्षणाची प्रतीक्षा करता तो क्षण, तो दिवस म्हणजे होळीचा दिवस होय. आज होळी आहे या होळीच्या दिवसा पासूनच हाजी अब्दुल रहेमान सरकार सैलानी बाबा यांची दर्गा ला भव्य-दिव्य अशी यात्रा भरते या यात्रेचे खास वैशिष्ट म्हणजे नारळांची होळी पौर्णिमेच्‍या मुहूर्तावर पेटविण्यात येत असते. या प्रसंगी लाखो भाविक विविध व्याधीतून मुक्ती मिळविण्यासाठी बिबे, सुया, लिंबू टोचलेली नारळ येथे उतरवितात. याच नारळांची आगळीवेगळी होळी येथे पेटविली जाते. या होळी मध्ये जवळपास ४ ते ५ ट्रक नारळांची होळी ही पेटवली जाते. (यास जश्न-ए-उर्स शरीफ समारोह या नावाने देखील संबोधल्या जाते.) ही होळी प्रसिद्ध आहे. सैलानी बाबांच्या यात्रेमध्ये देशभरातून सुमारे ५ लाख भावीक दर्शनाला येतात. यावेळी सैलानी यात्रेस सुरुवात झाली असून अनेक यात्रेकरू सैलानी कडे मार्गस्थ होताना दिसून येत आहेत. बुलडाणा येथून सैलानी जाण्यास एस टी महामंडळाने जादा बसेसची व्यवस्था केलेली आहे.

पदवीधर मतदारांना नावे शोधण्यासाठी वेबसाईट विकसीत

buldana website for padaveedhar

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघातील बुलडाणा जिल्ह्यातील मतदारांची नावे कोणत्या मतदान केंद्रावर संलग्न आहेत, हे शोधण्यासाठी आज्ञावली विकसित केलेली आहे. ही आज्ञावली www.buldhana.amtgraduate.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

इच्छूक मतदारांनी या आज्ञावलीचा लाभ घ्यावा, असे जिल्हाधिकारी बुलडाणा तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक जिल्हा बुलडाणा यांनी कळविले आहे.

source : ‘महान्यूज’

बुलडाणा येथील एटीएम वर मिळते ‘झेड सेक्युरिटी’

बुलडाणा शहरात किमान २० एटीएम मशीन असतील. त्यामध्ये अनेक मोठ्या बँकासोबत इतर पतसंस्था आणि छोट्या मोठ्या बँकांचे एटीएम आहेत. २ महिन्याआधी झालेल्या नोटबंदीमुळे ही सर्व एटीएम भरलेली असायची. पैशानी नव्हे तर गर्दीने. पैसे असो वा नसो परंतु एक जण आत शिरला की त्यामागे इतर जण असे करता करता रांगच लागायची ती अजून सुद्धा कमी झालेली नाही. बुलडाणा शहरात असलेल्या या एटीएम मशीन पैकी फक्त काहीच मशीन मध्ये पैसे मिळतात तर काही अनेक दिवस तसेच पडलेले असतात. अनेक एटीएम सकाळ ते संध्याकाळ आपली “ड्युटी” बजावतात. संध्याकाळी त्यांचे ‘शटर डाऊन’ होत असते. त्यामुळे लोकांच्या समस्येत अजूनच भर पडते.

प्रत्येक एटीएम मध्ये एक सूचना लिहिलेली असते “एका वेळी एकाच व्यक्तीने प्रवेश करावा” इ. ही सूचना मनुष्यासाठी असते. ती सूचना वाचून तिथे पैसे काढण्यासाठी येत असलेली लोक त्याचे तंतोतंत पालन करतील अशी ‘खोटी आशा’ ती सुचना लिहिणाऱ्यास वाटली असावी. परंतु त्याचा घनघोर अपमान करण्याचा विडा काही सुशिक्षित नागरिकानी उचलला आहे. सुचना असलेली ती पाटी/फलक समोर असून सुद्धा खिशात एटीएम मशीन चे कार्ड घेऊन फिरणारे अनेक बहाद्दर एटीएम असलेल्या खोलीत गर्दी करतात. पैसे काढत असलेल्या व्यक्तीभोवती गर्दी करून उभे राहतात जणू काही त्याला ‘झेड सेक्युरिटी’ पुरवीत आहेत. तर काही जणांना मोबाईल वर बोलण्याचा मोह एटीएम मशीन कक्षात सुद्धा आवरला जात नाही. या ठिकाणी सुरक्षा रक्षक असतो परंतु तो सुद्धा कुठे निघून गेलेला असतो तो संध्याकाळ पर्यंत कळत नाही.

हा वृत्तांत जवळपास सर्वच ठिकाणचा आहे. काही एटीएम याला अपवाद असतीलही परंतु पोलीस मैदाना जवळ असलेल्या एसबीआय च्या एटीएम वर हमखास दिसून येतो. अशा सर्व ठिकाणी सुरक्षा रक्षक हवा आणि त्याने तिथे येत असलेल्या लोकांना मार्गदर्शन करून शिस्तीचे पालन करायला मदत केल्यास परिस्थिती बदलू शकते.

उद्या बुलडाण्यात संविधान जागर यात्रा

Buldana News

उद्या दि.२ डिसेंबर रोजी संध्या. ६. ३० वाजता अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर्फे संविधान बांधिलकी महोत्सव अंतर्गत ‘संविधान जागर यात्रा’ येणार आहे. तरी सर्व नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन अंनिस, बुलडाणा आणि बुलडाणा जिल्हा सांस्कृतिक आघाडी तर्फे करण्यात आले आहे.

चिखली रोड बुलडाणा येथील सामाजिक न्यायभावनाच्या सभागृहात उद्या ही यात्रा येणार आहे. तरी संध्या. ६. ३० वाजता आपल्या मित्र परिवारासह उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

कर्जापायी शेतकरी कुटुंबातील 3 जणांची आत्महत्या

Official website of Buldhana

कर्जापायी शेतकरी कुटुंबातील ४ जणांची आत्महत्या तर एक अत्यवस्थ झाल्याची घटना मालठाना येथे घडली आहे. ४ पैकी ३ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून एक अत्यवस्थ आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात असलेल्या ग्राम मालठाना येथील मसाने ह्या आदिवासी शेतकरी कुटुंबीयाने आज कर्जाच्या ओझ्यापायी सामुहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून तर एक जण अत्यवस्थ आहे. त्याच्यावर अकोल्यात उपचार सुरु आहेत. मसाने कुटुंबाकडे कडे एक एकर ,शेती आहे. त्यांवर हे लोक गुजराण करायचे परंतु त्यांच्यावर एक लाखाचं कर्ज होत. हे फेडता येण शक्य नसल्याने त्यांनी आत्महत्या करण्याचा मार्ग पत्करला. या कुटुंबातील दिनेश मसाने, ३५, लक्ष्मीबाई मसाने ४०, जितेंद्र मसाने १७ यांची प्राणज्योत मालवली आहे तर न्यानसिंग मसाने ७०, यांची प्रकृती अत्यवस्थ आहे.

बुलडाणा येथे ब्राम्हण संस्थेतर्फे भव्य शोभायात्रा

Buldhana District official website

उद्या ८ मे रोजी बुलडाण्यात ब्राम्हण संस्थेतर्फे भव्य शोभायात्रा व मोटार सायकल रैलीचे आयोजन करण्यात आले आहे. ब्राम्हण सभा बुलडाणा, ब्राम्हण युवक बहुउद्देशीय मंडळ बुलडाणा , पाराशर ब्राम्हण मंडळ बुलडाणा, भगवान परशुराम सेवा समिती (राजस्थानी ब्राम्हण) तसेच समस्त ब्राम्हण समाजातर्फे ८ मे रोजी सकाळी ८ वाजता मोटार सायकल रैली काढण्यात येणार आहे. कारंजा चौक येथील श्रीराम मंदिर येथून रैलीस सुरुवात होवून स्टेट बँक, जयस्तंभ चौक – जुनागाव – अडसूळ बंगला – मलकापूर बायपास – संगम चौक – विष्णुवाडी – चिखली रोड – ग्रीन नर्सरी जवळून परत तहसील चौक आणि परशुराम चौकात आरती व प्रसाद वाटपानंतर समाप्त होईल .

याशिवाय चैतन्यवाडी परशुराम चौकातून भव्य शोभायात्रेस सुरुवात होवून महाराणा प्रताप चौक – चिंचोले चौक – राधिका हॉटेल – शासकीय निवासस्थाना समोरून – परशुराम चौकात सांगता होईल. तरी या कार्यक्रमास सर्व बांधवानी परिवारासह उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त ब्राम्हण समाजातर्फे करण्यात आले आहे.

बुलडाणा-पुणे बस ला औरंगाबाद जवळ अपघात

Buldhana District official website

बुलडाणा येथून पुणे ला जाणाऱ्या रात्री ९. १५ च्या बुलडाणा-पुणे बस ला औरंगाबाद जवळ अपघात झाला. अपघातात बसमधील १७ प्रवाशी जखमी झाले आहेत. एम एच १८ बीटी ४२९४ क्रमांकाची बुलडाणा-पुणे ही बस काल नेहमीप्रमाणे बुलडाणा येथून रात्री ९. १५ प्रवाशी घेवून निघाली. रात्री २ वाजे दरम्यान औरंगाबादहून पुण्याकडे सदर बस मार्गस्थ झाली असताना औरंगाबाद ते पुणे मार्गावर वाळूज जवळील चौकात भरधाव येत असलेल्या ट्रकने बुलडाणा-पुणे बस ला वाहकाच्या बाजूने जोरदार धडक दिली. या अपघातात १७ प्रवाशी जखमी झाले आहेत. सर्व प्रवाश्यांना औरंगाबाद च्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गाडीचे भरपूर नुकसान झाले आहे. बुलडाणा-पुणे बसचे चालक व वाहक मात्र या अपघातात बचावले आहेत. हा अपघात झाल्यानंतर लागलीच औरंगाबाद आगाराने तडक घटनास्थळी जावून सहकार्य केले.

विहिरी जवळची ती बाई

Buldhana District official website

आम्ही लोणंदला राहायला आलो तेव्हा लोणंद एक सर्वसाधारण गाव होते. शाळा, दवाखाने, रेल्वे वगैरेसुविधा होत्या पण ज्या पाण्यावर फारसे तरंग उमटत नाहीत असे संथ नि शांत जीवन होते तिथले. आता गावात एक थिएटर आहे पण तेव्हा दोन तंबू टॅाकीज होते. जयश्री आणि अशोक. गावापासून लांब मोकळ्या रानात! रात्री नऊ हे सिनेमा सुरु होण्याचे घोषित वेळापत्रक असले तरी प्रेक्षक गोळा होईपर्यंत तो सुरु होत नसे. तंबू उभारायलाच नऊ वाजायचे. मग शहनाई. वाऱ्यावर लहरत ते सूर घराघरात पोचायचे. मग सिनेमा बघायला जाणारांची गडबड उडे. एकमेकांना हाका मारत एकमेकांच्या सोबतीने सर्व निघत. पण प्रत्येक वेळेस सोबत मिळेच असे नाही. आम्हांला सिनेमा बघायची फार हौस होती. घरांत टी. व्ही. रेडीओ नव्हता. पपा. मुंबईला. मोठी बहिण मामाकडे. मग मी, आई, मोठी बहिण आणि मोठा भाऊ असे सिनेमाला जात असू. सिनेमा बदलला की आम्ही निघालोच.
असाच एकदा ‘ जयश्री’ ला ‘ घुंघट’ नावाचा सिनेमा लागला. शेजाऱ्यांना बच्चन , धर्मेंद्र यांचे मारधाडीचे चित्रपट आवडत. त्यामुळे कोणीच सोबत आले नाही. आम्हीच निघालो. काही अंतर चालले की पानपट्टीसारखी अरुंद टपरी दिसायची. जकात नाका होता तो . कंदिलाच्या पिवळट उजेडात तिथे बसलेल्या बुटकेल्या, जाडगेल्या माणसाची सोबत वाटायची. अजून काही अंतर चालले की रॉकेलचे एक जुनाट दुकान. आणि त्याच्यापासून थोड्या अंतरावर एक विहीर. आम्ही चाळीतली मुले हमखास शाळेत जाताना त्या विहिरीपाशी जायचो. तीत एक कासव होते. सकाळच्या वेळी ते हळूच बाहेर येई व ऊन खात कपारीत बसे. आम्हा मुलांसाठी ते प्रचंड कुतूहलाचा विषय होते.
त्या रात्री पौर्णिमा होती. आम्ही निघालो तेव्हा का कोणास ठाऊक आमची मांजर पुन्हापुन्हा मागे येत आम्हाला अडवत होती. तिला हाकलून दिले तरी ती धावत येऊन पायांत घोटाळे. अखेर तिला लांब पिटाळून लावून आम्ही निघालो. सिनेमा उशिरा सुरु झाला नि उशिरा संपला. आम्ही निघालो. जुना सिनेमा असल्याने फारशी गर्दी नव्हती. त्यामुळे परतताना तुरळक माणसांची सोबत होती. वाटेत त्यांची घरे लागल्यावर तीही सोबत संपली. आता शांत झोपलेले गाव…ग्रामपंचायतच्या ट्यूबलाईट्सनी उजळलेला निर्मनुष्य रस्ता, आणित्यारस्त्यावरआम्ही चौघे. आम्ही भावंडे सिनेमा वर चर्चा करत होतो. आता तो सिनेमा थोडाही आठवत नाही. आणि आम्ही काय बोलत होतो तेही नाही. आई माणसांची सोबत संपल्याने आम्हाला पावलेउचलायला सांगत होती एवढे ठळक आठवते. आम्ही आमच्याच नादात.
बोलताबोलता त्या विहिरीपाशी आलो. काही हातांवर ती विहीर. आम्ही बोलत होतो नि आईला त्या विहिरीच्या बाजूने कोणीतरी लक्ष वेधून घेण्यासाठी खाकरते तसा आवाज आला. तिने चमकून पाहिले. ट्यूबलाईट्सचा उजेड होताच…शिवाय टिपूर चांदणे. आईला त्या उजेडात विहिरीच्या मधोमध एक बाई उभी दिसली. तिचे केस मोकळे होते. अंगावर गुलाबी पातळ होते. अंगात चोळी नव्हती. ती एकटक आईकडे पाहत होती. आईला प्रश्न पडला. एवढ्या रात्री ही येथे काय करतेय? आणि विहिरीच्या मध्ये काय करतेय ? तिच्या लवकर लक्षात आले नाही. तिला वाटले दगड, माती, कचरा साठून विहीर बुजत आलीये म्हणून ती मध्ये उभी राहू शकली असेल. तरीही एवढ्या रात्री काय करतेय हा प्रश्न होताच. काही क्षणातच आईच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. तिला आठवले याच विहिरीतल्या कासवाची गम्मत आम्ही तिला सांगत असू. म्हणजे विहिरीत पाणी होते. आणि ती बाई मधोमध तरंगत होती. आई शहारली. तिने आम्हाला जवळ जवळ ढकलतच पुढे आणले. ‘ लवकर लवकर चला’. एवढेच पुटपुटली. आमच्या लक्षात नाही आले. बंद दुकाने, झोपलेली घरे आणि विरक्त सन्याशासारखी उभी असलेली निमूट झाडे यातून वाट काढत आम्ही निघालो. तो छोटेखानी जकातनाका लागला आणि तिथला माणूस जागा असल्याचे पाहून आईच्या जीवात जीव आला. सकाळी आईने शेजारच्या बाईला विचारले, ‘ त्या विहिरीत काही आहे का हो?’
ती म्हणाली, ‘ हो. एका वडारी समाजाच्या बाईने जीव दिलाय तिथे. नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून. पण ती बायकांना काही करत नाही. पुरुषांना त्रास देते. अमावास्या पौर्णिमेला पुरुषांना तेथे हमखास अपघात होतो.’
काल रात्री हाताच्या अंतरावर एक अमानवी अस्तित्व होते..या जाणीवेने आई शहारली. तिने आम्हाला सर्व सांगितले. मांजरीकडे बघून म्हणाली,’तरीच ही बया अडवत होती’. दुसऱ्या दिवशी नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे आम्ही कासव बघायला गेलो. सोबतच्या पोरांना आम्ही रात्रीचा किस्सा सांगितला. दिवसाच्या लख्ख उजेडात विहीर निरुपद्रवी वाटत होती. नव्या कुतूहलाने आम्ही ते गूढ काळपट पाणी न्याहाळले. कोणीतरी शोध लावला. ते कासवच भूत असेल. दिवसा कासव आणि रात्री बाई. आम्ही हसलो. पुढे कोणाची सोबत नसताना कित्येकदा मी विहिरीपाशी गेले. पाण्याखाली ती बाई राहत असेल का याचा विचार करत मी पाण्याकडे पाही. भीती नाही वाटली, आणि थोडे कळायला लागल्यावर दया वाटू लागली. आयुष्य संपवावे वाटण्याइतका तिचा छळ झाला होता. आज ती विहीर पूर्णपणे बुजवून तीवर ऑफिस थाटण्यात आलेय. एक घरही बांधले गेलेय. त्यांना भुताने छळल्याच्या हकीकती ऐकल्या नाही. ती बाई आणि ते कासव यांचे काय झाले असेल हा प्रश्न मला आजही पडतो.

राजेश्वरी कांबळे.

पित्यानेच केली सोनालिका ची हत्या

Buldhana

क्रूर पित्यानेच आपल्या ‘सोनालिका’ चा गळा चिरून हत्या केल्याची घटना खामगाव तालुक्यातील नांद्री येथे घडली. काल घडलेल्या या घटनेत पोलिसांनी अवघ्या ६ तासांत आरोपीला जेरबंद केले आहे. खामगाव तालुक्यातील नांद्री येथील लक्ष्मण गायकवाड यांची मुलगी लता हिचा विवाह सारोळा येथील लहू धंदरेसोबत मे २०१५ ला झाला होता. परंतु लहू हा आपल्या पत्नीवर संशय घेत होता. तिचे सातत्याने माहेरी जाणे यामुळे तो लताचा शारीरिक मानसिक छळ करत होता. या त्रासामुळे लता ही मागील पाच ते सहा महिन्यांपासून नांद्री येथे आपल्या माहेरी आईवडिलाकडे राहू लागली. तिथेच लता ने एका मुलीस जन्म दिला. सर्वांनी ‘सोनालिका’ असे तिचे नाव ठेवले. मात्र कित्येक दिवस झाले पत्नी घरी येत नसल्याने संतप्त लहूने २६ एप्रिल रोजी माहेरी जावून २७ एप्रिलच्या पहाटे च्या सुमारास आईजवळ झोपलेल्या ‘सोनालिका’ चा घराजवळ काही अंतरावर नेवून गारगोटीने खून केला. ‘सोनालिका’ दिसत नसल्याने तिचा शोध घेतला असता सकाळी तिचा मृतदेह शेतात आढळला. या प्रकरणी पोलिसांनी आपली तपासचक्रे फिरवीत अवघ्या ६ तासांत आरोपीस पकडले.

वाहकाच्या प्रसंगावधानाने वाचले प्रवाशांचे प्राण

अचानक छातीत तीव्र वेदना होवून सुद्धा आपल्या प्रसंगावधानाने अनेक प्रवाशांचे प्राण वाचवल्याची घटना व्याळा जवळ घडली. अकोला येथून बुलडाणा ही बस घेवून चालक यू. जी. रोम निघाले. मात्र थोड्याच वेळात त्यांच्या छातीत तीव्र वेदना होवू लागल्या तरीही त्या परिस्थितीत गाडी सावकाश बाजूला घेवून त्यांनी गाडीतील प्रवाशांचे प्राण वाचवले. मात्र ते वाचू शकले नाहीत.

अकोला आगाराची एमएच-४0-५३९९ क्रमांकाची बस घेवून उत्तमराव गंगाधर रोम (रा. कौलखेड) हे बुलडाणा कडे निघाले असताना व्याळाजवळ त्यांना यांना अस्वस्थ वाटू लागले. मात्र त्यांनी संयमाने बस रस्त्याच्या कडेला उभी केली व प्रवाशांचे प्राण वाचविले; बसमध्ये ३0 प्रवासी होते. मात्र त्या नंतर दोन मिनिटांतच त्यांचा मृत्यू झाला.

बुलडाण्यात बिबट्याचा सहा तास थरार

बुलडाणा जिल्यातील नांदुरा तालुक्यातील पोटळी शिवारात आज सकाळपासून एका बिबट्याने सहा तास उच्छाद मांडला. कुत्र्याची शिकार केल्यानंतर बराच वेळ हा बिबट्या झाडावर बसून होता. त्यामुळे बिबट्याला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.

गावातील वडोदे यांच्या शेतातील झाडावर बसलेल्या ह्या बिबट्याने जमवातील रमेश राजाराम तागडे (५५) या मजुरावर हल्ला करून त्यांना जखमी केले. त्यानतर एका वृद्धावरही हल्ला केला. त्यानंतर तो बांबूच्या झाडात शिरला. याबाबत पोलिस व वनविभागाला माहिती देण्यात आली. त्यावरून प्रादेशिक वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिस घटनास्थळी पोहचले. सुमारे सहा तासापर्यंत पोटळी शिवारात ह्या बिबट्याचा थरार कायम होता.

सुधीर सुर्वे यांना बुलडाण्यातून आपची उमेदवारी

सुधीर सुर्वे  यांना आज आप अर्थात आम आदमी पार्टी ने बुलडाण्यातून उमेदवारी जाहिर केली आहे. आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्रातल्या सतरा उमदेवारांची यादी आज जाहीर करण्यात आली आहे. त्यात बारामतीतून माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडेंना तिकीट देण्यात आलं आहे. तर हातकणंगलेमधून राजू शेट्टींना रघुनाथदादा पाटलांचं आव्हान असणार आहे. उत्तर मुंबईतून सतीश जैन यांना तिकीट देण्यात आलं आहे. तर धुळे लोकसभा मतदार संघातून निहाल अहमद यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

तसंच नंदुरबार माजी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.संजय अपरांती यांनाही आपनं रायगडमधून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. अपरांतींनी तीन महिन्यांपूर्वीच जिल्हा पोलीस अधिक्षक पदाचा राजीनामा दिल्याचं समोर आलं आहे. त्यांनाही आम आदमी पक्षानं उमेदवारी जाहीर केली आहे. शिरुरमधून न्यायाधिश निकम आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून कर्नल गडकरी अशा उच्च शिक्षितांना आम आदमीनं आपल्या तिसऱ्या यादीत स्थान दिलं आहे.

आपचे उमेदवार आणि मतदार संघ :

1) बारामती – सुरेश खोपडे
2) भिवंडी – जलालुद्दीन अन्सारी
3) बुलडाणा – सुधीर सुर्वे
4) धुळे – निहाल अहमद
5) हातकणंगले – रघुनाथदादा पाटील
6) माढा – सविता शिंदे
7) उत्तर मुंबई – सतीष जैन
8) नांदेड – नरेंद्र सिंह ग्रांथी
9) उस्मानाबाद – विक्रम साळवे
10) परभणी -सलमा कुलकर्णी
11) रायगड- डॉ.संजय अपरांती
12) रामटेक – प्रताप गोस्वामी
13) रत्नागिरी – सिंधुदुर्ग – कर्नल गडकरी
14) सातारा – राजेंद्र चोरगे
15) शिर्डी – नितीन उदमले
16) शिरुर – निकम
17) कल्याण – नरेश ठाकुर