मेघलक्ष्मी सोबत काय झालं असेल ?

कोल्हापुरातील एक छोटेसे गाव ‘भिरवडी’. डोंगराळ भागात असलेले हे छोटेसे पण अतिशय सुंदर असे गाव. गावाजवळच एक छोटासा डोंगर होता. तेथून पुढे छोटेसे जंगल चालू होत होते. हे जंगल पार करून गेल्यास थेट दुसऱ्या गावाची वेस लागत होती. जंगल फार मोठे नसले तरी घनदाट होते. ‘मोघरान’ असे या जंगलाचे नाव होते. हे नाव का आणि कसे पडले हे माहित नाही पण गावातील लोक मोघ्याचे जंगल म्हणूनही संबोधित असत. गावातील लोक हे जंगल पार करायचे असल्यास मोठा चमू तयार करूनच येथून जात असत आणि ते हि दिवसा. रात्री कोणी येथून जाण्याची हिम्मत करीत नव्हते. आणि या गोष्टीला कारणही तसेच होते…

फार वर्षापूर्वी गावावर एका रात्री दरोडा पडला होता. तेव्हा गावातील लोकसंख्या फार कमी होती. दरोडेखोरांनी गावातील घर लुटली. सोने-नाणे, पैसा तसेच जो दिसेल तो मौल्यवान ऐवज त्यांनी लुटला. काही निर्भीड तरुणांनी खूप प्रतिकार केला पण त्यात त्यांना प्राण गमवावा लागला. त्या निर्दयी दरोडेखोरांच्या सरदाराच्या नजरेत एक स्त्री भरली. मेघलक्ष्मी असे तिचे नाव होते. त्याने मागचा पुढचा विचार न करता तिला उचलले आणि आपल्या सोबत घेऊन गेला. भयभीत झालेल्या तिच्या नवऱ्यानेही काहीच प्रतिकार केला नाही. मेघलक्ष्मी रडत किंचाळत होती. दरोडेखोराच्या तावडीतून सुटण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होती पण सारे निष्फळ ठरले.

दुसऱ्या दिवशी भयभीत झालेल्या मेघलक्ष्मी च्या नवऱ्याने काही गावकऱ्यांना सोबत घेऊन मेघलक्ष्मी चा शोध सुरु केला तेव्हा गावाजवळच्या जंगलात त्यांना मेघलक्ष्मी चा मृतदेह झाडाला लटकताना दिसला. अतिशय भयंकर असे दृश्य होते ते. मेघलक्ष्मीचे डोळे खोबणीतून बाहेर पडून लटकत होते. खोबणीच्या खालून सुकलेल्या रक्ताची काळी धार दिसत होती. विचकलेले दात एकमेकांवर दाबून ठेवले होते, आणि त्यावर सुकलेल्या काळ्या रक्ताची किनार. हाताचे दोन्ही पंजे दुमडलेल्या अवस्तेत आणि शरीर ताठ झाले होते. मृत अवस्थेतही मेघलक्ष्मीच्या चेहऱ्यावर जळजळीत क्रोध दिसत होता. सुंदर रूपवान मेघलक्ष्मी चा इतका करुण आणि निर्दयी अन्त पाहून लोक हळहळले. ते भयानक दृश्य बघून घाबरलेला तिचा नवरा ओरडत किंचाळत पळत सुटला. लोकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण तो सैरावरा पळत तेथून निसटला.

पोलिसांनी मेघलक्ष्मीचा मृतदेह ताब्यात घेतला आणि तिच्या नवऱ्याचा शोध सुरु केला. दोन दिवसांनी तिचा नवरा जंगलातील विहिरीजवळ मृत अवस्थेत सापडला. त्याचे डोळे विस्फारलेले होते जणू मरताना समोर त्याने अति भयंकर असे काही पहिले असावे. तोंड सताड उघडे होते जणू मरताना त्याने मोठी भीतीदायक किंकाळी फोडली असावी.

काही लोकांच्या म्हणण्यानुसार मेघलक्ष्मीने आत्महत्या केली होती तर काही म्हणत दरोडेखोरांनी तिला मारले. मेघलक्ष्मी आणि तिच्या नवऱ्याच्या मृत्यूबद्दल गावात मोठा शोक पसरला. बरेच दिवस चर्चा चालू राहिली. पोलिसांचे तपास सत्र चालू होते पण ठोस असे पुरावे काहीच मिळाले नाहीत. दिवस निघून गेले तशा चर्चा कमी होत गेल्या. गावातील जनजीवन पूर्वीप्रमाणे सुरळीत होऊ लागले. आणि पुन्हा एकदा अघटित घडले.

भिरवडी गावाच्या शेजारच्या गावात मोठा उरूस होता. दर वर्षीप्रमाणे भिरवडी गावातील लोक या यात्रेच्या निमंत्रणाला मान देऊन जात होती. बैलगाड्या, मोटार गाड्या भरून लोक यात्रा करून आले. यात्रा सुरळीत पार पडल्यानंतर जत्रेला उधान आले. तमाशाचे फड उतरू लागले तशे गावातील तरुणांची चलबिचल वाढू लागली. भिरवडी गावातील तरुण सुद्धा तमाशा बघायचा म्हणून घरातून रात्रीची निघत ते थेट सकाळी परत येत.

जत्रेचा तिसरा दिवस होता. रंगा रात्री तमाशाला जायचे म्हणून तयार होऊन बसला होता. भैरव त्याचा मित्र मोटार सायकल घेऊन येणार होता पण तो पायीच चालत त्याच्या घरी आला. मोटार सायकल बद्दल विचारल्यावर भैरवने मोटार सायकल बंद पडल्याचे सांगितले. रात्रीची वेळ होती. जायचे कसे हा विचार पडला होता. मुख्य रस्त्याने चालत गेलो तर खूप उशीर होणार, तमाशा पण बघायला मिळणार नाही आणि दमछाक होईल ती वेगळीच.

“रंग्या आजचा शेवटचा तमाशा हाय, बघितलाच पायजे गड्या”, भैरव.

“आर हो पर जायचं कस आता, समदी टाळकी पण गेल्याती आदीच, कोण म्हणून नाय आपल्यासोबत”, रंग्या.

मान गरागरा फिरवत भैरव उठला आणि म्हणाला, “ते काय न्हाय, उठ जंगलाच्या वाटेने जाऊ चल, पाटकन पोचतुय बघ”.

जंगलातून जायचे म्हटल्यावर रंग्या थोडा बावरला पण तमाशाचे खूळ डोक्यावर नाचत होते. दोघेही उठले आणि चालत माळावर येऊन पोचले. समोर घनदाट जंगल होते. आकाशात अर्धचंद्र आणि चांदण्या टीमटीमत होत्या. त्यांचा निळसर प्रकाश पडला होता. हातात छोटा दिवा घेऊन दोघेही जंगलात शिरले. पायाखालचा सुकलेला पाला पाचोळा कर्र्र्रर्र क्र्रर्र्र वाजवीत दोघेऊ घाई घाईत चढ उतर करीत निघाले होते. भयाण अशा रानात रंगा आणि भैरव दोघेच चालत होते. कधी कुत्र्याचे रडणे ऐकू येई तर कधी घुबडाचे घुत्कार. दोघेही आता जंगलाच्या मध्यावर येऊन पोचले होते. समोर मोठ मोठी झाड होती. हवेतला गारवा कमालीचा वाढला होता. आणि अचानक रंग्या चालता चालता थांबला…

“का रे काय झाल”, भैरव.

“भैरू हे…हे म्होरच झाड बघ”, रंग्या चाचरत बोलला.

“का रे काय झालंय झाडाला?”, भैरव.

“हे… तेच झाड हाय. त्या मेघलक्ष्मीन हिथं….”, रंगा.

“आर..गप… कशाला न्हाय त्यो विषय… गप बस”, भैरव.

समोरचे ते मोठे झाड स्तब्ध उभे होते. गार वारा अंगाला झोंबू लागला होता. रंगा आणि भैरव दोघेही आता झपझप चालू लागले. थोडे अंतर चालून गेल्यावर एक छोटा ओढा लागला. रंगा आणि भैरव ओढा पार करण्यासाठी खाली उतरले. आणि अचानक सर्रर्रर्र सर्रर्रर्र करीत काहीतरी भैरवाच्या मागच्या बाजूने निघून गेले. दोघेही दचकले, गर्भगळीत झाले. घाबरून दोघेही इकडे तिकडे बघू लागले पण काहीच दिसले नाही. दोघांच्याही अंगातली थरथर आता वाढू लागली होती. पोटात गोळा आला होता. झपझप पाय टाकीत दोघेही ओढ्याच्या वर आले. एकमेकांचा हात पकडून दोघेही चालत होते आणि पुन्हा…

छम… छम…छम… छम…छम… छम…

पैंजणाचा आवाज कानावर आला तसे दोघेही घाबरले. अंगावर सरसरून काटा आला आणि मानेवरचे केस ताठ झाले. मागे वळून पाहिले तर कोणीच दिसत नव्हते. पण दोघेही आता चांगलेच गांगरून गेले होते. एकमेकांना घट्ट चिकटून दोघेही लटपटत चालू लागले. दहा बारा पावलं चालून जाताच एक भेदक किंकाळी दोघांच्याही कानावर आली दोघांनीही मागे वळून पहिले आणि त्याचक्षणी एक मुंडके सरपटत त्यांच्या दिशेने येताना दिसले. दात विचकलेले, डोळे बाहेर आलेले आणि पूर्ण चेहरा काळ्या रक्ताने माखलेले ते मुंडके त्यांच्याकडे बघून किंचाळत होते. मुंडक्याच्या मागे लांबलचक मान वळवळत होती आणि त्यामागे लिबलिबीत अशे शरीर सरपटत होते.

दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली. पळून जाण्या इतकेही त्राण उरले नाही. पाय लटपटत होते थर थर कापत होते. एखाद्या अमानवी शक्तीने शरीर जखडून ठेवावे तशी अवस्था दोघांची झाली. एकमेकांचे घट्ट पकडलेले हात गळून पडले होते. ते मुंडके दोघांच्या दिशेने भर भर सरपटत येत होते काही क्षणातच त्या मुंडक्याने भैरवच्या दिशेने झेप घेतली ते सरळ जाऊन त्याच्या चेहऱ्यावर आदळले. तत्क्षणी रंगाचे जखडलेले शरीर अचानक हलके झाले, विजेच्या चपळाईने तो तेथून पळत सुटला. धावता धावता एक भयंकर किंकाळी रंग्याच्या कानावर पडली.

दुसऱ्या दिवशी रंगा गावाबाहेर सापडला. त्याच्या अंगावरचे कपडे मातीने माखलेले होते. केस पिंजारले होते. खाली बसून तो वेड्यासारखे काहीतरी बडबडत होता. ‘भैरूचा तमाशा झाला…मी वाचलो…मेघलक्ष्मी आली परत…’ अशी असंबंध आणि अखंड बडबड तो करीत होता. रंग्याला इस्पितळात दाखल केले गेले आणि भैरव चा शोध सुरु केला. जंगलाच्या मध्यभागी भैरवचा मृतदेह सापडला. त्याचे डोळे विस्फारलेले होते… तोंडाचा जबडा उघडा होता. शरीर रक्ताने माखलेले होते…

या घटनेला आता बरीच वर्ष उलटली. पण आजही या गावातल्या लोकांना जंगलातून चित्र विचित्र आवाज ऐकू येतात. जंगलाजवळील माळावर शेतात काम करणाऱ्या बऱ्याच शेतकऱ्यांना येथून भर दुपारी किवां रात्री किंचाळण्याचे ओरडण्याचे आवाज ऐकू येतात. कधी पैंजणाचा आवाज, कधी मधुर आवाज देऊन बोलावणे तर कधी गुरगुर ऐकू येते.

दिपक कदम

ही कथा फक्त मनोरंजनासाठी असून एमएच २८.इन अशा कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अथवा याच्याशी एमएच २८.इन चा कुठलाही संबंध नाही.