पंक्चर झालेल्या एसटी बसचे चाक दुरुस्त करून देण्यास उशीर केल्याने थोडा नव्हे तर तब्ब्ल अडीच तास प्रवाशांचा खोळंबा होऊन मानसिक त्रास होण्याची घटना औरंगाबाद येथे घडली. रविवार दि. २४ डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे नाशिक येथून बुलडाणा येथे जाण्यासाठी निघालेली बस औरंगाबाद स्थानकात पोहोचली. दुपारी १२ वाजता ही बस बुलडाणा कडे निघाली असतांना बस स्थानका बाहेरच बसच्या मागील उजव्या बाजूचे टायर पंक्चर असल्याचे चालकाच्या निदर्शनास आले.
त्यामुळे बस प्रवाशांसह पुन्हा बस स्थानकात घेऊन जाण्यात आली. त्याठिकाणी औरंगाबाद आगारात बस पंक्चर साठी घेऊन गेले असतांना दुसऱ्या डेपोची बस असल्याने कर्मचाऱ्यांनी त्वरित काम करून देण्यास नकार दिला.
नाशिक ते बुलडाणा ही लांब पल्ल्याची बस असून ती प्रवासात असतांना पंक्चर झाली होती. त्यामुळे सदर बस पंक्चरसाठी औरंगाबाद आगारात नेली. त्या ठिकाणी गाडीचे पंक्चर काढण्यास प्राधान्य न देता; आगारातील कर्मचाऱ्यांनी इतर कामासाठी डेपोमध्ये थांबलेल्या गाड्यांकडे लक्ष दिले. यामुळे नाशिक ते बुलडाणा जात असलेल्या गाडीस १०-१५ मिनिटे नव्हे तर तब्बल २. ३० तास औरंगाबाद मध्ये उशीर झाला. अखेर पावणे तीन च्या सुमारास बस पुढील प्रवासास मार्गस्थ झाली. याठिकाणी औरंगाबाद येथील आगारात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितल्यावर सुद्धा विलंब केला. अखेर वैतागलेल्या नाशिक ते बुलडाणा बसच्या चालक आणि वाहकांनी स्वतः गाडीचे चाक खोलून दिले परंतु कर्मचारी त्या नंतर जेवणास निघून गेल्याने बसचे पंक्चर राहून गेले. कर्मचारी जेवून आल्यानंतर पंक्चर काढण्यात आले . त्यामुळे २. ४५ च्या सुमारास बस बुलडाणा कडे मार्गस्थ झाली. परंतु कर्मचाऱ्याच्या दिरंगाईमुळे, ३.३० ला बुलडाणा येथे पोहोचून पुन्हा नाशिक कडे जाणाऱ्या ह्या बसला बुलडाणा येथे पोहोचण्यासच संध्याकाळचे ६. ३० वाजले होते.