शहराचं येडं

Shaharach Yed Kavita

शहराले जायचं येडं करी भल्याभल्याले येडं,
मशिनीगत धावणाऱ्या शहरापरीस बरं आपलं खेडं ।
दोन घडीक बोल्याले न्हाई कोण्याले फुरसत,
पैका कमावतात लोकं पर आयुष्यात न्हाई बरकत ।। १ ।।

इमारती येवढ्या उंच नजर पुरत न्हाई,
मानसायची गर्दी येवढी पाय ठेव्याले जागा भेटत न्हाई ।
नुसतं दिव्यानं चाकाकणार जग हे,
पण माणुसकीचा राजा पत्त्याचं दिसत न्हाई ।। २ ।।

दंगली, खून, दरोडा, अक्सिडेंट हे तं रोजचंच झालं,
त्याशिवाय लोकायलेबी चैन पडत न्हाई ।
परत्येक माणूस जगण्यासाठी एकदुसऱ्याचा गळा कापतो,
इमानदारी, संस्कृती, सभ्याचाराचं इथं दर्शन बी घडत न्हाई ।। ३ ।।

माणसाचं मशिनीबिगर काम अडतं,
पर माणसाचं माणसाबिगर काम अडत न्हाई ।
माणसाचा मशिनिवर जीव जडतो,
पर माणसाचा माणसावर जीव जडत न्हाई ।। ४ ।।

इथं राजा शेजारी शेजाऱ्याले वयखत न्हाई,
मारून बी टाकलं शेजाऱ्याले तारिबीन कोण्यालेच हरकत न्हाई ।
माणसाच्या या रानात खोट्या परतिष्ठेचं बी पेरल्या जातं,
पर मनाच्या शांतीची हिरवय इथं कधीच उगवतचं न्हाई ।। ५ ।।

अजीतसिंघ जाठ.
मो : +९१ ८१४९३१७१११