श्री विठ्ठल आरती
युगे अठ्ठावीस विटेवरी ऊभा । वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा । चरणी वाहे भीमा उद्धारी जगा ।।१।।
जय देव जय देव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।।धृ. ।।
तुळसी माळा गळा कर ठेवुनी कटी । कांसे पीतांबर कस्तुरी लल्लाटी ।
देव सुरवर नित्य येती भेटी । गरूड हनुमंत पुढे उभे राहती ।। जय देव ।।२।।
धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा । सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ।
राई रखुमाबाई राणीया सकळा । ओवळिती राजा विठोबा सावळा।। जय देव ।।३।।
ओवाळू आरत्या कुर्वड्या येती । चंद्रभागेमाजी सोडुनिया देती ।
दिंड्या पताका वैष्णव नाचती । पंढरीचा महिमा वर्णावा किती ।। जय देव ।।४।।
आषाढी कार्तिकी भक्तजन येती । चंद्रभागेमध्यें स्नाने जे करिती।।
दर्शनहेळामात्रें तया होय मुक्ती। केशवासी नामदेव भावे ओंवळिती।। जय देव जय देव ।।५।।
आषाढी एकादशी
महाराष्ट्रात आषाढी एकादशी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक भक्त विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरास पायी चालत येतात. भाविक भक्त चंद्रभागेत स्नान करून विठु माऊलीचे दर्शन घेतात. आषाढीच्या दिवशी पंढरपुरात शेगाव येथून श्री संत गजानन महाराजांची, आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येथे येत असते.
आषाढी एकादशी कथा
म्रुदुमान्य नावाच्या एका दैत्याने देवाधी देव महादेवांची आराधना करुन त्यांना प्रसन्न करुन घेतले आणि त्याच्याकडून वर मिळवीला की त्याला कोणत्याही प्राण्याकडून मरण प्राप्त होणार नाही, फ़क्त एका स्त्रीच्या हातून तो मरेल. या म्रुदुमान्याने या वराच्या जोरावर सर्व देवांना जिंकले आणि श्रीहरी विष्णू यांना जिंकण्यासाठी तो वैकुंठास गेला, या लढाईत श्रीहरी विष्णूचा पराभव होऊन ते देवाधी देव महादेवांकडे गेले पण महादेवही आपल्या वरामुळे हताश झाले होते. नंतर ब्रम्हदेव – विष्णुदेव – महादेव व सर्व देव एका पर्वताच्या गुहेत लपुन राहिले. तिथे काही दिवसानी ब्रम्हदेव – विष्णुदेव – महादेव या तीघांच्या श्वासाने एक देवी उत्पन्न झाली. तीच एकादशी देवी होय. तिने नंतर देवांना अभय देऊन म्रुदुमान्याला ठार मारले. देवांनी तीची स्तुती केली आणि तीनेही सांगितले की माझे एकादशीचे व्रत जे लोक करतील ते सर्व पापांपासून मुक्त होतील.
आषाढी एकादशीच्या दिवशी शेषशायी भगवान श्रीविष्णु शयन करतात आज पासून ते चार महिने पाताळात दैत्यराज बलीकडे निवास करतात कार्तिक शुक्ल एकादशीला ते उठतात. तोपर्यंत चार महिने शयन करतात. श्रीहरी आजपासून योगनिद्रेत जाणार म्हणून या आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी सुद्धा म्हणतात. यानुसार भाविक भक्त हे चार महिने व्रतस्थ राहतात. चातुर्मास व्रतारंभ आषाढी एकादशीच्या दिवशी पासुन होतो. याच दिवशी गावातल्या एखाद्या देवळात जाऊन अभंग गाऊन ती रात्र नामसंकीर्तन, भजन, पूजनात घालवितात. या नंतर पुढील चार महिन्यात अनेक व्रते पाळायची असतात ती पाळण्यासाठी सामर्थ्य प्राप्त व्हावे अशी प्रार्थना या दिवशी करण्यात येते. या चातुर्मासात गावागावात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
पंढरपूरची वारी
वर्षभरातील चोवीस एकादशींमध्ये आषाढी एकादशीचे स्वत:च वेगळे स्थान आहे. आषाढी एकादशी म्हटले की डोळयासमोर येते ती पंढरपुरची वारी. गेले शतकानुशतक शेकडो किलोमीटर चालत भक्तीेभावाने लाखोंचा समुदाय आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला जमा होतो. संतांची नगरी महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदायातील एक प्रमुख संप्रदाय आहे. या संप्रदायात वार्षिक, सहामाही याप्रमाणे तशी वारी करतात. भारताच्या आध्यात्मिक इतिहासातील ही एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. बहुतेक वारकरी वारी पायी करतात. ही वारी पायी केल्याने शारीरिक तप घडते. आषाढी एकादशीला पंढरपूरला वारी जाते. गेल्या आठशे वर्षांपासून अधिक काळ ही वारी चालू आहे.