असं वाटते मला,
वारा बनून गावी तुझ्या यावं.
जेथे असेल तु तेथे जावून,
अंगी तुझ्या घुटमळावं.
असं वाटते मला,
फुलपाखरं मी व्हावं.
येवून जवळ तुझ्या,
अवती – भवती फिरावं.
असं वाटते मला,
सावली तुझी व्हावं.
जेथे जेथे जाशिल तु,
तेथे मागे तुझ्या यावं.
असं वाटते मला,
गाणं मी व्हावं.
कधीतरी नकळत,
ओठी तुझ्या यावं.
असं वाटते मला,
अश्रू मी व्हावं.
आठवण येता माझी कधी,
डोळ्यातून तुझ्या वाहावं.
असं वाटते मला,
हसू मी व्हावं.
नाराज असतांना तु,
खुदकन गाली तुझ्या यावं.
असं वाटते मला,
स्वप्न मी व्हावं.
रोज रात्री तु मला,
उघडया डोळ्यांनी बघावं.
असं वाटते मला,
उंबरठा मी व्हावं.
घरातील चौकटीत तुझ्या,
कायमस्वरूपी असावं.
सौ. अनिता भागवत येवले (बुलडाणा)