जग अधिक आधुनिक होत आहे आणि प्रवास अधिकच सुखकर होत आहे. त्यांत विमानप्रवास सुद्धा सामन्याच्या आवाक्यात आल्याने रोज कित्येक प्रवाशी विमानाने ये जा करतात. अर्थात प्रवाशी असो वा लष्करी विमाने आता महत्वाची भूमिका बजावत आहेत. परंतु मागील काही वर्षाचा आढावा घेतला तर समजून येईल की विमानांच्या अपघातात सुद्धा कमालीची वाढ झाली आहे. त्यातसुद्धा लष्कराच्या विमानांची अपघाताची संख्या जास्त आहे. अनेकदा अपघात का होतो हे सुद्धा कळून येत नाही कारण विमानातील ‘ब्लॅक बॉक्स’ सापडत नाही. आज आपण जाणून घेवू ह्या ‘ब्लॅक बॉक्स’ बद्दल.
विमानात नारंगी रंगाचे एक इलेक्ट्रोनिक रेकोर्डिंग यंत्र असते त्यालाच आपण ‘ब्लॅक बॉक्स’ म्हणून ओळखतो. दुर्घटना झाल्यानंतर ह्या ‘ब्लॅक बॉक्स’चा उपयोग अपघाताचे कारण शोधण्यासाठी होतो. फ्लाईट डाटा रेकोर्डर (FDR) म्हणजे ‘ब्लॅक बॉक्स’ विमानातील प्रत्येक हालचालींचे रेकोर्डिंग करून एका पैरामीटर वर जतन करून ठेवतो. तसेच द कॉकपिट व्होईस रेकोर्डर (CVR) हे यंत्र कॉकपिट मधील हालचाली तसेच वैमानिकांचे संभाषण सुद्धा रेकॉर्ड करत असते. अश्या प्रकारे विमानात होत असलेल्या सर्व घटनांचे जतन या दोन्ही ‘ब्लॅक बॉक्स’ द्वारे केल्या जाते. त्यामुळे नंतर अपघाताचे मुळ कारण शोधण्यास मदत होते.
‘ब्लॅक बॉक्स’ चा शोध
‘ब्लॅक बॉक्स’ चा शोध ऑस्ट्रेलिया च्या डॉ. डेविड वारेन यांनी लावला. सन १९५० ला डॉ. वारेन यांना मेलबोर्न येथे एरोनोटिकल रिसर्च लेबोरेटरी येथे कार्यरत असताना ‘द कॉमेट’ या विमानाच्या रहस्यमयी अपघाताचा शोध घेणाऱ्या टीम चा सदस्य होण्याची संधी मिळाली. या दरम्यान त्यांना समजले की, जर अपघातापूर्वी विमानातील परिस्थिती काय होती हे जर समजले असते किंवा ते रेकॉर्ड झालेले असते तर अपघाताचे निश्चित कारण कळले असते. त्या नंतर त्यांनी यावर कार्य करण्यास सुरुवात केली आणि त्याचा पहिला डेमो १९५७ ला दिला. ह्या डेमोच्या यशस्वीतेनंतर १९६० नंतर ऑस्ट्रेलिया ने प्रत्येक विमानात ‘ब्लॅक बॉक्स’ अनिवार्य केले. ह्या यंत्रामुळे आज जगातील प्रत्येक विमानात ‘ब्लॅक बॉक्स’ हे यंत्र दिसून येते आणि ते आपले कार्य चोखरित्या बजावत सुद्धा आहे. अपवाद ‘मलेशिया एयरलाईन्स; सारख्या घटनांचा आहे. ज्यामध्ये विमान हे समुद्रात कोसळते आणि त्यामुळे ‘ब्लॅक बॉक्स’ मिळवणे असंभव होते. त्यामुळे विमानात नेमका काय बिघाड झाला हे कळू शकत नाही. त्यामुळे ह्यावर सुद्धा तोडगा काढण्यासाठी इलेक्ट्रोनिक आणि रेडीओ चे प्रोफेसर ‘डेविड स्टेपल्स’ यांनी हा सर्व डाटा ‘क्लाउड ‘ वर संग्रहीत करण्याचा विचार मांडला आहे. ह्यामुळे वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होवून लवकरात लवकर रहस्यमयी अपघातांचे कारण कळू शकेल. सध्या तरी हा प्रस्ताव विचाराधीन आहे. डेविड स्टेपल्स’ यांचा प्रस्ताव ‘ब्लॅक बॉक्स’ च्या भूमिकेत मोलाचे सहकार्य करू शकतो हे मात्र खरे.