महानुभाव पंथीयांची काशी- कनाशि

खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यापासून साधारण आठ किलोमीटर अंतरावर असलेल गाव “कनाशि”. तस बघितल तर हे गाव सर्व सामन्याच्या ओळखीतल अजिबात नाही. परंतु या कनाशीने आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे. महानुभाव पंथाच्या उपासनेची सुमारे आठशे वर्षांची दीर्घ परंपरा या गावाला आहे.

महानुभव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांनी कनाशीला भेट दिल्याची एक आख्याय‌िका आजही सांगितली जाते. तेव्हापासून आतापर्यंत या गावाने महानुभाव पंथाची जोपासना केली. गावाबाहेरील झऱ्याजवळ आणि गावातील ब्राह्मणाच्या घर असलेल्या गढीवर मोठे सुरेख असे मंदिर उभारण्यात आले आहे. पाहताक्षणी कुणालाही या मंदिराची सुरेख बांधणी भुरळ घालते. पण त्याहून ही वेगळे असे या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे या गावात कुणीही मांसाहार करीत नाही. या गावात प्राणीहत्या वर्ज्य आहे. गावातील प्रत्येक घरात महानुभाव पंथ जोपासला असून आजची तरुण पिढी सुद्धा हे सर्व काटेकोरपणे पाळताना दिसून येते.

गावामध्ये कोंबडी, शेळी यासारखे प्राणी‌ही पाळले जात नाहीत. अन् या गावातल्या कोणत्याही दुकानात व‌िक्रीसाठी साधं अंडेही म‌िळत नाही. गावातील संपूर्ण जनसमुदाय गुण्यागोविंदाने नांदत असून गावात वाद तसे क्वच‌ितच होतात. असे म्हणतात की, गावातील या गढीवरील स्वामींच्या मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भक्ताची मनोकामना पूर्ण होते, अशी भाव‌िकांची धारणा आहे.
या गावास महानुभाव पंथीयांची काशी- कनाशि असे सुद्धा म्हटले जाते.