बुलडाणा औरंगाबाद बस ब्रेक डाउन

Buldhana ST buses

बुलडाणा येथून औरंगाबाद ला निघालेली बस अचानक सिल्लोड नजीक ब्रेक डाऊन झाल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. तर औरंगाबाद येथून बुलडाणा कडे येणाऱ्या प्रवाशांना औरंगाबाद बस स्थानकावर ताटकळत बसावे लागले. यामुळे प्रवाशी रोष व्यक्त करताना दिसून आले. दुपारी ३.३० वाजता बुलडाणा येथून औरंगाबाद करीता फेरी आहे. सदर बस औरंगाबाद येथे रात्री ७. ३० वाजता पोहोचते आणि परत बुलडाणा कडे परतीच्या प्रवासास निघते. रात्री ७. ४५ ला औरंगाबाद हुन सुटणारी ही शेवटची बस आहे. परंतु ही फेरी अनेकदा नियमित असल्याची तक्रार प्रवाशी करतांना दिसून येतात.

आज बुलडाणा येथून औरंगाबाद ला निघालेली बस वेळेप्रमाणे बुलडाणा बस स्थानकावरून सुटली होती परंतु सिल्लोड नजीक ब्रेक डाऊन झाल्याने पुढील प्रवासास बस मार्गस्थ होऊ शकली नाही. परिणामी या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मागून येणाऱ्या बुलडाणा ते नाशिक बस मध्ये बसून देण्यात आले. या बाबत बुलडाणा आगारा सोबत संपर्क केला असता त्यांना झालेल्या प्रकाराची कुठलीही माहिती नसल्याचे समजते. या बसच्या प्रतीक्षेत असलेले अनेक प्रवाशी औरंगाबाद येथे अडकून पडलेले होते. औरंगाबाद येथील चौकशी कक्षात संपर्क केल्यावर बस रद्द झाल्याचे समजले. याशिवाय सदर फेरी बंद झाली असे सुद्धा औरंगाबाद येथील चौकशी कक्षात बसलेले अधिकारी प्रवाशांना सांगत असताना दिसून आलेत. सदर बस अनेक वेळा उशिरा धावतांना दिसून येते तर काही वेळेस कुठलीही सूचना न देता फेरी रद्द केल्या जाते. निदान या बस ला नियमित करावे किंवा बसमध्ये बिघाड असल्यास दुसरी बस या मार्गावर देण्यात यावी अशी मागणी प्रवाशी करीत आहेत.