पातुर्डा येथे शहिदांना श्रद्धांजली

shahid divas at paturda

भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या बलिदानासाठी आजचा दिवस ‘शहीद दिवस’ म्हणून पाळल्या जातो. संपूर्ण भारतभर आज ह्या तिन्ही क्रांतीकारकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येते. त्या अनुषंगाने आज दिनांक 23 मार्च ला या दिवशी या देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी फासावर लटकणारे शहीद भगतसिंह, शहीद राजगुरु आणि शहीद सुखदेव याना श्रद्धांजली देण्याकरीता पातुर्डा येथे शहीद दिवस साजरा करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे या वर्षी पण शहीद दिवस आठवण पर साजरा केला. गावातून काढण्यात आलेल्या प्रभातफेरी मधे इयत्ता 5वी ते ९वीचे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

संग्रामपूर येथील ग्राम पातुर्डा येथे क्लीन पातुर्डा ग्रीन पातुर्डा आणि संघर्ष ग्रुप यांनी आज हा दिवस शहीदाना आठवण म्हणून साजरा केला. या वेळी अभिषेक मोहनकार हा भगतसिंह, वैभव वानखड़े सुखदेव, प्रतिक राहाटे राजगुरु तर नकुल राठी हा चंद्रशेखर आज़ाद यांच्या वेशभूषेत होता. शहीद दिनानिमित्त गावातून आज पायी रॅली काढण्यात आली. यावेळी शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचे नारे लावण्यात आले. पातुर्डा येथील ज्ञानदीप कोचिंग क्लास मध्ये त्याना क्रांतीकारकांना श्रद्धांजली वाहून देऊन त्यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकण्यात आला. या वेळी गजानन उगले सर, महेश सातव सर, खंडेराव सर यांनी आपले विचार व्यक्त केले.

डॉ. आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं गाव पातुर्डा

ambedkar visit to buldana

बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात वसलेल्या ग्राम पातुर्डाकडे अनेकांचे लक्ष नाही. शहरापासून दूर ग्रामीण भागात असलेल्या पातुर्डा गावास इतिहास लाभला आहे परंतु आज सर्व सुख सुविधा पासून गाव वंचित पडलेले आहे. गावास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह तुकडोजी महाराज, महात्मा फुले यांचे पदस्पर्श लाभून पावन झाले आहे.

पातुर्डा तसं मोठं गाव. शाळा, बाजार यांसह अनेक मंदिर, क्लासेस दिसून येतात. तसंच इतिहासकालीन अनेक स्थळ सुद्धा आपली साक्ष देत उभी आहेत. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यांसाठी खुली करून दिलेली विहीर आहे. गावात गेल्यावर बाजारात एका ठिकाणी आपल्याला ती विहीर दिसून येते. त्याच ठिकाणी डॉ. बाबासाहेबांनी ही विहीर खुली केली होती. त्यांनी स्वतः या विहिरीचे पाणी काढून अस्पृश्याना दिले होते. पातुर्डा येथे आले असताना येथील जि.प. मुलांची शाळा येथे त्यांचा मुक्काम होता यावेळी त्यांच्याकरीता अंघोळीसाठी एक पाण्याचा हौद बांधण्यात आला होता. तो आता नाही आहे.

२५ मी १९२९ रोजी दोन दिवसीय अधिवेशनासाठी डॉ. बाबासाहेब पातुर्डा येथे आले होते. त्यांच्यासोबत त्यावेळी रा.पी मटकर, रा. सोनोने, रा. मकेसर , रा. केशवराव खंडारे , रा. संभाजी जाधव, रायभान इंगळे इ. मंडळी हजर होती. मध्यप्रांत व वऱ्हाड अस्पृश्य परिषदेचे हे दोन दिवसीय अधिवेशन होते. यावेळी असंख्य जनसमुदाय जमलं होता. संध्याकाळी झालेल्या या अधिवेशनाच्या आरंभी रा . बथुरामजी दाभाडे यांची कन्या कु. कवतिकाबाई आणि सखाराम इंगळे यांचा विवाह सुधारलेल्या पद्धतीने व अल्प खर्चात करण्यात आला.

अस्पृश्यांवर होत असलेल्या अन्यायामुळे, त्यांचा छळ करणे आणि बहिष्कार टाकणे यामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील अस्पृश्य धर्मांतर करण्यास तयार झाले होते. त्या अनुषंगाने आपल्या अस्पृश्य बंधूचे यावर काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी जळगाव तालुक्यातील अस्पृश्य पुढाऱ्यांनी ही परिषद बोलावली होती. या अधिवेशनात ९ ठराव पास करण्यात आले. त्यामध्ये जळगाव तालुक्यातील अस्पृश्य समाजास धर्मांतर करण्यास उत्तेजन, नागपूर का,को मध्ये प्रतिनिधींची मागणी, चिखली येथील जुने चोखामेळा बोर्डिंग हणून पाडण्याचा प्रतिष्टीत ब्राम्हणांनी चालु केलेल्या प्रयत्नाचा निषेध व नवीन निघणाऱ्या बोर्डिंगास मदत न करण्याविषयी विनंती, सरकारी व एडेड हायस्कुल मध्ये बहिष्कृत वर्गाचे सर्रास फी घेण्याविषयी मागणी, कामगार महारास पोलीस अधिकाऱ्याकडून होणार त्रास नाहीसा करण्यासाठी विनंती, मेलेल्या जनावरांचे मास गावात न आणण्याविषयी कायद्याने बंदी करण्यास सरकारला विनंती, अस्पृश्य वर्गाने चालविलेल्या बोर्डिंगास दर विद्यार्थ्यामागे ५ रु. प्रमाणे मदत करण्याविषयी व नागपूरचे बोर्डिंग सर्वस्वी चालविण्याविषयी सरकारला विनंती, टाईम्स मध्ये अस्पृश्य परिषदेचे रा. एल. एस,. भटकर यांच्या निधनाची खोटी बातमी छापल्याने बातमीदाराचा निषेध आणि श्री. दाभाडे यांनी या परिषदेचा खर्च एकट्याने भरल्याबद्दल त्यांचे अभिनंदन असे ठराव एकमताने पास करण्यात आलॆ.

पातुर्डा येथे हरिनाम सप्ताहाचे आयोजन

पातुर्डा चे ग्रामदैवत महासिद्ध महाराज यांची यात्रा येत्या १० फेब्रुवारी येत आहे. त्या निमित्ताने गावात हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन ४ ते ११ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे. हभप रवींद्र महाराज सोयगाव, लक्ष्मण महाराज कोकाटे सावरपाटी, गजानन महाराज मलकापूर, लक्ष्मी नारायण दायमा महाराज पारस, मधुकर महाराज जोगंदल अकोला, संजय पाटील महाराज बामदा, गणेशनंद महाराज कागन्ये आळंदी देवाची, विनायक महाराज भोपळे निमगाव यांचे कीर्तन होणार आहे. तसेच दि. ११ फेब्रुवारी रोजी अभिनेते अमोल जुमळे आणि साथीदारांचा ‘शिवनागर’ कार्यक्रम होणार आहे. ‘गाथा पारायण’ व्यासपीठाचे नेतृत्व निमगाव येथील विनायक भोपळे हे करणार आहेत. गावकऱ्यांच्या वतीने ११ फेब्रुवारीला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सर्वाना याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वक्तृत्व स्पर्धेत नेहा सांगळे प्रथम

संग्रामपुर तालुक्यातील वरवट बकाल येथील कला, वाणिज्य अणि सायन्स महाविद्यालयाची बीएससी भाग १ ची विद्यार्थिनी कु नेहा सांगळे ही वतृकत्व स्पर्धेत प्रथम आली आहे. सातपुडा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री कृष्णराव इंगळे यांच्या वाढदिवसा निमित्त दि. 21- 22 जानेवारी दरम्यान कला अणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये मधे वक्तृत्व आणि इतर स्पर्धा आयोजित केल्या होत्या.

यावेळी वक्तृत्व स्पर्धेत अधुनिकतेच्या नावाखाली नीतिमत्तेचा ह्रास या विषयावर वतृकत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेमध्ये असंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचे अणि कार्यक्रमाचे परीक्षक प्रा गुर्जर सर अणि प्रा सातव सर यानी कु नेहा हीचा वतृकत्व स्पर्धा मधे प्रथम क्रमांक घोषित केला. यासाठी तिला प्रा कालपांडे सर, प्रा वानखडे सर, प्रा शिवकुमार गिरी सर यांचे मार्गदर्शन लाभले.

संग्रामपूर येथे मराठा समाजाचा रास्ता रोको

आरक्षण आणि कोपर्डी येथील घटनेतील आरोपीना लवकरात लवकर शिक्षा होणे यासारख्या मागण्यासाठी काल संग्रामपूर तालुक्यातील वरवंट बकाल आणि कारामोडा फाट्यावर मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. यावेळी परिसरातील मराठा बांधव यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सादर रस्ता रोको करण्यात आला होता. संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे मराठा समाजाच्या वतीने हा रास्ता रोको करण्यात आला. यावेळी मराठा समाजाचे जमलेले कार्यकर्ते रस्त्यावर ठाण मांडून बसल्याने जळगाव जामोद, तेल्हारा आणि शेगाव कडे जाणारी वाहतूक बंद होती. सोबतच करमोडा फाट्यावर सुद्धा मराठा समाजाच्या युवकांनी रास्ता रोको केला होता. यावेळी तांमगाव पो. स्टे . चे बी. आर. गीते यांनी परिस्थतीत नियंत्रणात ठेवली होती त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घेतला नाही .

पातुर्डा येथे भरदिवसा चोरट्याचा डल्ला

नितीन खंडेराव, प्रतिनिधी: संग्रामपूर येथील ग्राम पातुर्डा येथे आज दुपारी ३:३० श्री लतिश ज़ुम्बरलाल भूतड़ा यांच्या घरी चोरी झाली. चोरट्याने घरातून १० हजार रुपायांची रोकड त्यांच्या घरातून लंपास केली. पातुर्डा येथील सरस्वती वाचनालय जवळ श्री. भुतडा यांचे घर आहे. त्यांच्या घरी आज दुपारी अज्ञात व्यक्तीने प्रवेश करून घरातील १० हजार रुपयांवर डल्ला मारला. या प्रकरणी तामगाव पोलीस स्टेशनचे श्री. शेळके आणि साळवे हे तपास करीत आहे.

संग्रामपूर येथे पत्रकार दिन संपन्न

sangrampur

बुलडाणा जिल्ह्यात नुकताच पत्रकार दिन संपन्न झाला. त्या अनुषंगाने बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथे जागतीक पत्रकार दिना निमित्ताने आज संग्रामपूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने श्याम सावतकर यांचा सत्कार करण्यात आला. पळशी झाशी येथील शंकरगिरी महाविद्यालय येथे आयोजीत या कार्यक्रमासाठी संघटनेचेे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार केशवरावजी घाटे, श्याम देशमुख, रामेश्वर गायकी, प्रल्हाद दातार, विजय दादा पोहनकार, प्रल्हाद सावतकर, अभयसिंह मारोडे, संतोषभाऊ देऊकार, पंजाबराव ठाकरे, युसूफभाई तसेच सामाजिक कार्यकर्ते व समस्त पत्रकार बांधव उपस्थित होते.

वरवंट बकाल येथे आज 'बेटी बचाव' आणि 'व्यसनमुक्ती' अभियान

संग्रामपूर तालुक्यात असलेल्या वरवंट बकाल येथील नवयुवक गणेश मंडळातर्फे या गणेशोत्सव दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या ११ दिवस रोज सामाजिक, धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज मंगळवार दि. १३ रोजी मंडळातर्फे ‘बेटी बचाव अभियान’ आणि ‘व्यसनमुक्ती’ यावर आधारित गीतगायन आणि नाटिकेचे आयोजन केले आहे.

आज रात्री ८:३० वाजता ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सर्वानी याचा लाभ घेण्याचे आवाहन नवयुवक गणेश मंडळातर्फे करण्यात आले आहे.

नवयुवक गणेश मंडळातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन

buldana news

संग्रामपूर तालुक्यात असलेल्या वरवंट बकाल येथील नवयुवक गणेश मंडळातर्फे या गणेशोत्सव दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या ११ दिवस रोज सामाजिक, धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये वृक्षारोपण, रक्तदान, प्रश्नमंजुषा, व्यसनमुक्ती, सर्पमित्रांचे व्याख्यान, बेटी बचाव , आंबा बरवा येथील पारंपरिक आदिवासी नृत्य तसेच भजन वगैरे कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.

५ सप्टेंबर पासून सुरु झालेल्या या कार्यक्रमाची सांगता १५ सप्टेंबर ला बक्षीस वितरण कार्यक्रमाने होणार आहे. दरवर्षीप्रमाणे मंडळातर्फे रविवार ११ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये मंडळाकडून ६०-६५ युवकांनी रक्तदान केले. या शिबिराचे उदघाटक संतोष टाकळकर, कृऊबासचे उपसभापती संजय राठोड यांच्या उपस्थितीत गणेश टापरे, प्रतीक राठी, राजू कुयटे, विनोद टाकळकर, गणेश अस्वार, सागर शेगोकार, नंदकिशोर राठी, चेतन बकाल, नितीन टाकळकर, जयेश दातार, वैभव डाबरे, निलेश भोपळे, सागर रौदळे इ. युवकांनी रक्तदान केले.

कर्जापायी शेतकरी कुटुंबातील 3 जणांची आत्महत्या

Official website of Buldhana

कर्जापायी शेतकरी कुटुंबातील ४ जणांची आत्महत्या तर एक अत्यवस्थ झाल्याची घटना मालठाना येथे घडली आहे. ४ पैकी ३ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून एक अत्यवस्थ आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात असलेल्या ग्राम मालठाना येथील मसाने ह्या आदिवासी शेतकरी कुटुंबीयाने आज कर्जाच्या ओझ्यापायी सामुहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून तर एक जण अत्यवस्थ आहे. त्याच्यावर अकोल्यात उपचार सुरु आहेत. मसाने कुटुंबाकडे कडे एक एकर ,शेती आहे. त्यांवर हे लोक गुजराण करायचे परंतु त्यांच्यावर एक लाखाचं कर्ज होत. हे फेडता येण शक्य नसल्याने त्यांनी आत्महत्या करण्याचा मार्ग पत्करला. या कुटुंबातील दिनेश मसाने, ३५, लक्ष्मीबाई मसाने ४०, जितेंद्र मसाने १७ यांची प्राणज्योत मालवली आहे तर न्यानसिंग मसाने ७०, यांची प्रकृती अत्यवस्थ आहे.