आपल्या बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील एक छोटस गाव म्हणजे भेंडवळ. एकण्यात आहे की येथील घट मांडणी ही प्राचीन परंपरा सुमारे ३००-४०० वर्षा पासून चालत आलेली आहे. या परंपरेची सुरुवात केली होती चंद्रभान महाराज यांनी आणि ही परंपरा पूर्ण विश्वासाने आजही जोपासली जाते. जी अक्षय तृतीयाच्या महापर्वावर वाघ परिवाराच्या वतीने साजरी केली जाते.
घट मांडणी दोन वेळा केली जाते :
ही घट मांडणी वर्षातून दोन वेळा केली जाते पहिली गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर गावातील पारावर तर दुसरी अक्षय तृतीया या महा पर्वावर गावाजवळच्या पूर्वेकडील शेतात ही घट मांडणी केली जाते. असे असले तरी या दोन्ही मांडणी यामध्ये महत्वाच्या आहेत. गुढी पाडव्याच्या दिवशी केलेल्या मांडणीतून मिळालेले संकेत आणि अक्षय तृतीया या महापार्वावर केलेल्या घट मांडणीतून मिळालेले संकेत या दोन्ही मांडणीतील संकेत जुळवून निष्कर्ष काढल्या जातो व भविष्य वर्तवले जाते.
ही मांडणी त्याकाळा पासून सुरु आहे जेव्हा हवामान खाते,पाऊस पाण्याची माहिती देणारे कुठलीही सुविधा उपलब्ध नव्हती तेव्हा पण जन सामान्यांपर्यंत ही माहिती पोहचवण्याचे कार्य केले आहे या भेंडवळ च्या मांडणीने. ही भेंडवळ ची घट मांडणी संपूर्ण महाराष्ट्रा मध्ये प्रसिद्ध आहे. त्यामुळे या घट मांडणी कडे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून असते. जो तो आपापल्या श्रद्धेनुसार या मांडणीवर विश्वास ठेवतो. हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा,विश्वासाचा भाग आहे.
अशा प्रकारे केली जाते घट मांडणी :
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सायंकाळी गावाजवळच्या पूर्वे कडील शेतात जे घट मांडणीसाठी निवडून ठेवलेले असते तिथे जातात. तिथे चंद्रभान महाराजांचा जयजयकार करतात. तिथे मोठे रिंगण आखतात त्याच्या मधोमध मोठा खड्डा तयार करतात त्या खड्ड्यात घट मांडणी करतात. वर्षा ऋतूतील चार महिन्यांची प्रतीके म्हणून चार मातीची ढेकळ ठेवून त्यावर पाण्याने भरलेली छोटी घागर ठेवतात. घागर ही समुद्राचे प्रतिक मानल्या जाते. या घागरीवर पुरी पृथ्वीचे प्रतिक. पापड,सांडोयी-कुरडई चाऱ्याचे प्रतिक. वडा-भजा चवीचे प्रतिक. करंजी आर्थिक संपन्नतेचे प्रतिक. असे पदार्थ ठेवण्यात येतात. तसेच विड्याचे पान व सुपारी सुद्धा ठेवण्यात येते हे राजा व त्याच्या गादीचे प्रतिक आहे.
खड्ड्याच्या भोवती गोलाकार १८ धान्यांची रास मांडण्यात येते त्यात अंबाडी,सरकी,ज्वारी,तूर,मुग,उडीद,तीळ,भादली,बाजरी,हिवाळी मुग, धान, जवस, लाख, वाटाणा, गहू, हरभरा,करडी,मसूर. संध्याकाळी ही सर्व पूजाअर्चा विधिवत केली जाते. त्यानंतर सर्व घरी येतात रात्रभर याकडे कुणीही येत-जात नाही, दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी घट मांडणी ची बारकाईने पाहणी केली जाते रात्रभरात मांडणी मध्ये जो काही बदल घडून आला असेल त्यानुसार पिक पाणी, पर्जन्य, याविषयावर अंदाज व्यक्त करण्यात येतो.
चंद्रभान महाराजांचा जयजयकार करण्यात येतो. त्यांचे वंशज एक एक करीत सर्वच अंदाज व्यक्त करतात आणि शेतकरी बांधव ते लिहून घेतात व त्या प्रमाणे पिक पाण्याचे नियोजन केले जाते.
भेंडवळ च्या घट मांडणीतील यावर्षी २०१६ चे अंदाज : हे वर्ष भूमीपुत्रासाठी लाभदायक राहणार असल्याचे भेंडवळ घट मांडणीतून दिसून येते. यंदाचा पाऊस साधारण स्वरूपाचा राहील तसेच पहिल्या महिन्यात साधारण पण अधून मधून पाऊस पडेल. दुसऱ्या महिन्यात चांगल्या पावसा सह अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर तिसरा महिना उत्तम पावसा सह अतिवृष्टी चा इशारा. अशा प्रकारचे अंदाज व्यक्त करण्यात आलेत. संपूर्ण देशात गुरांसाठी चारा-पाणी टंचाई राहील,तीळ हे पिक साधारण असून मुग,उडीद या पिकांची काही भागात नासाडी होण्याची शक्यता वर्तवली आहे. जवस तांदूळ या पिकांची सुद्धा नासाडी संभवते,गहू,हरभरा या पिकांना बाजारपेठेत तेजी मंदी असू शकते.
तसेच परकीय शत्रूंमुळे देशावर संकट येऊ शकते त्यामुळे संरक्षण विभागावर ताण वाढण्याची शक्यता आहे. अशा प्रकारचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
देशावर आर्थिक स्थितीचे सावट येऊ शकते. राज्याला हे वर्ष ठीक नसून त्याच्यावर अनेक राजकीय आणि आर्थिक संकट येऊ शकतात. असेही अंदाज व्यक्त करण्यात आले आहे. हे कितपत तंतोतंत खरे होऊ शकते हे ईश्वराला माहित. कारण आपण ईश्वर नसून आपण सामान्य माणूस आहोत त्यामुळे आपण विश्वास आणि श्रद्धेच्या बळावर फक्त तर्क वितर्क लावू शकतो. यावर विश्वास ठेवणे किंवा न ठेवणे हा श्रद्धेचा विषय आहे.