आरोग्यदायी आवळा

सध्या बाजारात आवळे उपलब्द्ध आहेत. तसे हिवाळ्यात येणारे हे फळ आहे. हिरव्या रंगाचे, औषध गुणांनीयुक्त असे हे फळ तुरट व आंबट चवीचे असते. आवळा हे फळ डोळ्यांसाठी खूपच हितकर असते, तिन्ही दोषांना संतुलित करून, शुक्रधातूचे पोषण करते. हे फळ आंबट असल्याने वात शांत करते, गोड व थंड असल्याने पित्त शांत करते, तुरट असल्याने कफ शांत करते. आवळ्यापासून विविध पदार्थ बनवली जातात. आवळा सुपारी, आवळा लोणचे, आवळा चूर्ण, आवळा मुरब्बा.
असे ऐकण्यात आहे रोज एक चमचा आवळा रस किंवा चूर्ण घेतल्याने मनुष्य जन्मभर निरोगी राहतो.त्याला लवकर आजार होत नाहीत. आवळा हा भाजला, उकडला, उन्हात वाळवला तरी त्याचे गुण कमी होत नाही. यात पांच रस आहेत. कच्चा आवळा मिठासोबत खाल्ल्यास शरीरास सर्व रस (षडरस) मिळतात. च्यवनप्राश या प्रसिद्ध औषधाचा मुख्य घटक आवळा हा आहे. म्हातारपण येऊ न देणे हा आवळ्याचा एक प्रमुख गुणधर्म आहे. आयुर्वेदातही आवळ्यापासून निरनिराळी औषधे तयार करतात.
धार्मिक दृष्ट्या याला फार महत्व आहे. आवळ्याच्या झाडत निरनिराळ्या देव देवता वास्तव करतात अशी मान्यता आहे. या झाडाच्या मुळात विष्णू, खोडात ब्रम्हदेव आणि फांद्यांमध्ये भगवान शंकराचे वास्तव्य आहे असा समज आहे. त्यामुळे हा वृक्ष विशेष पूजनीय आहे. कार्तिक महिन्यात केल्या जाणार्‍या तुळशीच्या लग्नात आवळा, उस, बोरे यांना महत्व आहे. आवळा हे एक पवित्र फळ असून ते अलक्ष्मीचा नाश करते अशी समजूत आहे. ज्याच्या घरी आवळ्याचा वृक्ष असतो त्या घरात भूतबाधा होत नाही असा समज आहे.
अशा या विविध गुणांनीयुक्त आवळा फळाची माहिती व उपयोग आपण आज बघणार आहोत.

आवळ्याचे उपयोग

आवळ्याच्या रसाने ज्ञानतंतू सशक्त होऊन स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.
पोटात जंत झाल्यास आवळा उपयोगी ठरतो.
चीरयौवन प्राप्तीसाठी आवळा उपयोगी ठरतो.
सांधेदुखी मध्ये आवळा उपयोगी आहे.
केसांच्या समस्या यांवर सुद्धा आवळा वापरल्या जातो.
केस गळणे, अकाली पिकणे या त्रासांवर आवळ्याच्या चूर्णाने केस धुण्याचा खूपच उपयोग होतो.
इतर फळांपेक्षा आवळ्यात क जीवनसत्व भरपूर असल्याने रोगप्रतिबंधक शक्ती वाढते.
विकारग्रस्ताला विकारमुक्त करण्यासाठी विकारमुक्ताला जास्त सशक्त करण्यासाठी आणि वृद्धांना स्फूर्ती आणण्यासाठी आवळा गुणकारी आहे.
खूप उचकी लागत असेल आणि पाणी, साखर वगैरे खाऊनही थांबत नसेल तर आवळ्याचा रस मधात मिसळून थोडा थोडा घेतल्याने चांगला फायदा होतो.
आवळा हा आम्लपित्तावर खूप प्रभावी आहे. याच्या सेवनामुळे आम्ल्पित्ताचा त्रास बरा होतो.
उष्णता कमी करण्यासाठी आवळा उत्तम असतो. अशा प्रकारे आवळा विविध विकारांवर उपयोगाचा आहे.

औषध म्हणून आवळ्याचे सेवन करण्या अगोदर त्यांचे प्रमाण तसेच आपल्या प्रकृतीवर त्यांचा होणारा परिणाम या गोष्टींचा विचार करणे महत्वाचे. त्यासाठी जाणकार वैद्यांचा सल्ला घ्यावा.