निशा माझी जुनिअर केजी पासूनची मैत्रीण आहे. आमची बिल्डींग टॉवरच्या प्रोजेक्टसाठी गेली. त्यामुळे आम्हाला भाड्याच्या रुममध्ये राहावे लागणार होते. निशाचे कुटुंब गोदरेज कंपनीच्या क्वार्टर्सच्या रूममध्ये राहायला गेले. त्या क्वार्टर्सच्या बाजूला खाडी असल्याने , रात्रीच्यावेळी तेथील वातावरण अतिशय भयानक दिसत असे. त्यामुळे तेथील रहिवासी रात्री ८च्या नंतर बाहेर फिरकत नसत. या क्वार्टर्स फक्त या कंपनीतल्या कामगारांनाच मिळत असल्याने , निशाच्या बाबांना ती रूम मिळाली होती.
सर्वकाही सुरळीत चालले होते , पण निशाला मात्र तिथे खूप विचित्र वाटत होतं , तसं तिने आपल्या घरच्यानाही बोलून दाखवलं. पण घरच्यांनी मात्र तिच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष केले. जसजसे दिवस उलटू लागले तसतसा निशाला त्रास होऊ लागला. त्रास म्हणजे रात्रीच्यावेळी मधेच ती खाडकन उठून बसायची आणि झोपेतच मोठमोठ्याने ओरडायची की, “मला नाही यायचे आहे तुझ्यासोबत , मला त्रास नको देउस “, पण तरीही तिच्या घरच्यांना वाटले की ,कदाचित तिला एखादं वाईट स्वप्न पडल्यामुळे ती अशी वागत असावी, म्हणून त्यांनीही याकडे जास्त लक्ष दिले नाही . पण हे प्रकार काही थांबले नाहीत. एक दिवस निशाच्या स्वप्नात एक तरुण मुलगा आला . तो तिला वारंवार सांगत होता, की “तू माझी होणारी बायको आहेस . तू माझ्याशी लग्न कर , मला सोडून जाऊ नकोस, नाहीतर मी तुझा जीव घेईन ” अशाप्रकारे तो रोजच निशाच्या स्वप्नात येउन तिला सतावू लागला होता. आणि निशाचा हा त्रास दिवसेंदिवस वाढू लागला. निशाचे घर मोठे असल्याने, निशा रात्री २ वाजता उठून अख्या घरभर फिरायची. आणि त्यांच्या बाल्कनीत जाऊन एकटीच बडबडत बसायची. असे प्रकार आता रोजच होऊ लागले आणि सकाळी मात्र तिची तब्येत आणखीनच खराब होत असे. आता मात्र तिच्या घरच्यांना तिची काळजी वाटू लागली होती. पण त्यांना भुताटकीच्या प्रकारावर मात्र तिळमात्र विश्वास न्हवता. त्यामुळे त्यांनी डॉक्टरांना बोलावून निशावर उपचार सुरु केले , पण या उपचारांचाही तिच्यावर काहीच प्रभाव होत न्हवता.
एके दिवशी अशीच निशा रात्री उठून सार्या घरभर फिरू लागली आणि नंतर बाल्कनीत जाऊन बसली होती , तेव्हा अचानक तिच्या आईला जाग आली . निशा संध्याकाळच्या वेळी कधी बाल्कनीत उभी राहत नसे, त्यामुळे तिला बाल्कनीत उभी राहून त्या खाडीकडे बघताना पाहूनसुद्धा खूप भीतीदायक वाटत होते, त्यामुळे इतक्या रात्री निशा एकटीच बाल्कनीत काय करतेय , कुणाशी बोलतेय हे पाहून तिच्या आईला फार आश्चर्य आणि भीतीही वाटली.आणि इतक्या रात्री तिला बाल्कनीत उभी राहिलेली पाहून , भीतीनेच का होईना तिच्या आईने तिला जोरात हाक मारली, “निशा , तिथे काय करतेयस तू!!” आईचा आवाज ऐकताच निशा एकाएकी गप्प झाली. तिच्या आईने पुन:पुन्हा हाक मारूनही तिने काहीच प्रतिसाद दिला नाही, म्हणून तिची आई उठली आणि निशाजवळ गेली आणि तिला पुन्हा आवाज दिला असता निशाने आपल्या आईकडे पहिले, तेव्हा तिच्या आईने समोर जे काही पाहिले त्यामुळे तिच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. निशाचे ते विचित्र रूप पाहून ती पूर्ण हादरली होती. तिचे विस्कटलेले लांबसडक केस . डोळ्यात एक प्रकारचा आगसदृश्य राग ,तिचे ते रागाने थरथरणारे होठ त्यातून तिचे विचित्र हसणे , आणि रात्रीची वेळ त्यामुळे एकंदरीत सर्वच वातावरण खूपच विचित्र आणि भयाण भासत होतं , तेवढ्यातूनही तिच्या आईने तिला विचारले, “काय झालं ग बाळा ?…इतक्या रात्री बाल्कनीत काय करतेयस तू ?” इतक्यात अचानक निशा हसता हसता मधेच रडू लागली अन् अचानक मुलाच्या आवाजात रागाने बोलू लागली, निशाची आई तिचे हे रूप पाहून खूपच घाबरली होती, त्यात तिच्या तोंडून असा मुलाचा भयानक आवाज ऐकून तर त्यांना आता चक्करच यायची बाकी राहिली होती . भीतीने त्यांच्या तोंडून साधा शब्दही फुटत न्हवता. त्यावेळी काय करावे, काय बोलावे हेच त्यांना सुचेनासे झाले होते. इतक्यात निशाच्या शरीरातील त्या मुलाचा आत्मा म्हणाला, की ” निशा माझी होणारी बायको आहे , आणि मी तिला घेऊनच जाणार आहे . कारण एकदा मी तिला गमावलं आहे, पण आता नाही गमावणार. आणि जर कुणी मला अडवण्याचा प्रयत्न केला तर मी त्या व्यक्तीला जिवंत नाही सोडणार” इतकं बोलून निशा आणखीनच भयानक घोगऱ्या आवाजात जोरजोरात किंचाळू लागली. ती रात्र इतकी भयानक असेल याची कल्पनाच कारण शक्य न्हवतं . नंतर अचानक निशाच्या शरीरातील ती दृष्ट आत्मा एकाकी हवेच्या झोताप्रमाणे बाहेर निघून गेली अन् निशा धडकन जमिनीवर बेशुध्द होऊन कोसळली. आणि लागलीच तिच्या आईने घरातील सर्वाना हक मारून बोलावले आणि निशाला उठवण्याचा प्रयत्न करू लागल्या. आज पहिल्यांदा निशाच्या बोलण्यातील भयाणता त्यांना जाणवत होती. मग सर्वांनी हळूच निशाला उचलले आणि बेडवर नेवून ठेवले.
मग निशाच्या आईने घडलेला सर प्रकार तिच्या बाबांच्या कानावर घातला आणि तिच्या बाबांच्या गुरुंना घरी बोलावून घेण्यास सांगितले. दुसर्या दिवशी लगेच निशाच्या बाबांनी त्यांच्या परम पूज्य गुरुजींची भेट घेतली आणि सारा प्रकार त्यांच्यासमोर कथन केला. आणि मग ते गुरुजीही सर्व हकीगत ऐकून त्यांच्या घरी येण्यास तयार झाले. जेंव्हा त्या गुरुजींनी निशाच्या घरात पाऊल ठेवले तेव्हा सर्रकन एक वाऱ्याची झुळूक त्यांना स्पर्शून निघून गेली आणि तेव्हाच या घरात नक्कीच कुठलीतरी अमानवी शक्ती वास करत आहे, हे गुरुजींच्या लक्षात आले .
गुरुजी घरात आल्यापासून सतत कान टवकारून काहीतरी ऐकण्याचा प्रयत्न करत होते. मग ते जिथे निशाला झोपवले होते तिथे गेले. तिथे बेडवर निशा निपचित पडली होती. तिच्या चेहऱ्यावरचे सारे तेज नाहीसे झाले होते. मग त्यांनी हळूच मायेने निशाच्या डोक्यावरून हाथ फिरवला, इतक्यात फट्कन निशाने डोळे उघडले आणि ती रागाने गुरुजींकडे पाहू लागली . आता मात्र निशा आणखीनच चिडली होती. एखाद्या जंगली श्वापदाने शिकार पाहिल्यावर गुरगुरावे तशी निशा त्यांच्याकडे पाहून गुरगुर करू लागली. आता ती त्यांच्याकडे झेप घेणार इतक्यात निशाच्या भावाने व बाबांनी तिला घट्ट पकडून ठेवले. मग गुरुजींनी काही वेळ विचार करून निशाच्या बाबांना सांगितले, की निशाची अवस्था फारच बिकट झालीय आणि त्यासाठी लवकरात लवकर आता काहीतरी उपाय करावा लागेल अन्यथा ती दृष्ट आत्मा आपल्या दृष्ट उद्देशात सफल होईल. मग लगेच त्यांनी निशाच्या बाबांना एका लहान हवनाची तयारी करण्यास सांगितले.
सगळी तयारी झाल्यानंतर निशाला गुरुजींच्या समोर बसवण्यात आले पण निशा काही त्या हवनाच्या जवळ जाण्यास तयार न्हवती . ती जोरजोरात मोठ्याने किंचाळत होती अन् हाथ पाय आपटत होती तरीही कसेबसे तिला गुरुजींसमोर बसविण्यात आले आणि मग हळू हळू गुरुजींचे मंत्र उच्चारण सुरु झाले तसा अचानक घरातील संपूर्ण वातावरणात बदल जाणवू लागला. घरातील हवा गायब होऊन वातावरण कोंदट होऊ लागले आणि आता तर निशाच्याही हालचाली सुरु होऊ लागल्या होत्या . इतक्यात गुरुजींनी डोळ्यानीच निशाच्या बाबांना व भावाला इशारा केला व तिला घट्ट पकडून ठेवण्यास सांगितले. निशाच्या आईला मात्र तिची हि अवस्था बघवेनाशी झाली होती. त्या तोंडाला पदर लावून एका कोपऱ्यात उभ्या राहून रडू लागल्या.
आता मात्र निशाचा आवाज बदलून एका मुलाचा भयानक आवाजात ती बोलू लागली , तो म्हणाला ,” तुम्हाला सांगितलं होतं न कि माझ्या वाट्याला जायचं नाही म्हणून, निशा माझी आहे आणि मी तिला घेऊनच जाणार आहे , आणि जो कुणी मला अडवा येयील त्याला संपवल्याशिवाय मी राहणार नाही” आणि पाहता पाहता निशाचे रूपाच बदलू लागले , तिचे डोळे रक्तासारखे खूपच लाल झाले होते, तिचे बांधलेले केसही सुटले होते. आणि ती जोरजोरात ओरडत होती . तिचे हे रूप पाहून आता गुरुजी सोडले तर सर्वचजण खूप घाबरले होते. ओरडता ओरडता निशा मधेच आपले डोळे गरगर फिरवत होती आणि काहीतरी सांगत होती. मग गुरुजींनी आणखीनच मोठ्याने मंत्र उच्चारण्यास सुरवात केली आणि मंत्र उच्चारता उच्चारता गुरुजी स्वतःकडील गंगाजल निशाच्या अंगावर शिंपडू लागले . तशी निशाच्या शरीरातील त्या अतृप्त आत्म्याला आणखीनच त्रास होऊ लागला व तो तडफडू लागला. पण त्याचबरोबर बिचाऱ्या निशाचीही फरपट होत होती. तिच्या आई-बाबांना आपल्या मुलीची हि अवस्था तर बघवतच न्हवती. मग गुरुजी आपल्या जागेवरून उठले आणि त्यांनी कसलासा अंगारा आपल्या हातात घेतला आणि निशाच्या कपाळावर लावला. तो अंगारा लावल्याबरोबर निशाच्या शरीरातील त्या मुलाच्या आत्म्याला आता तो त्रास असह्य झाला आणि मग निशाकर्वी तो गुरुजींसमोर हाथ जोडून माफी मागू लागला. मग गुरुजींनी त्याला दटावले व निशाचे शरीर सोडून जाण्यास सांगितले. नंतर अचानक निशाच्या शरीरातील ती दृष्ट आत्मा एकाकी हवेच्या झोताप्रमाणे बाहेर निघून गेली आणि एकाएकी निशा पुन्हा बेशुध्द होऊन जमिनीवर कोसळली. मग गुरुजींनी मोठ्या मायेने तिच्या डोक्यावरून हाथ फिरवला आणि मग त्यांनी निशाचे संरक्षण व्हावे यासाठी एक तावीज काही मंत्र उच्चारून निशाच्या गळ्यात बांधले व निशाच्या घरच्यांना तिला घेऊन त्यांच्या कुळदैवतेला जाऊन येण्यास सांगितले. व लवकरात लवकर ते घरही सोडून जाण्यास सांगितले कारण या घरात निशासोबत पुन्हा असे काही होण्याचा धोका नाकारता येत न्हवता. मग त्याप्रमाणे काही दिवसांतच त्या लोकांनी ते घर सोडले व दुसर्या नवीन घरात राहण्यासाठी निघून गेले. मात्र आपल्या मुलीबाबत असे का झाले हा विचार निशाच्या बाबांना स्वस्थ बसू देत न्हवता , त्यामुळे त्यांनी त्या घराच्या आजूबाजूच्या परिसरात त्या घराविषयी चौकशी केली असता त्यांना असे कळले, कि काही वर्षापूर्वी याच घरात मुकेश नावाच्या एका तरुण मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती . कारण त्याचे स्नेहा नावाच्या एका मुलीवर खूप प्रेम होते , पण स्नेहाने मात्र त्याला साफ नकार दिला व चारचौघात त्याचा पान उताराही केला होता त्यामुळे मुकेश खूपच दुखावला गेला होता. इतका कि त्याने जगण्यापेक्षा मरणाचा मार्गाच योग्य समजला. त्या दिवसापासून मुकेशशची आत्मा त्या घरात वास करत होती, अनेकवेळा त्याच्या शेजाऱ्यांना त्याच्या घरातून ओरडण्याचा आवाजही येत असे या घरात अनेकांना अनेकांना वाईट अनुभव आल्यामुळे त्या घरात कुणी राहण्यास, व कुणीच काही बोलण्यास धजावत न्हवते. त्यामुळे त्यांची निशाच्या कुटुंबीयांनाही सावध करण्याची हिम्मत झाली न्हवती आणि म्हणूनच निशाच्या घरच्यांना या घटनेबाबतीत काहीच माहित नसल्यामुळे त्यांच्यावर असा प्रसंग ओढवला होता.
निशाच्या बाबांनी या मोठ्या संकटातून त्यांच्या कुटुंबाला वाचवल्याबद्दल देवाचे व त्यांच्या गुरुजींचे खूप मनापासून आभार मानले. एके दिवशी तिच्या आईनेच आम्हाला भेटायला आल्यानंतर हि सगळा किस्सा माझ्या आईला सांगितला होता , त्या घटनेनंतर काही दिवसांनी मला निशा भेटलीही होती , तिला पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर तिच्यासोबत घडलेली हि भयानक घटना झरझर डोळ्यासमोरून गेली. एकदा असेही वाटून गेले की निशाला याबाबत काही विचारणा करावी कि नक्की त्यावेळी काय घडले होते , त्यानंतर तिला याबाबतीत काय वाटतंय, पण माझी काही हिम्मतच झाली नाही आणि मला तिला पुन्हा दुखावयाचेही न्हवते. तरी या सर्व भयंकर प्रकारातून माझी जिवलग मैत्रीण मात्र सुखरूप बाहेर पडली हेच माझ्यासाठी खूप आनंददायी होतं