श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची येत्या १९ फेब्रुवारी २०१७ रोजी ३८७ वी जयंती. त्या निमित्ताने बुलडाण्यात छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सवाच्या वतीने गतवर्षीपासून ऐतिहासिक आणि भव्य-दिव्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.
शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने बुलडाणा येथे भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्याची सुरुवात दि. १७ फेब्रुवारी २०१७ रोजी सायंकाळी ६ वाजता गांधी भवन, बुलडाणा येथील व्याख्यानाने होणार आहे. शाहीरी पोवाडा हा कार्यक्रम दि. १८ फेब्रुवारी रोजी तर दि. १९ फेब्रुवारी २०१७ रोजी सकाळी ९ वाजता जिजामाता प्रेक्षागार, बुलडाणा येथे महाराजांना मानवंदना देण्यात येणार आहे यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची ५१ फुट प्रतिमेला स्वराज्याच्या प्रमुख पाच गडावरील जलाने जलाभिषेक करण्यात येईल व माँ जिजाऊ जन्मस्थळ सिंदखेडराजा येथून अखंड ज्योतीचे आयोजन करण्यात येईल. शहरात शिवजयंतीनिमित्त अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पारंपरिक शिवजन्मोत्सव लोकनृत्य, शाहीरी, पोवाडा, समुहगान इ. कार्यक्रम सादर करण्यात येतील. भव्य शोभा यात्रा हि दि. १९ फेब्रुवारी २०१७ रोजी दुपारी ३ वाजता संगम चौक, बुलडाणा येथून प्रारंभ होईल. या शोभा यात्रेचे विशेष आकर्षण महाराजांच्या ३८७ व्या जयंती निमित्त माँसाहेब जिजाऊंच्या वेशभूषेत ३८७ जिजाऊंच्या लेकी राहतील.