तुमचे एटीएम व्यवहार कसे सुरक्षित ठेवाल ?

atm withdral in buldana

पैसे काढण्यासाठी सर्वच जण आता बँकेच्या रांगेत उभे न राहता एटीएम ला प्राधान्य देतात. एटीएम्स खूपच सोयीची आहे आणि एटीएममधून पैसे काढणे, हे तुमचे पैसे मिळवण्याचे सर्वात झटपट मार्ग आहे. अनेक ठिकाणी एटीएम वर सूचना दिलेल्या असतांनाही त्याचे पालन होत नाही. कोणत्याही प्रकारे पैसे काढताना सुरक्षेच्या दृष्टीने जागरूकता बाळगणे, हे तुमच्या खात्याच्या सुरक्षेबरोबर होणाऱ्या तडजोड टाळण्यासाठी उपयोगी राहील.

तुमचे एटीएम व्यवहार सुरक्षित ठेवण्यासाठी कृपया खाली दिलेल्या सुरक्षेच्या सूचनांचा अवश्य पालन करा:
तुमचा पिन नंबर लक्षात ठेवा आणि तो कुठेही लिहू नका किंवा कुणालाही सांगू नका. २. तुमचा एसएमएस, अकाउंट बॅलन्स आणि बँक स्टेटमेंट्स तपासून पहा आणि त्यात काही चुक आढळल्यास संबंधित बँकेला तात्काळ कळवा. ३. व्यवहार करण्याआधी तुमचे कार्ड कुणीही अनोळखी व्यक्ती, कुटुंबातील सदस्य, मित्र किंवा बँक अधिकाऱ्यांच्या हाती देऊ नका. ४. तुमचे एटीएम वापरताना कुणाही अनोळखी व्यक्तीची मदत घेऊ नका. ५. व्यवहार करताना रांगेतील (क्यूमधील) अन्य लोकांबरोबर सुरक्षित अंतर ठेवा. ६. नेहेमी एटीएम मशीनच्या जवळ उभे रहा आणि अंतर ठेवा. ७. पैसे काढताना इतर लोकांना एटीएम मशिनभोवती गर्दी करू देऊ नका. ८. पिन एंटर करताना कीपॅड झाकण्यासाठी तुमच्या शरीराचा व हाताचा उपयोग करा. ९. व्यवहार केल्यांनतर तुमची ट्रँजॅक्शन स्लिप एटीएम मध्ये सोडू नका. ती टाकण्यापूर्वी तिचे बारीक तुकडे करा. १०. एटीएम पासून दूर जाताना ‘कॅन्सल’ बटन आठवणीने दाबा.११. तुमचे कार्ड आणि ट्रँजॅक्शन स्लिप न विसरता सोबत घ्या.

बुलडाणा येथील एटीएम वर मिळते ‘झेड सेक्युरिटी’

बुलडाणा शहरात किमान २० एटीएम मशीन असतील. त्यामध्ये अनेक मोठ्या बँकासोबत इतर पतसंस्था आणि छोट्या मोठ्या बँकांचे एटीएम आहेत. २ महिन्याआधी झालेल्या नोटबंदीमुळे ही सर्व एटीएम भरलेली असायची. पैशानी नव्हे तर गर्दीने. पैसे असो वा नसो परंतु एक जण आत शिरला की त्यामागे इतर जण असे करता करता रांगच लागायची ती अजून सुद्धा कमी झालेली नाही. बुलडाणा शहरात असलेल्या या एटीएम मशीन पैकी फक्त काहीच मशीन मध्ये पैसे मिळतात तर काही अनेक दिवस तसेच पडलेले असतात. अनेक एटीएम सकाळ ते संध्याकाळ आपली “ड्युटी” बजावतात. संध्याकाळी त्यांचे ‘शटर डाऊन’ होत असते. त्यामुळे लोकांच्या समस्येत अजूनच भर पडते.

प्रत्येक एटीएम मध्ये एक सूचना लिहिलेली असते “एका वेळी एकाच व्यक्तीने प्रवेश करावा” इ. ही सूचना मनुष्यासाठी असते. ती सूचना वाचून तिथे पैसे काढण्यासाठी येत असलेली लोक त्याचे तंतोतंत पालन करतील अशी ‘खोटी आशा’ ती सुचना लिहिणाऱ्यास वाटली असावी. परंतु त्याचा घनघोर अपमान करण्याचा विडा काही सुशिक्षित नागरिकानी उचलला आहे. सुचना असलेली ती पाटी/फलक समोर असून सुद्धा खिशात एटीएम मशीन चे कार्ड घेऊन फिरणारे अनेक बहाद्दर एटीएम असलेल्या खोलीत गर्दी करतात. पैसे काढत असलेल्या व्यक्तीभोवती गर्दी करून उभे राहतात जणू काही त्याला ‘झेड सेक्युरिटी’ पुरवीत आहेत. तर काही जणांना मोबाईल वर बोलण्याचा मोह एटीएम मशीन कक्षात सुद्धा आवरला जात नाही. या ठिकाणी सुरक्षा रक्षक असतो परंतु तो सुद्धा कुठे निघून गेलेला असतो तो संध्याकाळ पर्यंत कळत नाही.

हा वृत्तांत जवळपास सर्वच ठिकाणचा आहे. काही एटीएम याला अपवाद असतीलही परंतु पोलीस मैदाना जवळ असलेल्या एसबीआय च्या एटीएम वर हमखास दिसून येतो. अशा सर्व ठिकाणी सुरक्षा रक्षक हवा आणि त्याने तिथे येत असलेल्या लोकांना मार्गदर्शन करून शिस्तीचे पालन करायला मदत केल्यास परिस्थिती बदलू शकते.