वेशीवरच्या भूतांची जत्रा

वेशीवरच भूत तिसरा भाग
आज अमावस्या हाये अन बबन्या वेशीवरच भूत हाये हा तमाशा नाई हे तर या भूतांची जत्रा आहे. सगळे विचार करू लागले की इथून निघायचं कस ? त्यातील कुणालाच माहिती नव्हत की त्या जत्रेतून ते घरी जातील की नाही तर…. आता पुढे
महादू बुआ बोलले पोरहो आपुन चांगलच गोत्यात आलो आपलाच नाद आपल्याला भवला मले पहिले सांगा तुमाले अठीसाक काय काय दिसून रायल. त्यावरच पुढचं ठरवता येईल.
किशऱ्या बोलला मले अठी तंबू नाई दिसत हे स्मशान आहे. अन अठी सर्व दूर मांस, रक्त, हाड, कवट्या पडून आहेत. जे फुल हातात बांधली ते हाडा-मासाचे कुजलेले तुकडे हायेत. त्या घुबळा बबन्याच्या अंगावर बसून हायेत. बबन्या रक्त पीत आहे.
जाक्र्या बोलू लागला मी तर पहिलेच सांगितलं की मले अठी स्मशान दिसते, हा तमाशा एखांद्या स्मशानात हाये म्हणून.
वीराट्या बोलू लागला की मले अठी दूर दूर लोक भूत रगत-मास विकताना दिसत हायेत अन बाकीचे भूत ते इकत घेऊन रायले.
सुन्या बोलला अबे मले त लयच भीती वाटून रायली अठी… मी तमाशात आल्तो तहाच बोललो होतो की मले अठी घुबळा दिसून रायल्या म्हणून. आता त आकाशी पायना बी दिसून रायला भूतायची पोर त्यात बसून मजा घेऊन राय्लेत. किशाऱ्या बोलला काई भी म्हणत काबे भूत कुठून आन्तीन आकाशी पाळणा ? अन मले कावून दिसत नाई मंग अस काई ?
मन्या बोलला अबे मले त अठी हाटेली दिसून रायल्या बॉ…त्यात ले मोठे पदार्थ बनवेल हायेत काई लोक जेलेबी तउन रायलेत. त काई इकत घेऊन खाऊ लागलेत.
दिप्या बोलला अबे मले अठीसाक अस काहीच दिसून नाई रायल फकत अंधार हाये अन त्यात रोजच्या सारखे कुत्तळे भूकून रायले अन काई माजरी, रानकुत्रे, हिंडून रायले अन आपुन सध्या गावाच्या लयच दूर आहोत जंगलात आहोत आपुन. अठीसाक स्मशान नाई हाये. स्मशान त गावाच्या बाहेर हाये. हे जंगल हाये जंगल. गावाच्या बाहेर सुन्याच्या वावरात उभ रायल की जे टेकडी दिसते त्या टेकडीच्या खाली दरीत उभ असू आपुन.
मानकू बोलला हा दिप्या बरोबर बोलते मले भी तुम्ही लोक सांगता तस काई दिसत नाई हा दिप्या म्हणते तसच वाटते मले भी.
महादू बुआ बोलू लागले कशी गोठ करता तुम्ही दोघ भी तुम्ही दोघ त दत्ता आबाचे पेठ आहात मंग तुम्हाले त सगळ दिसाय्ले पाहिजेत. असो बॉ तुम्ही भारी माणस तुम्ही म्हणता तर दिसत भी नशीन. पण मले किशऱ्या म्हणते तसच दिसते अन लयच घाण कुजेल वास येऊन रायला अठीसाक, त्यात आपल्याले अठी उभ भी राहू देत नाई कोणी. किती लोक धक्के-बुक्के देऊन जात हायेत, पाय ठेव्याले भी जागा नाई अठीसाक… अन त्यात मले दिसून रायल की आपल्याले चारही बाजून भूत, चुडेल, आग्या, वेताळ अशा सैन्याचा वेढा हाये हे आत्मे हातात अलग अलग चमकणारे गोळे घेऊन उभे हायेत. त्यात ते चमकणारा चाबूक फेकून हाणतात, काळ्या माजरीच्या गयात चामड्याचा दोर बांधून हे आत्मे त्यायले नियंत्रित करत हायेत. कोणी तरी मोठा राक्षस त्या दक्षिणे कडून एका काया घोड्यावर बसून येऊन रायला असे दिसते. त्याच्या अंगात भारी लोखंडाचे व काया रंगाचे कपडे हायेत, त्याच्याजोळ अलग अलग हत्यार हायेत. त्यान एक अलगच कवट्याचा मुकुट डोक्यात घालेल हाये. तो राक्षस आता घोड्याहून खाले उतरला. त्याच्या समोर सर्व भूत वाकून हायेत. तो सर्वांच्या अंगावर पाय देऊन पुढे जात हाये सगळे भूत त्याच्या समोर झुकू रायलेत. तो यायचा राजा अशीन वाटते. हा बबन्या भी गेला आता त्याच्या जोळ तो राक्षसराजा बबन्या ले इचारून रायला की कशी हाये तुई वेस बबन्या म्हणते की त्या वेशीवरच राज्य करण चालू हाये अजून तर, असे बाकी सगळे पिशाच्च, भूत, आग्या, वेताळ, ब्रह्मराकेस, चुडेल, हाकीन, डाकिन, चकवा, मुंज्या, असे सगळे अलग अलग अतृप्त आत्मे हजेरी लावून रायलेत त्याच्याजोळ. सोम्या अन रेखीच्या घरचा बॉ भी तठी दिसून रायले त्या दोघायले अन ले मोठ्या लोकायले तकलीफ देन सुरु हाये. अन घुबळ, वटवाघूळ, कावळे, अलगच प्रकारचे मिठ्ठू, कधी न पायलेले प्राणी अठीसाक दिसून रायलेत. त्यान सर्व भूतायले एक एक टीप भरून काई तरी देल. सर्व ते आता पीत हायेत मले वाटते ते पिऊन त्यायच्या अंगात आल म्हणजे ते दारू असावी. सर्व आता कुजेल मास खात हायेत.
अन जोर जोरात बोंबलत हायेत अशुद्ध अन घाण तेच आमची जान ….. तेवढ्यात एक त्यायच्यातलाच भूत उभा रायला तो जरा राज्याच्या खालोखाल दिसून रायला मले त्यान भी तसेच काये कपडे अन लोखंडाचा डरेस घालेल हाये. तो म्हणते की राकेसराज आजकाल आपल्याला पछाडता येईल असे लोक भेटत नाईत काय उपाय करता येईन त सांगा ? तो राकेसराजा कडाडला त्या भूतावर अरे आता नाई भेटत म्हणता त मंग काय सतयुगात भेटतीन अरे हे युग सध्या बयकेल हाये अठीसाक आता कोणी एवढ धर्माच-शास्त्राच पालन करत नाई. जागोजागी त अशुद्ध, अपवित्र लोक हायेत. आज या लोकांसाठी त सन्मानाचा विषय हाये मदिरा पिणे, व्यसन करणे, आपल अनुकरणच तर करत हायेत हे लोक…आता तेच पाय तिकडे उभे हवस, कामाग्नीने प्रदीप्त झालेले लोक तमाशा पहायच्या नादात आपल्या जवळ स्वताच येऊन पोहचलेत. त्यांच्यात काहींच्या नावराशी होत म्हणून काही आपल्या तडाख्यात सापडले तर काही स्वताहून आपल्या जवळ आलेत. काही लोभ, मोहाने ग्रासलेले आहेत तर काही काम, क्रोधाने ग्रासलेले तर काहींना अतिरिक्त अहंकार आहे की मी धार्मिक आहे मंग मले काहीच होऊ शकत नाही. पण त्यांना हे माहित नाही की सात्विकता महत्वाची असते आणि आज या तमाशाला आलेल्या लोकांजवळ एकाकडेही सात्विकता नाही. असे महादू बुआ सर्वांना सांगू लागले तेवढ्यात सोपान्या सायकलवाला बोलला बरोबर हाये महादू बुआ आपल्यात जास्त अनुभवी हायेत ते जे सांगतात ते सर्व त्यांना दिसत असेल. महादू बुआ बोलले सोपान्या आपल्या सारखेच या तमाशाले लय लोक येल हायेत गड्या अन सगळे या राक्षसांच्या तडाख्यात आलेत. तसा जनाबुढा बोलू लागला महाद्या मले वाटते गड्या आता आपुन काई आठून जितं जाऊ शकत नाई मले भी तू जे सांगत ते थोड अस्पष्ट दिसून रायल पण नेमक काय दिसते हे तून सांग्ल्या वर समजल. आता अपुन काय कराव. महादू बुआ बोलले की अठून कस निघता येईल ते पहा आता. तेवढ्यात महादू बुआ बोलले किशऱ्या पय बाबू त्या राकेसान आताच तुव नाव घेतलं किशऱ्या म्हणे हाव हो काका मीनं भी आयकल पण या भूतायचा अन माया काय संबंध ? हे माय नाव काहून घेऊ लागलेत ? तेवढ्यात एका भुताने किशऱ्याला पकडले आणि किशऱ्या ला ओढत नेऊ लागला आणि किशऱ्या राक्षसराज समोर उभा होता. राक्षस बोलू लागला याला आपल्या दुनियेतील सुखद आनंद द्या याची चांगली खातिरदारी करा.
मग किशोर ला आकाशी पाळण्यात बसवले त्याला गर गर फिरवले….नंतर घोड्यावर बसवले अतितीव्र गतीने फिरवले किशऱ्या उलट्या करत होता….त्याचं पोटातल सर्व तोंडात येत होते…. त्याला विस्तवावर चालवले….. आता त्याला सडलेल कुजलेल खायला दिल किशऱ्या ते खायला तयार होईना…..तेवढ्यात राक्षसराज बोलला तुला आठवत नसेल मागचा जन्म पण मी आठवण करून देतो. मागच्या जन्मात लय माजला होतास तू ? तुवा भाऊ एक राज्या होता तहा तून आम्हा सर्व भूत प्रजातीले खाऊ की ठू करून सोडलत पण आता पाय या जन्मात न तुवा भाऊ संग हाये न तुले कोणी वाचवणार.. अन तो तुवा दुसरा लहान बिघडलेला भाऊ भी दुसऱ्याच कोण्या ठिकाणी जन्माले येल हाये. त्याचा लय लाड करायचे न तुम्ही आता परत पोरीचाच नाद करीन तो……अन स्वताहून येईन आमच्या तडाख्यात…. अन हासायले लागला हा हा हा हा हा……हुन्ह्छछ्छ्ह्ह…..व्हान्न्न्नन्न्न्नन्न…….हे हे हे हे …… तुवा हिशोब करून झाला की आम्ही त्या तुया भावले भी समजावू त्यान मागच्या जन्मात अतिरिक्त अशुद्ध अपवित्र आचरण ठेवलंत बायायचा नाद केलता, अनाचार, व्यभिचार केलते पण तुम्हीन त्याले आमच्या दुनियेत घेऊन जाण्या पासून वाचवल होत आता तो अन तुम्ही सगळे आपापल्या कर्मान जनम घेऊन अलग अलग ठिकाणी आलेत. तुम्हाले समझीन की केलेल्या चुकांचे फळ हे जन्म संपला की संपल सगळ असे कधीच होत नसते. ते भोगावेच लागते तुम्ही सुटले असान वरच्याच्या हातून पण मी सोडणार नाई. तुम्ही मेले की दुनिया विसरत असते तुमच्या केलेल्या कार्माले. पण आमच्या सारखे अतृप्त आत्मे कधीच विसरत नाहीत. अन बदला घेणे हि तर आमची मुख्य प्रवृत्ती आहे.
या महाद्याले भी माहित नाई की हा पहिले कोण होता तर हा भी लय खेटेल हाये माया संग मी आता याले भी नाई सोडणार. अन परत हसायला लागला हा हा हा हा…. ते दानवीय….राक्षसी…..असुरी हास्य बघून सोपान सायकलवाला बोलला महादू बुआ हे काय ऐकू येत हाये. हे भूतांची जत्रा तर लयच बेकार हाये आणि तेवढ्यात सोपान्याच्या छातीवर भर भक्कम आघात झाला व सोपान्या कोसळला……तसा महादू बुआ ला काहीतरी चांगल होणार असा आशेचा किरण दिसायला लागला…. आले कुणी तरी आपल्याला या भुताच्या जत्रेतून मुक्त करायला. पण कोण असेल हि शक्ती याची कोणालाच कल्पना नव्हती सर्वांचे नेत्र त्या शक्ती कडे लागून होते. काय होईल पुढे हे कुणालाच माहित नव्हत.. एक महाभयंकर रात्र त्यांची प्रतीक्षा करत होती.
क्रमश:

ही काल्पनिक कथा असून त्याचा वास्तविकतेशी काही एक संबंध नाही.यातील नावे, ठिकाण, सर्व काल्पनिक आहे. फक्त मनोरंजनासाठी बनवली असून एमएच २८.इन अशा कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अथवा याच्याशी एमएच २८.इन चा कुठलाही संबंध नाही.

वेशीवरचे भूत

गावाबाहेर तमाशा आलाय असे कुणी सांगितले तशी सगळ्यांची लगबग वाढली एक उत्सुकता लागली… कुणी वेळ कधीचा आहे तर कुणी काय तिकीट हाये या विचारात तसे तमाशा म्हटलं कि सर्व लहान मोठ्यांची उत्सुकता वाढणारच त्यात किशोर, जाक्र्या, सुन्या, मन्या, विराट्या, दिप्या सुद्धा उत्सुक झालेत लहान होतो तेव्हा पासून ऐकतोय कि तमाशा असतो लयच भारी असतो आता तर मी मोठा झालो आहे… आणि मित्रांना सांगू लागले कि चला लय दिवसानंतर मनाला गारवा मिळणार हिरवळ बघायला मिळणार आणि नयनसुख प्राप्त होणार तसे सर्व मित्रमंडळींनी तमाशाला जाण्याचे ठरवले. काढला सर्वांनी वेळ बसली पारावर बैठक सगळे एकत्र आले बऱ्याच दिवसांनी. त्यात काही वरिष्ठ महादू बुआ, जनाबुढा, मानकू, सोपान्या सायकलवाला, बबन्या दुकानदार बोलू लागले कि पोरहो असले व्यसन चांगले नाही तुम्ही जावा काम करा… पण हि पोर कसलं ऐकतात कुणाचं… हि तिथून गेली तर खरी पण त्यांच्या मनात तेच सुरु होत कि आपण पण एक दिवस नक्की तमाशाला जाऊ पाहू काय गंमत असते तर. आणि पोर कामाला लागली पण त्यांचे कान या मोठ्या लोकांच्या गोष्टी ऐकण्यातच मग्न होती. तेवढ्यात महादू बुआ बोलले कि राजेहो हा तमाशा आला नेमका कोणाच्या वावरात कि अखिण कुठी त्याची बंदी चौकशी करा पहिले. काऊन कि मागच्या टाइमले वेशीवरच भूत आडवं आलत अन लयच बेकार गोठ झालती बुआ दत्ता आबा एन वक्ता वर नसते आले त आज आपुन जितं नसतो. दत्ता आबा म्हणजे त्या गावातील जेष्ठ आणि समजदार त्यांचा दबदबा होता ते सर्वांना चांगल शिक्षण देत, संस्कार देत, किशोर आणि बाकी मुल त्यांच्या कडे नेहमीच जायचे ते श्रीदत्तात्रयांचे एकनिष्ठ भक्त. ते किशोरला खूप जीव लावत कधी प्रसाद, ताईत तर कधी अंगारा लावण्यासाठी येत. तसेच हि लोक तमाशाची चर्चा करत असताना दत्ता आबा तिथ आले तसे सर्व लोक चिडीचूप पण आबा बोलले की लोकहो जो इचार करताय तो आजच सोडा मागच्या वेळेस मी आलो होतो यावेळी येणार नाही. या बबन्याच्या नादाला लागू नका हा पहिलेच तामसिक आहे. याले चांगली आदत कोणतीच नाही. एखद्या दिवशी हा गड्ड्यात घालीन तुम्हाले. वाईट संगतीतले लोक ना स्वताच कधी भल करत ना दुसऱ्याच. आणि किशोर ला अंगारा व प्रसाद देऊन निघून गेले. लोक बोलू लागले काहो बुआ दत्ता आबा न त आपल्याले आताच सांगितल मंग द्याचा काय इचार सोडून. तितक्यात बबन्या बोलू लागला. फालतू इचार करू नका मस्त लय दिसाबाद तमाशा आला जाऊ पायाले, त्यात घरच्या बायायले अजिबात भनक नाई लागली पाहिजे तमाशाची नाई त आपली काई खैर नाई इतकच ध्यानात ठेवा. सगळे लोक उठले आणि माहिती काढण्यासाठी गावाबाहेर जाण्यासाठी निघाले. किशऱ्या आणि त्याचे मित्र पण निघाले यांच्या मागे कि हे वेशीवरच भूत काय भानगड हाये भो… ते भी पाहू अन बाई भी पाहू कोण हाये त… कशी दिसते त.. आणि सर्व पाठोपाठ निघाले. तेवढ्यात मोठी लोक जाऊन थांबलीत तसे पोर भी थांबलेत पाहू लागले समोरचे दृश्य काय भारी हायेत त्या बाई वा वा …. लयच झक्कास आणि बघितले तंबू भी लयच मोठा बांधेल हाये… अजून तर यायची तयारी भी व्हायची बाकी दिसते आजच आले वाटते हे लोक किशाऱ्या अन बाकी पोर बोलत होते. तेवढ्यात जनाबुढा विचारू लागले कि याचा टाइम काय राहीन…. तशी मावशी बोलू लागली कि टाईमच काय बुआ टाइम त रातच्याच असतो आणि पानाचा ईडा मावशीने तोंडात टाकला. तरी बी मी काय म्हणतो कि जरसाक लोकर नाई काय चालू हू शकत…. सोंगाड्या मधी आला अन बोलू लागला आता मावशीनं ईडा खाल्ला आता मावशी काई बोलणार नाई तुमच्याशी…… बबन्या बोलला तुमीच सांगा मंग… सोंगाड्या बोलू लागला नाई आरामातच होईन, बबन्या बोलू लागला कि बाई लय दिसान आला फड गावात. बाई बोलल्या काय सांगा तुमाले आज काल कोणी भी बलावत नाई अन पहिल्या सारखं नाई रायल आता बुआ… भविष्यात हे कला राईंन कि नाई देव जाणो.
आणि सोंगाड्या सर्वांना घेऊन तंबूत निघून गेला हे लोक निघाले तिथून आणि त्यांचे लक्ष त्या पडक्या स्मशानाकडे गेले ते दचकले कि आता रोज रातच्याला इथून जाण म्हणजे हे भूत काई परेशान न करो. तेवढ्यात सोपान्या बोलला कि हे पहा आपुन रोजच्या रोज त काई येऊ नाई शकत बुआ इतका पैसा नाई आपल्याजोळ उधळायले त्यामुळे आपुन सगळे एकाच टाइमले येऊ अन तमाशा पाहून जाऊ म्हणजे या भुताचा भी घोर होणार नाई आणि कोणाले माहित बी पडणार नाही. त्यात किशऱ्या बोलला कि मले कदी तुमीन संग येऊ देल नाई त मी तुमचं नाव काकुले सांगून दिन… सगळे बोलले कि अबे तुले माईत हाये काय किती परेशान होते माणूस… आमचं आमाले माईत आम्ही कशी करतो हे तारेवरची कसरत त. सगळ्यांनी विचार केला आणि फायनल झालं एकदाच कि सगळे संगच जाऊ पण पहिले त्या वेशीचे काई तरी करावं लागिन.. किशऱ्या बोलला कि मी लहान होतो तहा पासून एकून हावो कि त्या येशिवर भूत रायते पण तहा मले कोणी बी कैच सांगत नव्हतं पण आता तरी सांगा आता मले भेव वाटत नई. तसे सगळे शांत झाले व किशाऱ्याला शांत करून पटापट पाय उचलून चालू लागले तसे ते पारावरच थांबले. किशऱ्या ला काही सुचत नव्हते कि कोणाचं हाये ते भूत अन ते वेशीवर काऊन रायते अन हे लोक इतके काऊन भेतात त्याले.
दिवसा मागून दिवस जात होते आणि किशऱ्या तमाशाला जायची वाट बघत होता आणि त्याच्या आईला आबाला सर्वांना जो भेटेल त्याला वेशीवरच्या भुताची गोष्ट विचारायचा एक दिवस त्याचे आबा त्याला सांगू लागले कि काही वर्षा पूर्वी आपल्या गावात सोम्या नावाचा पोरगा राहत जाय… एक दिस तो रातच्या वावरातून चिंचा घेऊन येत होता त्याच्या सायकलवर हे भूत बसलत… अन त्याची सायकल उलट्या दिशेने चालत होती त्याले काही सुधरत नव्हतं तो घामाघूम झाला अन त्यानं ते सायकल सोडून देली अन कावऱ्या बावऱ्या सारखा पयतच सुटला जसा वेशीच्या आत आला तसा त्याचा त्या भूतान पिच्छा करण सोडून देल तहा पासून सारे लोक वेशीवर भूत हाये ते लोकायले धरते असे म्हणतात. पण काई दिसच तो सोम्या रायला गड्या त्याले रातच्या बेरातच्या सपन दिसे ले बिमार पडला ले औषध गोया खाल्ल्या पण काईच फरक नाई शेवटी गेला तो साऱ्यायले सोडून. त्यानंतर ले किस्से घडले लय लोकायले धरेल हाये त्या भूतान…… आणि गुलाबभाऊ बोलू लागले.
असाच एक किस्सा झाला होता गावात रेखीच्या लग्नाच्या वेळेस. रेखीच लगन लागल अन दोन दिसात तिच्या घरच्या बुआ ले या वेशीवरच्या भूतान धरलत. तो बुआ तिले घ्याले घरी आलता अन रातभर रायला आमच्या सोबत गप्पा केल्या अन पायटे निघीन त त्याच्या काय मनात आल काय माहित म्हणे मी तुमच गाव पाहू इच्छितो मंग दिसभर गावात हिंडला गाव पायल रात झाली म्हणे निघतो बुआ आमी आता आणि निघाला रात्री जसा वेशीच्या बाहीर गेला तसा वेशीवरच्या भूतान त्याला घोयसल.. रेखी उतरली बैल गाड्यातून अन चिंग पयत सुटली तशी गावात युनच थांबली भला मोठा आक्रोश कारे तिचा बुआ गावाबाहीर कुत्तळ्या सारखे आवाज करे भुके जोर जोरानं भूऊऊऊऊ…… भूऊऊऊऊ……. भूऊऊऊऊ असे त कदी मांजरी सारखे आवाज करे…. कोणी म्हणे पावन्याले पिशाच्च झोंबल…त कोणी म्हणे की हे वेशीवरच भूत हाये… बंद गाव ताटल्या वाजवत निघाल गावाबाहेर. तेव्हा बी त्या दत्ताआबा न केलत बुआ सार तो आबा ले अनुभवी माणूस हाये. त्यायन गावा बाहीर जाऊन धरल त्या पावन्याले अन दोन-चार लोकायन उचलल अन आणल न भो वेशीच्या आत अन इतक्या जोरयान बोंबलला तो पावना की चितच झाला. त्याले जडीबुटी चा काढा देला प्याले अन पावना काईच काईच करे… लय दिस त बिमारच होता अन एक दिस गेला बॉ सोडून बंद्यायले….आबा म्हणे की त्याच्या अंगाले लग्नाची हयद होती हयदीच अंग असताना त्यान गावाबाहीर हिंद्याले नव्हत पाहिजेत.
असे किती लोकायले धरल त्या भूतान अन कितीक बिमार पडले अन कितीक सोडून गेले. आज बी कोणी माणूस हिंमत करत नाई रातच्या वेशीबाहेर जाण्याची. किशऱ्या बोलू लागला आबा वेशीच्या बाहेरच काऊन धरते ते भूत वेशीच्या अंदर काऊन नाई येत. आबा बोलू लागले पोरा वेशीले लय महत्व हाये वेस आपली सीमा हाये जठलोक वेस हाये तठलोक देवाची कृपा रायते वेशीच्या बाहेर म्हणजे गावाच्या बाहेर गाव संपलं असा समज. गावाच्या बाहेर त्यायचच राज्य जंगल, जंगली जनावर, हे अतृप्त आत्मे हे बंदे गावाच्या बाहेरच रायतात म्हणून स्मशान भूमी गावाच्या भाईरच असते. म्हणून तुले सांगत असतो कि बाबू गावाच्या बाहीर जात नको जाऊ… दिवस पायन नाई…. टाइम पायन नाई…. बस चालले आपले पोराय संग कुठी बी. किशऱ्या थोडा भांबावला होता हे सगळं ऐकून… पण आबा मले भेव वाटत नाई… आबा बोलले पोरा संकट काय सांगून येत असते व्हय. संकट येते तहा समजते कितीही मोठा माणूस असो त्याची टरकतेच. ते सोड मले सांग तु आज येणार नाई काय तुई आई अन मी तर चाललो दत्ता आबाकडे भजनाले…किशऱ्या चाला आबा मी, सुन्या, जाक्र्या, मन्या, वीराट्या बंदे तयार हावोत आमी बी येतो तुमच्या संग…सगळे पोहचले दत्ता आबाच्या घरी अन बसले. सगळ्यांनी आबाला प्रणाम केला आणि अंगारा डोळ्याला,कपाळाला लावला. आणि एकू लागले. दत्ता आबा सद्गुण आणि अवगुण यांच्यातील भेद समजावून सांगत होते. अहंकार माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. काम, क्रोध, लोभ, मोह माया, आणि अहंकार हे ज्याच्याजोळ असतात तो माणूस न कधी स्वताची प्रगती करत न दुसऱ्याची. माणसान मर्यादेत रायल पाहिजेत. कधी अधर्माची पायरी चढू नये, देव-पूजा करत रहाव. ज्याच्या मुखी देवाचे नाम…तोच सुखी हाये. तेवढ्यात दत्ताआबा बोलले लोकहो आपल्या गावाच्या बाहेर तमाशा आलेला आहे त्याचा नाद करन वाईट गोष्ट आहे. चांगल्या माणसान त्याची पायरी चढू नये अशे उपदेश लोक ग्रहण करत होते. आणि रात्र झाली सर्व आबाला प्रणाम करून घराकडे निघाले. रात्र झाली होती किशऱ्या झोपी गेला. सकाळ झाली तसा बबन्या गोठ्यात किशऱ्या जोळ आला व सांगू लागला आज संध्याकाई जायचं हाये तयार रायजो. किशऱ्या आज थोडा लवकरच उठला तयार झाला आणि घरची नित्याची कामे करू लागला. आणि तो क्षण आला झाली संध्याकाळ भेटले सगळे पारावर. आणि वाट पाहू लागले बबन्याची. महादू बुआ बोलले की एन वक्तावर हा बबन्या कुठी गेला ?
वाट पाहून थकले तेवढ्यात सोपान्या आला अन बोलला की बबन्या वावरात जायेल हाये तो आपल्याले गावाच्या बाहेरच भेटीन… अठी टाइम लाऊ नका चाला आता. निघाले सगळे तेवढ्यात महादू बुआ बोलले कि चाला गडे हो भूक नसो पण शिदोरी असो आणि सर्वांना घेऊन मंदिरात गेले आणि पुजारी बुआ ला सांगितले कि बुआ आमच्या हातात गंडा बांधून द्या आम्हाला गावाबाहेर वावरात जायचं आहे. आणि तेवढ्यात तिथे काकू आल्या आणि त्या बघतील म्हणून सगळ्यांनी तो गंडा लपवला सर्व तिथून निघाले आणि चालू लागले तेवढ्यात वेस आली तसे महादू बुआ बोलले गडेहो मायी काई इच्छा होत नाई गावाबाहेर येण्याची मी चाललो घरी तुमाले यायचं असलं तर सांगा….हे कुत्रे पहा कशे बोंबलुन रायले….महाभयाण स्मशान शांतता हाये आज त…त्यात कोणी तरी म्हणे आज वावरत की आजची अमावस्या आहे. खरच आजचा दिस कोणता हाये लेकाचा रोजच्या पेक्षा जास्तच अंधार जाणवते.. अन साऱ्यात जास्त ज्याले घाई झालती तो बबन्या बी नाई आला आपल्या संग… जनाबुढा म्हणे काय भेत बे लहान हाये का तू आता चाल न मस्त मजा घेऊ. तस बी किती वर्ष झाले काई मनोरंजन झाल नाई…. महादू बुआ म्हणे नाई बुआ तुमी काय बी म्हणा माय मन म्हणते कि घरी गेलेलं बर राहीन…. मानकू तेवढ्यात बोलला बरबर हाये त्यायचं मी घरून निगतानाच बोललो होतो कि आजचा दिस भी काय सुदा नाई आपुन दुसऱ्या कोण्या दिशी जाऊ पण हा सोपान्या आयकत नव्हता. अन बबन्यान मले पायटीचं सांगून ठेवलंत कि मी वावरात जातो तुम्ही वेस वलांडली कि मले भेटा… आपुन त वेशीच्या बाहेर आलो पण हा बबन्या काई अजून आला नाई. तेवढ्यात १०-१२ काळ्या मंजरींनी त्यांच्यावर उद्या मारल्या सगळे घाबरले…. शेवटी किशऱ्या बोलला या बबन्यानच सांगितलं होत कि गावात तमाशा येल हाये म्हणून… आन हाच इतकी घाई करून रायला होता अन ऐन वक्तावर हाच गायब हाये मले काई अलगच वाटते यात… अन अश्या माजरीच आपल्यावर झेप घेण मले त काई भलताच संशय येऊन रायला. तेवढ्यात बबन्या आला…सारे लोक बोलले त्याले की हा टाइम हाये काय ? तुले टाइमाच काईच महत्व नाई. बबन्या म्हणे किती वाळखोचा वाट पाहून रायलो मी…आता जाऊद्या… टाइम लाऊ नका … चाला….. चाला हो …… टाइम लावू नका… बबन्याने सर्वांना पटवलं आणि चालू लागला. कुणालाच माहित नव्हते कि तो बबन्या हाये की वेशीवरच भूत. येणाऱ्या संकटाची कुणालाच चाहूल नव्हती….आणि एक भयंकर रात्र त्या सर्वांची प्रतीक्षा करत होती.
क्रमश:

ही कथा फक्त मनोरंजनासाठी असून एमएच २८.इन अशा कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अथवा याच्याशी एमएच २८.इन चा कुठलाही संबंध नाही.