पंचाक्षरी मंत्र महिमा

ॐ नमः शिवाय
आज सोमवार आहे आजचा दिवस भोलेबाबांचा दिवस मानल्या जातो. प्राचीन काळातील एक कथा आहे त्या कथेमध्ये या पंचाक्षरी मंत्राचा महिमा सांगितलेला आहे तो आपण बघणार आहोत.

मथुरेला यादव वंशात शूरवीर,महापराक्रमी, दयाळू, प्रजेवर पुत्रवत प्रेम करणारा, कीर्तिवान असा एक राजा राज्य करत होता त्याचे नाव दाशार्ह होते. त्याने राजनीती नुसार अनेक राज्यांना आपले मांडलिक बनवले होते. आणि आपल्या राज्याचा विस्तार केला. त्याच्या सद्गुणांमुळे त्याच्या विशेष आणि उत्तम स्वभावामुळे त्याच्या दरबारी ऋषी-मुनी, गोर-गरीब येत असत त्यांच्या समस्या दूर करणे त्यांना मदत करणे, दान-धर्म करणे असा राज्याचा स्वभाव होता.त्यामुळे ऋषी-मुनी त्याला आशीर्वाद देत. प्रजेचे राजावर खूप प्रेम होते. राजाने विविध कला आत्मसात केलेल्या होत्या. तो सर्वांशी विनम्रतेने वागत असे सर्व राज्याचा आदर करत असत. राजाची कलावती नावाची राणी होती. ती काशीनरेशची राजकन्या होती. राणी फार रूप संपन्न, गुणवान होती.
एके दिवशी राजा राणीची वाट पाहत बसून होता बराच वेळ झाला राणी काही आली नाही. राजा स्वतः राणी जवळ गेला व बोलला हे प्राणप्रिये.. आज माझ्या कडून काही अपराध घडला का ? की माझी प्राणप्रिया माझ्यावर रुसली ? राणी कलावती बोलू लागली हे प्राणनाथ… हे स्वामी आपले काहीही चुकलेले नाही. आपण माझे सर्वस्व आहात. मी आपणास समर्पित आहे. व मी सदैव आपली आज्ञा पाळत असते.परंतु आज मी आपल्या आज्ञेचे पालन करू शकली नाही त्याकरिता क्षमा असावी. कारण मी आज व्रतस्थ आहे. व्रतस्थ असतांना स्त्रीने पतीपासून दूर राहावे असे शास्त्र सांगते. शास्त्राच्या वचनाचे भंग केल्यास, त्याचे प्रायश्चित मला व तुम्हाला भोगावे लागेल. त्यामुळे आज मी आपणाकडे येऊ शकली नाही. त्या करता मला क्षमा करावी. राजाच्या मनात कामवासना बळावली होती, त्यामुळे त्यांनी राणीचे विचार समजून घेतले नाहीत. राणी सांगत होती, मी व्रतस्थ आहे. मला स्पर्श करू नका. परंतु राजाने काहीच न एकता जबरदस्ती राणीला स्पर्श केला. तसे त्याचे हात तीव्र प्रज्वल अग्निकुंडात टाकल्या सारखी अनुभूती त्याला झाली त्याचे हात धगधगत्या आगीला स्पर्श केल्यासारखे भाजून निघाले. राजा घाबरला. त्याने राणीला विचारले हे असे का घडले ?
राणी कलावती राजांना सांगू लागली असे का झाले तर. महर्षी दुर्वासा हे माझे गुरु आहेत. त्यांनी मला ‘ॐ नमः शिवाय’ हा पंचाक्षरी मंत्र दिला. त्या मंत्राचा मी अहोरात्र जप करते. या जपामुळे माझे हृदय परमपवित्र झाले आहे. त्यात तुम्ही कामातुर होऊन जबरदस्ती केली आणि त्यातल्या त्यात मी व्रतस्थ असताना माझ्या इच्छेविरुद्ध मला स्पर्श केल्यामुळे आपले हात भाजून निघाले. आपण राजे बनून सर्व राज्य सुखांचा उपभोग घेता. तुमचा मनावर संयम नाही. तुम्ही मनाच्या पलीकडे जाऊन अंतिम सत्याचा शोध घ्यायला पाहिजे. दाशार्ह राजाचे डोळे उघडले त्याला त्याची चूक कळाली. तो बोलला की मी राज्याचा कितीही विस्तार केला, मी कितीही उच्चप्रतीचे वस्त्र, अलंकार परिधान केले तरी मला कधीच आंतरिक समाधान मिळाले नाही, कधी मन तृप्त झालेच नाही. माझे सुद्धा मन-आत्मा परमपवित्र शांतीची अनुभूती प्राप्त करेल त्यासाठी मी काय करावे ते तूच आता मला सांग. मला या पंचाक्षरी मंत्राची दीक्षा दे. भोलेबाबांचा हा मंत्र माझा सुद्धा उद्धार करेल. . राणी कलावती म्हणाली की तुमचे विचार ऐकून मला फार छान वाटले की तुम्ही पण साधना करू इच्छिता. साधनेने सर्व प्रकारचे पाप नाहीसे होतात. हृदय पवित्र होते. मी तर आपणास दीक्षा देऊ शकत नाही कारण की तुम्ही माझे पती परमेश्वर आहात. तुम्ही यादव कुळातील महान ऋषी गर्गमुनी यांना शरण जा. तेच तुमचे कल्याण करतील. राणीचे हे सर्व विचार ऐकून राजाला गर्गमुनींना भेटायची ओढ लागली. राजा व राणी गर्गमुनींच्या आश्रमात गेले. गर्गमुनींनी त्यांचा आदर-सत्कार केला आणि येण्याचे कारण विचारले. राजा म्हणाला की, आता पर्यंत माझ्या कडून खूप पापे घडली या पापाची जाणीव राणी कलावती मुळे मला आता झाली. हे गुरुवर्य मला शिष्यत्व देऊन आपली सेवा करण्याचा पुण्य प्राप्त करण्याचा मला अवसर प्रदान करावा. मला दीक्षा देण्याची कृपा करावी. मला आपणा कडून पंचाक्षरी शिव मंत्राची दीक्षा हवी आहे. जेणे करून माझ्या जीवनाचे सार्थक होईल राजा राणीने त्यादिवशी आश्रमातच विश्राम केला.
दुसऱ्या दिवशी राजा व राणी यांनी सकाळी उठून यमुना नदीत मंगलस्नान केले व शास्त्रोक्त पध्द्तीने वृक्षाखाली महादेवाचे अभिषेक-पूजन केले. गर्गमुनींची पूजा करून त्यांना दान दक्षिणा दिली. गर्गमुनींनी राजाला दीक्षा दिली राजांनी गुरूंचे दर्शन घेतले. सद्गुरुंच्या पवित्र स्पर्शाने राजांच्या जीवनात बदल झाले. गर्गमुनी राजाला म्हणाले की तूला दिलेल्या मंत्राचा अखंड जप कर म्हणजे जन्मोजन्मींचे पाप नाहीसे होऊन जाईल. नामाने हृदय शुद्ध व पवित्र होईल. राजा म्हणाले हे गुरुवर्य तुमच्या आशीर्वादाने माझे मन शांत झाले आहे. मला अत्यंत प्रसन्नतेची पवित्रतेचे शांततेची अनुभूती होत आहे. दाशार्ह राजांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. त्यांनी पुन्हा पुन्हा सद्गुरुंचे आभार मानले. राजाने सद्गुरुंच्या चरणकमलांवर मस्तक ठेवले व साष्टांग प्रणाम करून राजा व राणी तेथून आपल्या राज्यात परत आले. राजाने अखंड मंत्र जाप सूरु ठेवला. त्यामुळे त्यांचे हृदय परम पवित्र होऊ लागले. राजाच्या हृदयाचे परिवर्तन पाहून प्रजेलाही आनंद झाला. त्यांच्या प्रांतात मोठ्या प्रमाणात शिवपूजा होऊ लागली. सर्व प्रजा सुखी होऊ लागली. अशा प्रकारे गुरुभक्तीमुळे राजा-राणी व प्रजा सर्वजण सुखी झाले. भगवान शिव यांचा पंचाक्षरी मंत्र व सद्गुरुंच्या कृपेने राजाचे जीवन बदलले. अशा या राजाची कथा जे नित्य वाचतील, त्यांनाही शिवशंकर साहाय्य करतील. राजा प्रमाणे जीवनातील दुःख नाहीसे होईल, प्रपंचही सुखाचा व आनंदी होईल.

कथा महाशिवरात्रीची

प्राचीन काळी एक शिकारी होता. तो शिकार करून आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत असे. एक दिवस शिकारीसाठी तो जंगलात गेला. जंगलात खुप फिरला पूर्ण दिवस निघून गेला पण एकही शिकार त्याच्या हाती नाही लागली. तो एका नदी काठी पोहचला तेथे तो एका बेलाच्या झाडावर जाऊन बसला व एखादा प्राणी पाणी पिण्यास आल्यास आपण त्याची शिकार करू असा त्याने विचार केला. बेलाच्या झाडाखाली एक शिवलिंग होते ते बेलाच्या पानाने झाकल्या गेलेले होते. याची शिकाऱ्याला काहीच कल्पना नव्हती. तो तेथे झाडावर बसला व वाट बघू लागला. पण बराच वेळ झाला तरी तिथे एकही प्राणी फिरकला नाही. तो अस्वस्थ झाला. व अस्वस्थतेत तो बेलाचे पान तोडत असे व फेकत असे ते पान शिवलिंगावर पडत होते. तो दिवस होता महाशिवरात्रीचा.

तो सकाळ पासुन उपाशीच होता. त्यामुळे त्याचा उपास घडला. व अजाणते पणे त्याच्या कडून शिवलिंग वर बेल पत्र अर्पित झाले. न कळत पुण्याची प्राप्ती त्याला झाली.  मध्य रात्री एक हरीण पाणी प्यायला आली. शिकाऱ्याने धनुष्यावर तिर लावला नेम धरला आणि तो तिर सोडणार तर ती हरीण बोलली की मी गर्भिणी आहे मी बाळाला जन्म देणार आहे. माझी शिकार करू नको मी माझे बाळ झाल्यावर लगेच परत येईल तेव्हा तू माझी शिकार कर. शिकाऱ्याला तिचे सत्यवाचन वाटले त्याने तिला जाऊ दिले.  काही वेळाने आणखी एक हरीण पाणी पिण्या करता तेथे आली. ती हरीण बोलली माझी शिकार करू नको. मला माझ्या पतीच्या सहवासाची इच्छा आहे. मी माझ्या पतीस भेटून येते तेव्हा तू माझी शिकार कर. शिकाऱ्याने तिला पण जाऊ दिले. दोन्ही शिकार जाऊ दिल्यामुळे त्याचे डोके आणखी खराब झाले.  काही वेळाने पुन्हा एक हरीण तिच्या पिल्लांना घेऊन पाणी पिण्या करता आली. तेव्हा शिकाऱ्याने लगेच तिच्या वर नेम लावला व तो बाण सोडणार तर ती हरीण बोलली की माझी शिकार करू नको मला माझ्या पिल्लांना माझ्या पती जवळ सोडून परत येते. शिकारी हसला आणि बोलला हातातली शिकार सोडून देऊ एवढा मी मूर्ख नाही. पुन्हा हरीण बोलली की मला माझ्या पिल्लांची चिंता होत आहे मला जाऊ दे. मी माझ्या पिल्लांना घरी सोडून लगेच येते शपथ घेऊन सांगते. त्याला तिच्या पिल्लांना पाहुन दया आली त्याने तिला जाऊ दिले .

शिकारी त्या हरिणीची वाट पाहत होता व बेलाचे पान तोडत शिवलिंगावर फेकत होता. तेवढ्यात एक मोठा हरीण तेथे आला. शिकारी आनंदित झाला व त्याने त्याच्या वर नेम लावला व बाण सोडणारच तर तो हरीण बोलला की माझे जर तू पिल्लं व तीन पत्नी ची शिकार केली असेल तर माझी शिकार कर व मला मारून टाक. जर तू त्यांना जीवनदान दिले असेल तर मला पण काही वेळे करता जीवन दान दे. मी त्यांना भेटून लगेच येतो तेव्हा माझी शिकार कर.  तेव्हा शिकाऱ्याच्या समोर संपूर्ण रात्रीचे दृश्य समोर आले. दृष्टी समोर जे घडले ते दृश्य फिरू लागले  त्याने जे झाले त्या हरिणांस सांगितले. हरीण बोलला की जसे माझ्या पत्नीने तुला वचन दिले मी पण तुला वचन देतो की मी त्यांना भेटून त्यांना येथे घेऊन येतो तेव्हा तू आमच्या सर्वांची शिकार कर. तेव्हा शिकाऱ्याने त्याला पण जाऊ दिले.

थोडयाच वेळाने तो हरीण सहकुटूंब त्याच्या समोर आले. उपवास, रात्री जागरण व अजाणते पणे त्याच्या कडून शिवलिंग वर बेल पत्र अर्पित केल्याने त्याचे मन निर्मळ झाले. त्याच्या हातातून धनुष्य गळून पडला. त्याला त्याच्या आता पर्यंतच्या कर्माचा पश्चाताप होत होता. भगवान शिव शंकरच्या कृपेने त्याचे मन द्रवित झाले त्याचे हृदय परिवर्तन झाले होते. हिंसक प्रवृतीतून करुणेचा भाव निर्माण झाला होता.  हरिणाच्या कुटुंबीयांची प्रामाणिकता, सत्यता व सामूहिक प्रेम भावना पाहून तो धन्य झाला होता. त्याने हरणाच्या कुटूंबाला जिवंत सोडून दिले. तेव्हा पासून शिकार पण सोडून दिली असा तो बोलला. वरून समस्त देवी देवता हे पाहत होते. समस्त देवी देवतांनी त्याच्या वर व हरीण परिवारावर फुलांचा वर्षाव केला. व भोले बाबांचा कृपाप्रसाद त्यांना प्राप्त झाला. अशाप्रकारे अजाणतेपणाने पण ईश्वर सेवा घडली तरी करुणामयी भोलेबाबा प्रसन्न होतात. आणि आजच्या दिवशी आपण हि महाशिवरात्रीची कथा वाचणार म्हणजे त्यांचे अजाणतेपणे स्मरण होणार त्यामुळे त्यांचा आशीर्वाद आपणास नक्कीच लाभेल.

महाशिवरात्रीच्या सर्व एमएच २८. इन सदस्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा.

पापनाशक बारा जोतिर्लिंग

१२ जोतिर्लिंग: महाशिवरात्री

भगवान शंकर त्रिदेवांपैकी एक.आहेत. यांना भोलेबाबा, भोलेनाथ, नीलकंठ, रुद्र, महेश, शिव, शंकर, महादेव अशा विविध नावांनी यांचे स्मरण केले जाते. यांची अर्धांगिनी शक्ती आहे त्यांचे नाव पार्वती आहे. यांचे पुत्र कार्तिकेय आणि श्रीगणेश आहेत. भगवान शंकराची पूजा शिवलिंग आणि मूर्ती अशा दोन्ही रूपात केली जाते. त्यांच्या गळ्यात नाग देवता विराजमान आहेत. हातात डमरू आणि त्रिशूल धारण केलेले आहे. कैलास त्यांचे निवासस्थान आहे. असे हे देवांचे देव महादेव ज्या ठिकाणी स्वतःहून प्रकट झाले त्या बारा ठिकाणी असलेल्या शिवलिंगला बारा जोतिर्लिंगाच्या रूपात पुजल्या जाते. हिंदू मान्यतेनुसार जो मनुष्य प्रतिदिन नित्य प्रातःकाळ आणि सायंकाळ या दोन्ही वेळी बारा जोतिर्लिंगांचे स्मरण करतो त्याचे साताजन्माचे पाप यांच्या स्मरणाने नष्ट होतात. असे सांगितल्या जाते कि देवाधी देव महादेव यांचे १२ ज्योतिर्लिंग चे दर्शन करणारा व्यक्ती खुप भाग्यशाली असतो. या बाराही ज्योतिर्लिंगाचे दर्शन हे ज्याच्या नशीब आहे तोच करू शकतो.
तसेच आज २४ फेब्रुवारी २०१७ ला महाशिवरात्री आहे आणि या पावन मुहूर्तावर जर आपण थोडं पुण्य अर्जित करू शकलो तर आपले जीवन सुद्धा धन्य होईल त्यामुळे आज आपण भोलेबाबांच्या १२ जोतिर्लिंगाची माहिती बघणार आहोत. बारा जोतिर्लिंगांची नावे व ते कुठे स्थित आहेत.

१) श्री सोमनाथ ज्योतिर्लिंग – हे ज्योतिर्लिंग गुजरात राज्यात सौराष्ट्र येथे आहे. काठेवाडच्या दक्षिणेस वेरावल बंदरगाहयेथे स्थित आहे. याचे निर्माण चंद्रदेवाने केले होते. सोम म्हणजे चंद्र आणि त्यांनी हेनिर्माण केले म्हणून याचे नाव सोमनाथ म्हणून प्रसिद्ध झाले. हे पृथ्वी वरील सर्वात पहिले ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते.

२) श्री मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग – हे ज्योतिर्लिंग आंध्र प्रदेश राज्या मध्ये कृष्णा नदी काठी श्रीशैल नावाच्या पर्वता वर आहे. यास श्री शैल मल्लिकार्जुन नावाने पण ओळखले जाते.

३) श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग – हे ज्योतिर्लिंग मध्य प्रदेश राज्या मध्ये उज्जैन येथे क्षिप्रा नदीच्या काठा वर आहे. महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची विशेषतः म्हणजे एकमेव दक्षिण मुखी ज्योतिर्लिंग आहे.

४) श्री ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग – हे ज्योतिर्लिंग मध्य प्रदेश राज्या मध्ये मान्धाता नागरी मध्ये विराजमान आहे या तीर्थस्थानाजवळच नर्मदा नदी आहे. हा सर्व भाग ओंकार आकाराचा आहे म्हणून याला ओंकारेश्वर म्हणून ओळखले जाते.

५) श्री केदारनाथ ज्योतिर्लिंग – हे ज्योतिर्लिंग उत्तराखंड राज्या मध्ये हिमालय पर्वत रांगे मध्ये हे तीर्थक्षेत्र आहे. बद्रीनाथ चार धाम पैकी एक आहे. बद्रीनाथचे दर्शन घेण्यास आलेले केदारनाथच्या दर्शन घ्यायला येत असतात. काहीकाळ हे मंदिर बर्फामध्ये बुडालेले असते.

६) श्री भीमाशंकर ज्योतिर्लिंग – हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्र राज्या मध्ये पुण्याहून ११० किमी वर स्थित असून. सह्याद्रि पर्वत रांगेत आहे. येथे भीमा नदी वाहते.

७) श्री काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग – हे ज्योतिर्लिंग उत्तर प्रदेश राज्या मध्ये काशी येथे आहे. काशीलाच वाराणसी, बनारस असे म्हणतात. गंगा नदीच्या किनाऱ्यावर स्थित आहे.

८) श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग – हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्र राज्या मध्ये नासिक जिल्हात गोदावरी नदीच्या जवळ आहे.

९) श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग – हे ज्योतिर्लिंग झारखण्ड राज्या मध्ये अतिप्रसिद्ध देवघर येथे स्थित आहे.

१०) श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग – हे ज्योतिर्लिंग गुजरात राज्यात दारूका जंगला जवळ आहे. द्वारकापुरी येथून जवळच आहे.

११) श्री रामेश्वरम ज्योतिर्लिंग – हे ज्योतिर्लिंग तमिलनाडु राज्यात रामनाथपुरं येथे आहे. हे चार धाम पैकी एक आहे. या ज्योतिर्लिंगची स्थापना स्वतः भगवान श्री रामचंद्रांनी केली होती त्यामुळे या ज्योतिर्लिंगाला रामेश्वरम हे नाव पडले.

१२) श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग – हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्र राज्यात दौलताबाद च्या जवळच आहे. येथे जवळच शिवकुंड सरोवर आहे. बारा ज्योतिर्लिंग मध्ये हे शेवटचे ज्योतिर्लिंग आहे.

महाशिवरात्रीच्या आपणा सर्वांना एमएच २८. इन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा 

देवाधी देव महादेवाची आरती

आज महाशिवरात्री आहे त्यानिमित्त भोलेबाबांची आरती प्रस्तुत करत आहोत.

आरती

ॐ नमः शिवाय

लवथवती विक्राळा ब्रह्माण्डी माळा। वीषे कण्ठ काळा त्रिनेत्री ज्वाळा।
लावण्य सुन्दर मस्तकी बाळा। तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा॥१॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा। आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा॥धृ॥

कर्पुर्गौरा भोळा नयनी विशाळा। अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा।
विभुतीचे उधळण शितिकण्ठ नीळा। ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा॥२॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा। आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा॥धृ॥

देवी दैत्यी सागरमन्थन पै केलें। त्यामाजी अवचित हळाहळ जें उठिले।
ते त्वां असुरपणे प्राशन केलें। नीलकण्ठ नाम प्रसिद्ध झालें॥३॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा। आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा॥धृ॥

व्याघ्राम्बर फणिवरधर सुन्दर मदनारी। पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी।
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी। रघुकुळटिळक रामदासा अन्तरी॥४॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा। आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा॥धृ॥

महाशिवरात्री निमित्त सर्व एमएच २८. इन परिवारातील सदस्यांना हार्दिक शुभकामना.