ससून हॉस्पिटलची नर्स

मित्रांनो अनेक दिवसांपासून सातत्याने तुमचे फोन आणि मेसेज येत होते. स्टोरी कधी टाकणारं, बंद केलंय का स्टोरी टाकणं, काही सुचत नाही का ? यासारखे अनेक प्रश्न विचारल्या जात होते. त्यामुळे आज तुमची प्रतीक्षा थांबवत आहे. आजची कथा एम एच २८.इन च्या यूजर्स ने पाठवलेली असून ती तुमच्या पुढे सादर करीत आहोत.

सुमारे ३५ वर्ष झाली असतील या घटनेला. माझ्या आत्याचे यजमान रेल्वेत पुणे स्टेशनवर नोकरीला होते. ते आणि त्यांचा मित्र सायकलवरून रात्री उशीरा घरी येताना नेहमी बरोबर येत.एकदा आत्याचे यजमान कामावर गेले नाहीत .तो मित्र एकटाच ड्युटी करून बारा वाजता रात्री येत होता. तेवढ्यात ससून हॉस्पिटलच्या गल्लीतून एक नर्स आली तिने त्यांना विनंती केली की आज तिला सोबत कोणीच नाहीये तर तुम्ही मला घरापर्यंत सोबत येता का? त्यांनी विचार केला नर्स आहे तिला मदत करायला हवी म्हणून ते सायकलवरून उतरले आणि तिच्याशी बोलत तिने सांगितलेल्या मार्गाने जाऊ लागले. पुढे गेल्यावर त्यांना लघुशंका आली म्हणून ते नर्सला म्हणाले तुम्ही इथे थांबा मी रस्त्याच्या पलीकडे असलेल्या मुतारीत जाऊन येतो.अस म्हणून ते रस्ता क्रॉस करून मुतारीपाशी सायकल उभी करून आत गेले. सहज त्यांनी पलीकडच्या बाजूला नर्स आहे का म्हणून डोकावले तर जे काही दिसले ते पाहून त्यांची बोबडीच वळली. रस्त्यापलीकडे असलेल्या नर्स ने तिचा एक हात लांब करून यांच्या चक्क सायकलच्या सीटवर ठेवला होता सुमारे १५ फुट हात ताणला होता . आणि ती हसत यांच्याकडे पहात होती. हे पाहिल्यावर हे तसेच धावत सुटले आणि कसेबसे घरी आले , घामाने निथळत. त्या रात्री त्यांना काही बोलताच येत नव्हत. आणि भयंकर ताप भरला .दुसऱ्या दिवशी एका मित्राने कामावर जाताना यांची सायकल पहिली आणि तो घरी घेऊन आला .तेव्हा हे थोडे सावरले होते व त्यांनी घडला प्रकार सांगितला.त्या घटनेनंतर रात्री ते कधीच एकटे घरी आले नाहीत. कोणी बरोबर नसेल तर ते स्टेशन मास्तर कार्यालयात झोपून सकाळी परत येत.

ही कथा फक्त मनोरंजनासाठी असून एमएच २८.इन अशा कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अथवा याच्याशी एमएच २८.इन चा कुठलाही संबंध नाही.