आम्ही लोणंदला राहायला आलो तेव्हा लोणंद एक सर्वसाधारण गाव होते. शाळा, दवाखाने, रेल्वे वगैरेसुविधा होत्या पण ज्या पाण्यावर फारसे तरंग उमटत नाहीत असे संथ नि शांत जीवन होते तिथले. आता गावात एक थिएटर आहे पण तेव्हा दोन तंबू टॅाकीज होते. जयश्री आणि अशोक. गावापासून लांब मोकळ्या रानात! रात्री नऊ हे सिनेमा सुरु होण्याचे घोषित वेळापत्रक असले तरी प्रेक्षक गोळा होईपर्यंत तो सुरु होत नसे. तंबू उभारायलाच नऊ वाजायचे. मग शहनाई. वाऱ्यावर लहरत ते सूर घराघरात पोचायचे. मग सिनेमा बघायला जाणारांची गडबड उडे. एकमेकांना हाका मारत एकमेकांच्या सोबतीने सर्व निघत. पण प्रत्येक वेळेस सोबत मिळेच असे नाही. आम्हांला सिनेमा बघायची फार हौस होती. घरांत टी. व्ही. रेडीओ नव्हता. पपा. मुंबईला. मोठी बहिण मामाकडे. मग मी, आई, मोठी बहिण आणि मोठा भाऊ असे सिनेमाला जात असू. सिनेमा बदलला की आम्ही निघालोच.
असाच एकदा ‘ जयश्री’ ला ‘ घुंघट’ नावाचा सिनेमा लागला. शेजाऱ्यांना बच्चन , धर्मेंद्र यांचे मारधाडीचे चित्रपट आवडत. त्यामुळे कोणीच सोबत आले नाही. आम्हीच निघालो. काही अंतर चालले की पानपट्टीसारखी अरुंद टपरी दिसायची. जकात नाका होता तो . कंदिलाच्या पिवळट उजेडात तिथे बसलेल्या बुटकेल्या, जाडगेल्या माणसाची सोबत वाटायची. अजून काही अंतर चालले की रॉकेलचे एक जुनाट दुकान. आणि त्याच्यापासून थोड्या अंतरावर एक विहीर. आम्ही चाळीतली मुले हमखास शाळेत जाताना त्या विहिरीपाशी जायचो. तीत एक कासव होते. सकाळच्या वेळी ते हळूच बाहेर येई व ऊन खात कपारीत बसे. आम्हा मुलांसाठी ते प्रचंड कुतूहलाचा विषय होते.
त्या रात्री पौर्णिमा होती. आम्ही निघालो तेव्हा का कोणास ठाऊक आमची मांजर पुन्हापुन्हा मागे येत आम्हाला अडवत होती. तिला हाकलून दिले तरी ती धावत येऊन पायांत घोटाळे. अखेर तिला लांब पिटाळून लावून आम्ही निघालो. सिनेमा उशिरा सुरु झाला नि उशिरा संपला. आम्ही निघालो. जुना सिनेमा असल्याने फारशी गर्दी नव्हती. त्यामुळे परतताना तुरळक माणसांची सोबत होती. वाटेत त्यांची घरे लागल्यावर तीही सोबत संपली. आता शांत झोपलेले गाव…ग्रामपंचायतच्या ट्यूबलाईट्सनी उजळलेला निर्मनुष्य रस्ता, आणित्यारस्त्यावरआम्ही चौघे. आम्ही भावंडे सिनेमा वर चर्चा करत होतो. आता तो सिनेमा थोडाही आठवत नाही. आणि आम्ही काय बोलत होतो तेही नाही. आई माणसांची सोबत संपल्याने आम्हाला पावलेउचलायला सांगत होती एवढे ठळक आठवते. आम्ही आमच्याच नादात.
बोलताबोलता त्या विहिरीपाशी आलो. काही हातांवर ती विहीर. आम्ही बोलत होतो नि आईला त्या विहिरीच्या बाजूने कोणीतरी लक्ष वेधून घेण्यासाठी खाकरते तसा आवाज आला. तिने चमकून पाहिले. ट्यूबलाईट्सचा उजेड होताच…शिवाय टिपूर चांदणे. आईला त्या उजेडात विहिरीच्या मधोमध एक बाई उभी दिसली. तिचे केस मोकळे होते. अंगावर गुलाबी पातळ होते. अंगात चोळी नव्हती. ती एकटक आईकडे पाहत होती. आईला प्रश्न पडला. एवढ्या रात्री ही येथे काय करतेय? आणि विहिरीच्या मध्ये काय करतेय ? तिच्या लवकर लक्षात आले नाही. तिला वाटले दगड, माती, कचरा साठून विहीर बुजत आलीये म्हणून ती मध्ये उभी राहू शकली असेल. तरीही एवढ्या रात्री काय करतेय हा प्रश्न होताच. काही क्षणातच आईच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. तिला आठवले याच विहिरीतल्या कासवाची गम्मत आम्ही तिला सांगत असू. म्हणजे विहिरीत पाणी होते. आणि ती बाई मधोमध तरंगत होती. आई शहारली. तिने आम्हाला जवळ जवळ ढकलतच पुढे आणले. ‘ लवकर लवकर चला’. एवढेच पुटपुटली. आमच्या लक्षात नाही आले. बंद दुकाने, झोपलेली घरे आणि विरक्त सन्याशासारखी उभी असलेली निमूट झाडे यातून वाट काढत आम्ही निघालो. तो छोटेखानी जकातनाका लागला आणि तिथला माणूस जागा असल्याचे पाहून आईच्या जीवात जीव आला. सकाळी आईने शेजारच्या बाईला विचारले, ‘ त्या विहिरीत काही आहे का हो?’
ती म्हणाली, ‘ हो. एका वडारी समाजाच्या बाईने जीव दिलाय तिथे. नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून. पण ती बायकांना काही करत नाही. पुरुषांना त्रास देते. अमावास्या पौर्णिमेला पुरुषांना तेथे हमखास अपघात होतो.’
काल रात्री हाताच्या अंतरावर एक अमानवी अस्तित्व होते..या जाणीवेने आई शहारली. तिने आम्हाला सर्व सांगितले. मांजरीकडे बघून म्हणाली,’तरीच ही बया अडवत होती’. दुसऱ्या दिवशी नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे आम्ही कासव बघायला गेलो. सोबतच्या पोरांना आम्ही रात्रीचा किस्सा सांगितला. दिवसाच्या लख्ख उजेडात विहीर निरुपद्रवी वाटत होती. नव्या कुतूहलाने आम्ही ते गूढ काळपट पाणी न्याहाळले. कोणीतरी शोध लावला. ते कासवच भूत असेल. दिवसा कासव आणि रात्री बाई. आम्ही हसलो. पुढे कोणाची सोबत नसताना कित्येकदा मी विहिरीपाशी गेले. पाण्याखाली ती बाई राहत असेल का याचा विचार करत मी पाण्याकडे पाही. भीती नाही वाटली, आणि थोडे कळायला लागल्यावर दया वाटू लागली. आयुष्य संपवावे वाटण्याइतका तिचा छळ झाला होता. आज ती विहीर पूर्णपणे बुजवून तीवर ऑफिस थाटण्यात आलेय. एक घरही बांधले गेलेय. त्यांना भुताने छळल्याच्या हकीकती ऐकल्या नाही. ती बाई आणि ते कासव यांचे काय झाले असेल हा प्रश्न मला आजही पडतो.
राजेश्वरी कांबळे.