स्त्री जन्मा ही तुझी कहाणी

marathi kavita

ऐक स्त्री जन्मा ही तुझी कहाणी
ऐकून येईल डोळ्यात पाणी
तुझ्यात आहे सुर्याचे तेज
नवदुर्गांची अनमोल शक्ती
तरीही तुझी का? अशी उदास वाणी
ऐकून येईल डोळ्यात पाणी

बघ हे जग काय म्हणजे तुला
अबला आहेस तु
निराधार आहेस तु
उठ तुला दाखवायचं आहे
दुर्गा आहे तु, काली आहे तु
उसळु दे भावना
सळसळु दे आत्मशक्ती
तुच आहे माता, तुच आहे भक्ती
दुखवेल जर कोणी तुला
करून टाक त्यांची हानी
ऐकून येईल डोळ्यात पाणी

सारे जग हे आहे आझाद
मग तुचं का या बंधनात
तुलाच का सक्ती
तोड सारे बंधने
कर स्वतःची मुक्ती
उसळु दे भावना
सळसळु दे आत्मशक्ती

ऐक स्त्री जन्मा ही तुझी कहाणी
ऐकून येईल डोळ्यात पाणी

घे उंच उंच भरारी
तुला पक्षासारखे उडायचे आहे
स्त्री जन्माचे सार्थक करून
आभाळाला भिडायचे आहे
तुच आहे चंडिका
तुचं झाशीची राणी
ऐक स्त्री जन्मा ही तुझी कहाणी
ऐकून येईल डोळ्यात पाणी
सोड आता तरी ही उदास वाणी.

सौ. अनिता भागवत येवले

आयुष्य

“आयुष्य”

आयुष्य, आयुष्य म्हणजे काय आहे?
जगण्याची एक हाव आहे.
चढ-उतार होणारा,
प्रेमळ भाव आहे.

आयुष्य म्हणजे काय आहे ?
वाहत्या पाण्यातील नाव आहे.
फाटलेल्या पतंगाचा ताव आहे.
पाण्याच्या काठावर वसलेले,
एक गाव आहे.

आयुष्य म्हणजे काय आहे ?
सुख आले पदरी की स्वर्ग आहे.
आणि दुःखाच्या झळा लागल्या,
की नर्क आहे.

आयुष्य म्हणजे काय आहे ?
झाडाचं पिकलेलं पानं आहे.
मोल जाणलं त्याचं की,
सोन्याची खान आहे.
अन्यथा उजाडलेलं,
ओसाड रान आहे.

आयुष्य म्हणजे काय आहे ?
यमाच्या दारात बांधलेली गाय आहे.
हळदी-कुंकाने पुजलेले तिचे पाय आहे.
नाहीतर, नाहीतर
कसायाच्या हाती दिलेली माय आहे.

आयुष्य म्हणजे काय आहे ?
देवाने दिलेले अनमोल धन आहे.
उपयोग चांगला केला तर पुण्य आहे.
फुकट गेलं तर पाप आहे.
देवाच्या हाती असलेल्या,
तराजूचे माप आहे…..

सौ. अनिता भागवत येवले
बुलडाणा

"साथ"

“साथ”

खडतर अशा प्रवासात या
साथ मला देशिल का?
नाही मागत गाडी बंगला
कष्टाचा एक घास मला देशिल का ?

येतील किती जातिल किती
सगे-सोयरे भेटतिल किती ?
काटेरी या वाटेमध्ये
सुंदर बाग फुलवशिल का ?

चल उठ आता, चल उठ आता
ओढू हा संसाररूपी रथ.
पण शपथ आहे तुला
या सुंदर रथाचा सारथी तु होशिल का ?

वाटेवर या चालतांना
भेटतील तुला सांगणारे.
ऐकून तु त्यांचे कधी तरी,
साथ माझी सोडशिल का ?

आयुष्य माझे कमी पडले,
तुझ्या सोबत जगण्यासाठी
पण जोपर्यंत श्वास आहे.
तो पर्यंत सावली माझी होशील का ?
सावली माझी होशील का ?

सौ. अनिता भागवत येवले
बुलडाणा