आता जळगाव जा. शहरावर नजर असणार आहे ‘तिसऱ्या डोळ्याची’. दिवस असो वा रात्र संपूर्ण शहर नजरेखाली असणार आहे. त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न कायमचा निकाली काढण्याच्या दृष्टीने एक पाऊल उचलले आहे. आ. संजय कुटे यांनी केलेल्या संकल्पनेनुसार जळगाव जा. ची स्मार्टसिटी कडे वाटचाल सुरु झाली आहे. आज जळगाव जामोद येथे सर्वत्र नाईट व्हिजन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. त्यामुळे आता शहरात होणाऱ्या अनेक अवैध धंद्यास, चोरी, छेडखानी यासारख्या प्रकारास आळा बसणार आहे.
येथील बस स्थानक चौक, न्यूईरा हायस्कुल, दुर्गा चौक, के के कॉलेज, मानाजी चौक, डॉ. दलाल हॉस्पिटल परिसर, सुनगाव वेस, जगदंबा मंदिर, सुलतानपूरा, खेर्डा वेस, भाजी बाजार, आंबेडकर पुतळा, चावडी इ. ठिकाणी नाईट व्हिजन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. यामुळे शहरातील शांतता भंग करणाऱ्या गुन्हेगारास वचक बसणार आहे. शहरातील शांतता आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पोलिसांना सहाय्य्य होणार असून शहरात वाढत असलेल्या चोरी, चिडीमारी, गुंडागर्दी सारख्या घटना कॅमेऱ्यात कैद होणार आहे. हे कॅमेरे थेट पोलीस स्टेशन ला जोडले असल्याने सर्व हालचाली स्टेशनातून टिपल्या जाणार आहे. बुलडाणा जिल्ह्यात सर्वप्रथम जळगाव जा. ला हा दर्जा मिळणार आहे. शहरवासी या कामाने आनंदित झाले असून नगर परिषदेचे कौतुक होताना दिसून येत आहे.