शहराचं येडं

Shaharach Yed Kavita

शहराले जायचं येडं करी भल्याभल्याले येडं,
मशिनीगत धावणाऱ्या शहरापरीस बरं आपलं खेडं ।
दोन घडीक बोल्याले न्हाई कोण्याले फुरसत,
पैका कमावतात लोकं पर आयुष्यात न्हाई बरकत ।। १ ।।

इमारती येवढ्या उंच नजर पुरत न्हाई,
मानसायची गर्दी येवढी पाय ठेव्याले जागा भेटत न्हाई ।
नुसतं दिव्यानं चाकाकणार जग हे,
पण माणुसकीचा राजा पत्त्याचं दिसत न्हाई ।। २ ।।

दंगली, खून, दरोडा, अक्सिडेंट हे तं रोजचंच झालं,
त्याशिवाय लोकायलेबी चैन पडत न्हाई ।
परत्येक माणूस जगण्यासाठी एकदुसऱ्याचा गळा कापतो,
इमानदारी, संस्कृती, सभ्याचाराचं इथं दर्शन बी घडत न्हाई ।। ३ ।।

माणसाचं मशिनीबिगर काम अडतं,
पर माणसाचं माणसाबिगर काम अडत न्हाई ।
माणसाचा मशिनिवर जीव जडतो,
पर माणसाचा माणसावर जीव जडत न्हाई ।। ४ ।।

इथं राजा शेजारी शेजाऱ्याले वयखत न्हाई,
मारून बी टाकलं शेजाऱ्याले तारिबीन कोण्यालेच हरकत न्हाई ।
माणसाच्या या रानात खोट्या परतिष्ठेचं बी पेरल्या जातं,
पर मनाच्या शांतीची हिरवय इथं कधीच उगवतचं न्हाई ।। ५ ।।

अजीतसिंघ जाठ.
मो : +९१ ८१४९३१७१११

स्पर्शगंध प्रीतीचे

Sparshgandh Pritiche Poem

मी ओठांनी काहीही न बोलता,
तुझे तु समजून घ्यावे |
निर्बोल निरागस प्रेम माझे,
डोळ्यातून तूजला केव्हा कळावे || १ || मी ओठांनी…

स्वप्नफुलांचा तुझ्या गं मनी,
फुलला वसंत तूज केव्हा कळावे |
प्रेमात शब्दांचा संबंध येतोच कुठे,
हे तर प्रेमींच्या नजरेत दिसावे || २ || मी ओठांनी…

तुझ्या आयुष्याच्या स्वप्नवेलीवर सखे,
माझ्या प्रीतीचे सुमन फुलावे |
पाषाणरूपी हृदयात तुझ्या,
माझ्या प्रेमाचे झरे खुलावे || ३ || मी ओठांनी…

एकच इच्छा वसे मनात माझ्या,
हसतखेळत तुझसंगे आयुष्य जगावे |
प्रीतीच्या ह्या पहिल्या सरींचे,
स्पर्शगंध तूज केव्हा कळावे || ४ || मी ओठांनी…

माझ्या वेडेपणाचे स्थान मनी काय तुझ्या,
नयनातून सखे तु व्यक्त करावे.
मी ओठांनी काहीही न बोलतो,
तुझे तु समजून घ्यावे || ५ || मी ओठांनी…

 

अजीतसिंघ जाठ.
मो : +९१ ८१४९३१७१११

मनाचं स्वातंत्र

Mind Independence Poem.

अर्ज विनंत्या करून मिळालेली,

कोणतीच गोष्ट मला नको.

अपयशाची लढता लढता,

मरणे मला आवडेल.

परंतु कोणाचीही दया,

घेऊन जगणे मला नको.

आयुष्याच्या वाटेवर एकटाच जिद्दीने जगेल,

परंतु कोणाच्या मदतीचा हात मला नको.

काही क्षनजरी जगलो तरी स्वाभिमानाने जगेल,

परंतू कोणासमोर नतमस्तक होऊन जगणे मला नको.

मी कोणावरही अत्याचार करणार नाही,

परंतू मला सुद्धा कोणाचा त्रास नको.

कोणाच्या गुलामगिरीने जीवन जगण्याचा,

आभास सुद्धा मला नको.

माझ्या मनाच्या स्वातंत्र्यावर,

मला कोणाचा हल्ला नको.

जसा आहे तसाच मी जीवन जगणार,

कोणाचाही फूकट सल्ला मला नको.

 

अजीतसिंघ जाठ.
मो : +९१ ८१४९३१७१११

"घर"

“घर”

घर ही स्वतःची जागा आहे ,
म्हणुन त्याला घर म्हणता येत नाही.

जाण्या-येण्याचा रस्ता आहे,
म्हणून त्याला दार म्हणता येत नाही.

घर म्हणजे आशेची असलेली किरणं,
सूर्याचं असलेलं तेज.

प्रपंचात राहून केलेला परमार्थ,
कुटूंबातील सर्वांसाठी त्यागलेला स्वार्थ.

संसाररूपी मंदिरात असलेल्या,
आई वडलांची पूजा.

जिव्हाळा असेल सर्वांसाठी नाही अंतर्भाव दुजा,
घर म्हणजे नुसत्या चार भिंती.

एक उंबरठा आणि दोन खिडक्या नाही,
डोक्यावर सावली आहे म्हणून ते छत नाही.

आपुलकी, प्रेम, जिव्हाळा, माया
ह्या चार भिंती त्यांची शीतल छाया.

उंबरठा म्हणजे घराची मर्यादा
खिडक्यांतून वाहावी वाऱ्याची झुळूक सदा.

डोक्यावर असलेला मायेचा प्रेमळ हात म्हणजे
घराचं असलेलं छत जेथे सावली मिळते सुखाची असं माझं मत.

घरात व्हावा नेहमी थोरा-मोठ्यांचा आदर
आला पाहुणा कधी करावा स्नेह भाव सादर.
असेल असं वातावरण जिथे तेचं घर-दार

सौ. अनिता भागवत येवले (बुलढाणा)

स्त्री जन्मा ही तुझी कहाणी

marathi kavita

ऐक स्त्री जन्मा ही तुझी कहाणी
ऐकून येईल डोळ्यात पाणी
तुझ्यात आहे सुर्याचे तेज
नवदुर्गांची अनमोल शक्ती
तरीही तुझी का? अशी उदास वाणी
ऐकून येईल डोळ्यात पाणी

बघ हे जग काय म्हणजे तुला
अबला आहेस तु
निराधार आहेस तु
उठ तुला दाखवायचं आहे
दुर्गा आहे तु, काली आहे तु
उसळु दे भावना
सळसळु दे आत्मशक्ती
तुच आहे माता, तुच आहे भक्ती
दुखवेल जर कोणी तुला
करून टाक त्यांची हानी
ऐकून येईल डोळ्यात पाणी

सारे जग हे आहे आझाद
मग तुचं का या बंधनात
तुलाच का सक्ती
तोड सारे बंधने
कर स्वतःची मुक्ती
उसळु दे भावना
सळसळु दे आत्मशक्ती

ऐक स्त्री जन्मा ही तुझी कहाणी
ऐकून येईल डोळ्यात पाणी

घे उंच उंच भरारी
तुला पक्षासारखे उडायचे आहे
स्त्री जन्माचे सार्थक करून
आभाळाला भिडायचे आहे
तुच आहे चंडिका
तुचं झाशीची राणी
ऐक स्त्री जन्मा ही तुझी कहाणी
ऐकून येईल डोळ्यात पाणी
सोड आता तरी ही उदास वाणी.

सौ. अनिता भागवत येवले

गण्याची हुशारी

marathi joke in Buldana

मास्तर : समज तुले दहा आलुगोंडे देले
गण्या : पण मले काहून देता ते आलुगोंडे.
मास्तर : समज न बे देले ! फालतूंच बोलू नको
गण्या : पण मी काहून समजू, माह्या हाती देले काय तुमीन ?
मास्तर : समज न बे ! समजायले तुया काय बापाचं जाते.
गण्या : बरं समजतो, मंग पुढे काय ?
मास्तर : त्याच्यातले पाच आलुगोंडे मीन खाल्ले त मंग सांग तुयाकडे किती आलुगोंडे राह्यले ?
गण्या : इस आलुगोंडे राह्यले !!
मास्तर : कसं काय बे ?
गण्या : समजणं बे, तुया तरी बापाचं काय जाते ?
🙂 🙂 🙂