ती तर अतृप्त आत्म्यांची अदृश्य दुनिया

प्रसंग २ सोन्याचा प्रेतलोकातील प्रवास

सदू बुआ सुरश्याला कथा सांगू लागले. काल जसा दगडू पिशाचच्या तावडीतून सुटला होता. तसेच आज सोन्या अदृश्य लोकातून परत येतो. त्याचा प्रेतलोकातील प्रवास खूप काही शिकवतो. हि कथा मला माझ्या आबांनी सांगितलेली आहे असे सदू बुआ सांगू लागले. सोन्या हा एकुलता एक मुलगा. त्याच्या आई-वडिलांनी त्याचा एवढा लाड केला की त्याला चांगले संस्कार द्यायचे ते विसरलेत. सोन्या जसा मोठा झाला तसा त्याने सर्व गावात उनाडक्या करून सर्वांना खोडकर वृत्तीने त्रास देणे सुरु केले. त्याच्या आई-वडिलांना कुणी सांगितले की तुम्ही याला एखाद्या आश्रमात नेऊन घाला आजवरच याला शिकायला पाठवलं असत तर हा असा बनला नसता.
त्याच्या घरचे त्याला किसना बुआकडे घेऊन जातात. व नम्र विनंती करतात की तुम्ही याला शिक्षण द्या. किसना बुआ त्याला ठेऊन घेतात. दिवसेंदिवस शांत आश्रमाचे वातावरण सोन्यामुळे बिघडते. गुरुजी त्याला दंडित करतात. हळू हळू त्याला तिथे राहण्याची सवय होते. पण त्याची वृत्ती हि खाण्यामध्ये, उनाडक्या करण्यामध्येच लागून असते. दिसायला धिप्पाड व उन्मत्त सोन्या त्याच्या कक्षात सर्वांपेक्षा मोठा दिसतो त्यामुळे त्याच्या कक्षातील सर्व मुल त्याला भितात. तो सांगेल तसे सर्वांना करणे भाग पडते, असेच एक दिवस उन्मत्त सोन्या सर्व मित्रांना घेऊन एक दिवस कुणालाच न सांगता जंगलात भ्रमण करायला जातो. जंगलात फिरत असताना नाल्या खोऱ्यात अंघोळ करणे, झाडांची फळे खाणे, गुल्लर ने पक्ष्यांना मारणे, झाडावरून पक्ष्यांची घरटी पाडणे, अशाप्रकारची मौज मजा करण्यातच सोन्याचा दिवस निघून जातो. ते सर्व एका टेकडीवर उभे असतात. व अचानक सोन्याच्या पाय सटकतो व सोन्या खाली दरीत कोसळतो सर्व मित्र आरडाओरड करतात तितक्यात सोन्या सर्वांच्या दृष्टीआड जातो. आणि दिसेनासा होतो.
इकडे सर्व मित्र आश्रमात पळत जातात आणि गुरुजींना जे घडले त्याचा सविस्तर वृतांत सांगतात. गुरुजी सर्वांवर रागवतात की कोणी सांगितले होते जंगलात जायला. माझी अनुमती घेतली होती का ? तेव्हा मुले बोलतात गुरुजी सोन्याने भीती दाखवली होती की त्याचे नाही ऐकले तर तो आम्हाला त्रास देईल. गुरुजी काही विशेष शिष्यांसोबत त्या जागेवर जातात आणि तपास करतात. पण सर्व प्रयत्न करून सुद्धा त्यांना यश मिळत नाही. सर्व आशा सोडून देतात. पण गुरुजी आशा सोडत नाहीत ते म्हणतात की मला काहीतरी वेगळ घडल असा संशय आहे. तो येईल. पण सध्या तो आपल्याला दिसू शकत नाही. आणि तिथून निघून जातात. सोन्याच्या आई बाबाला निरोप देऊन सूचित केल्या जाते. ते येऊन आबांना भेटतात आबा त्यांना सांगतात की, सोन्याच्या वर्तणूकी मुळेच सोन्या आज संकटात सापडलाय.
तुम्ही त्याचा एवढा लाड केला की त्याला पुरता बिघडवून ठेवलाय. या आश्रमातील सर्वात खोडकर मुलगा आहे तो. मला नेहमी हीच भीती होती की असे काही विपरीत घडू नये. असो. सध्या तुम्ही ईश्वराचे स्मरण करायला बसा. किसना आबा महादेवाचे एकनिष्ठ भक्त असतात ते सोन्याच्या कुशल मंगलतेसाठी महामृत्युंजय मंत्राचा जप करतात. तिकडे सोन्या एका सरोवरात पडतो व त्याला डोळ्यासमोर काही वेगळेच दिसायला लागते. तो एका भयानक साम्राज्यात जाऊन पोहचतो तिथे त्याला कुठेच उजेड दिसत नाही त्याला सर्वत्र अंधारच दिसतो. त्याला तिथे एक धुरांनी बनलेला वायुक्त राक्षस कवट्याच्या आसनावर बसलेला दिसतो. त्याच्या बाजूला एक काळे कुत्रे बांधलेले असते. त्या प्रेतराजच्या चारही बाजूला त्याचे अधीन भूत, प्रेत, आत्मे गोलाकार फिरत असतात. तो त्याच्या सहाय्यक प्रेतांना बोलतो की त्या जीवात्म्याला घेऊन या. सोन्याला प्रेत… प्रेतराज समोर हजर करतात. तिथे त्याला वेगवेगळ्या प्रकारचे भूत, चुडेल, असे अनेक विचित्र दृष्ट आत्मे बघायला मिळतात. सर्व त्याला त्रास देतात. कुणी अपघातात, कुणी इच्छा अपूर्ण असताना मेलेले लोक आणि त्यांचे अतृप्त आत्मे भटकतांना दिसतात. सोन्या बोलतो मी तर टेकडीवर उभा होतो पण माझा पाय सटकला व मी खाली पडलो पण मी इथे कसा आलो. प्रेतराज बोलला तू आला नाहीस तुला आम्ही आणल इथे, तुझ्यावर तर आमची दृष्टी खूप वर्षा आधीच होती. जेव्हा तुला आश्रमात आणले तेव्हा तुझ्या गुरूंनी तुला रुद्राक्ष दिला होता तो तू गळ्यात धारण केला नाहीस. कलावा हातात बांधायला तुला आवडत नाही. तेव्हाच आम्हाला समजल होत की तूच आमच्या इच्छा पूर्ण करू शकतोस. तू ज्या सरोवरात अंघोळ केली ते आमच अदृश्य सरोवर आहे ते जीवात्म्यांना दिसत नाही. तू जे काही फळ तोडून खाल्ली ती सुद्धा आमची आहेत. ती फळे नसून मासाची गोळे होती. तू सर्व नियम भंग करून भूतलावर जीवन व्यतीत करतो म्हणून तू आमच्या तडाख्यात सापडलास तू सध्या प्रेतलोकामध्ये आहेस.
आम्हाला जशी प्रवृत्ती पाहिजेत तू त्या प्रवृत्तीचा आहेस तुझी मानसिकता आमच्या सारखीच आहे. तुला सुद्धा दुसऱ्यांवर हुकुम गाजवायला आवडतो. दुसऱ्यांना विनाकारण त्रास द्यायला आवडतो. तू नित्य कुकर्म करतो. तुझ्या मित्रांना त्रास देतो. गुरूंचे ऐकत नाहीस. नेहमी असत्य बोलतोस. धर्म नियमानुसार तिथी, पवित्रता पाळत नाहीस. उद्धट सारखा बोलतोस. कुणाचाही अपमान करणे म्हणजे तुला विशेष वाटत नाही हि तुझी रुची आहे. नेहमी कामवासनेत तुझे मन अटकलेले असते. तुला मास-मदिरा सेवन करायला आवडते. या सर्व गोष्टी आमच्या सर्व प्रेतलोकांतील आहेत. हीच तर आमची प्रवृत्ती आहे. म्हणून आम्ही तुला आता पकडले आता तुला आम्ही सोडणार नाही. आता आम्ही तुझा आत्मा इकडे बंदिस्त करणार आणि तुझ्या शरीराच्या माध्यमातून आमच्या सर्व अतृप्त इच्छा पूर्ण करणार आणि सर्व त्याला पछाडतात. त्याला अतिशय वेदना होतात. त्याला त्यांच्या शक्तीचे प्रदर्शन दाखवतात. त्याला उचलून पटकतात, त्यावर काळ्या मांजरी सोडतात, त्याच्यावर वाटवाघुळ हल्ला करतात. त्याला असह्य वेदना होतात. त्याला एका शिळेला बांधून ठेवण्यात येते.
तिथे त्याला एक चांगला प्रेतात्मा भेटतो…. तो बोलतो पोरा इतक्या दिवस आश्रमात राहलास तुला मंत्र येत असतीलच त्यांचा उच्चार कर म्हणजे तू इथून सुटू शकतोस. मी दुसऱ्या लोकातील आहे मरणाच्यावेळी माझ्यात चांगले भाव होते म्हणून मी चांगला भूत बनलो. तू एक काम कर सध्या कृष्णपक्ष सुरु आहे सध्या या प्रेतांची शक्ती वाढलेली असते. अजून काही दिवस यांचा त्रास सहन कर. दोन दिवसांनी अमावस्या आहे त्या दिवशीच हे प्रेत तुझा देह धारण करतील. त्या दिवशी तर यांची शक्ती फारच वाढलेली असते. त्या दिवशी तुला हे जास्त त्रास देतील तुला जर गुरूची शिक्षा लक्षात असेल तर तस कर म्हणजे तुला वेदना कमी होतील. अमावस्ये नंतर शुक्ल पक्ष सुरु होतो त्यादिवशी जर तू इथे मंत्र उच्चारण करत बसला तर तू तुझ्या शरीरात जाऊन तुझ्या आप्तांजवळ जावू शकतोस आणि तो चांगला भूत निघून गेला.
पण सोन्याला काहीच आठवत नाही कारण त्याने कधीच त्यात रस घेतलेला नसतो त्याला फक्त उनाडक्या करणे आवडायचे. तो मनाशीच पुटपुटला मी तर कधीच काही शिकून घेतले नाही गुरुजी सांगायचे तेव्हा मी दुसऱ्यांच्या खोड्या करायचो आता मी कुठून मंत्र उच्चारू ? मला तर एक पण मंत्र येत नाही.  मी कधी कुठल्या देवाची पूजा केली नाही. आणि विचार करू लागला आठवू लागला त्याला गुरुजींनी काय काय शिकवलेलं आहे. आपण जीवनात कधीच गंभीर नव्हतो म्हणून आपल्याला काही येत नाही. आणि सोन्याला त्रास द्यायला प्रेत तिथे आली व त्यांनी सोन्यावर चमकणारी कुत्री छुवाडली…सोन्या कावरा-बावरा होऊन पळू लागला… काळ्या मांजरी त्याच्या गळ्याला चावा घेत होत्या…आणि तीतक्यात सोन्याला समोर एक प्रचंड काळ्या धुरांनी व्यापलेला, धग धगत्या आगीसारखा लालबुंद डोळे असलेला एक पिशाच्च समोरून येतांना दिसला आता तो सोन्यावर तुटून पडणारच तर… मध्ये कुणीतरी आडव आल आणि त्याने सोन्याला बाजूला सारल कोण असावे ते आपल्याला वाचवायला आल असेल असे सोन्या विचार करू लागला. पण सोन्याला थोडी सुद्धा कल्पना नव्हती कि ते रक्षण करायला आले कि त्याला नष्ट करायला… महाभयंकर दानव सोन्याच्या प्रतीक्षेत होता.
क्रमश:

ही काल्पनिक कथा असून त्याचा वास्तविकतेशी काही एक संबंध नाही. यातील नावे, ठिकाण, सर्व काल्पनिक आहे. फक्त मनोरंजनासाठी बनवली असून एमएच २८.इन अशा कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अथवा याच्याशी एमएच २८.इन चा कुठलाही संबंध नाही.