आयुष्य

“आयुष्य”

आयुष्य, आयुष्य म्हणजे काय आहे?
जगण्याची एक हाव आहे.
चढ-उतार होणारा,
प्रेमळ भाव आहे.

आयुष्य म्हणजे काय आहे ?
वाहत्या पाण्यातील नाव आहे.
फाटलेल्या पतंगाचा ताव आहे.
पाण्याच्या काठावर वसलेले,
एक गाव आहे.

आयुष्य म्हणजे काय आहे ?
सुख आले पदरी की स्वर्ग आहे.
आणि दुःखाच्या झळा लागल्या,
की नर्क आहे.

आयुष्य म्हणजे काय आहे ?
झाडाचं पिकलेलं पानं आहे.
मोल जाणलं त्याचं की,
सोन्याची खान आहे.
अन्यथा उजाडलेलं,
ओसाड रान आहे.

आयुष्य म्हणजे काय आहे ?
यमाच्या दारात बांधलेली गाय आहे.
हळदी-कुंकाने पुजलेले तिचे पाय आहे.
नाहीतर, नाहीतर
कसायाच्या हाती दिलेली माय आहे.

आयुष्य म्हणजे काय आहे ?
देवाने दिलेले अनमोल धन आहे.
उपयोग चांगला केला तर पुण्य आहे.
फुकट गेलं तर पाप आहे.
देवाच्या हाती असलेल्या,
तराजूचे माप आहे…..

सौ. अनिता भागवत येवले
बुलडाणा