बुलडाना शिवसेना उपजिल्हाप्रमुख शांताराम जगताप यांचे अपघाती निधन

buldana news

बुलडाना शिवसेना उप जिल्हाप्रमुख शांताराम जगताप यांचे औरंगाबाद जवळ नांदगाव-शिऊर बंगला मार्गावर झालेल्या अपघातात निधन झाले. मुंबई येथील शिवसेनेचा वर्धापन दिन कार्यक्रमास बुलडाणा येथून शांताराम जगताप, पत्रकार राजेश देशमाने, बुलडाणा तालुकाप्रमुख अर्जुन दांडगे, ओमसिंह राजपूत हे एम.एच. २८ व्ही. ४४५३ गाडीने गेले होते. तेथील कार्यक्रम आटोपून बुलडाणा येथे परतत असतांना औरंगाबाद जिल्ह्यातील नांदगाव-शिऊर बंगला जवळ सकाळी साडेचारच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्यांची भरधाव कार रस्त्यावरील पुलावरून खाली कोसळली. यामध्ये शांताराम जगताप यांचे जागीच निधन झाले तर इतर चार जण जखमी झाले. सादर अपघाताची बातमी कळताच परिसरातील शिवसेना कार्यकर्त्यांनी अपघातस्थळी जाऊन जखमींना कारच्या बाहेर काढले आणि औरंगाबाद येथे रुग्णालयात दाखल केले.

शांताराम जगताप यांच्या निधनाची बातमी पसरताच त्यांच्या गावी ‘अजिसपूर’ येथे स्मशान शांतता पसरली होती. जिल्ह्यातील अनेक शिवसैनिकांनी लागलीच औरंगाबाद कडे धाव घेतली. गेली ३० वर्षे शिवसेनेशी एकनिष्ठ असलेले आणि माजी आ. शिंदे यांचे खास माणूस असलेले शिवसेना उप जिल्हाप्रमुख शांताराम जगताप यांच्या जाण्याने सेनेला मोठा आघात झाला आहे.