माळी समाज राज्यस्तरीय युवक-युवती परिचय महासंमेलन शेगाव येथे संपन्न.

माळी समाज राज्यस्तरीय युवक-युवती परिचय महासंमेलन वर्ष २३ वे.

माळी सेवा मंडळ खामगांव, माळी समाज बहुउद्देशीय मंडळ शेगांव व युग पुरुष महात्मा फुले बहुउद्देशीय प्रतिष्ठान अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने माळी समाज राज्यस्तरीय युवक युवती परिचय महासंमेलन शेगांव येथे दि. १४ ते १५ जानेवारी २०१७ दोन दिवसीय आयोजित केले होते. आयोजनाचे स्थळ महात्मा ज्योतिबा फुले मंगल भवनाची नियोजित जागा, संत श्री सावता नगर, नवोदय विद्यालयाजवळ, खामगांव रोड शेगांव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र येथे संपन्न झाले.
येथे प्रमुख मान्यवर म्हणुन माजी. आमदार श्री. कृष्णरावजी इंगळे जळगांव जामोद,
माजी. आमदार श्री. लक्ष्मणरावजी तायडे बाळापुर, मा. अध्यक्ष श्री. संजय अवधुतराव वानखेडे अकोला, इंजी. श्री. सुभाष नामदेवराव निखाडे खामगांव आणि इतरही अनेक मान्यवर येथे उपस्थित होते.
महासंमेलनाची सुरुवात दिप प्रज्वलनाने मा. प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आली. त्या नंतर मान्यवरांचे पुष्प हाराने स्वागत करण्यात आले. येथे प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन पर भाषण दिले. त्यानंतर राज्यस्तरीय युवक युवती परिचयास सुरुवात झाली.
दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री कमल तायडे यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणुन माजी.आमदार श्री. लक्ष्मणरावजी तायडे, उद्योजक मनोज महाजन हे हि उपस्थित होते. उदघाटन पर कमल तायडे यांनी आपले विचार मांडले मुला – मुलींनी रंग रूप न पाहता एक मेकांचे गुण पाहावे. असे करणार तरच संसारात सुख व सौख्य मिळेल. मुलींनी मुलाची नौकरी न पाहता निर्व्यसनी, गुण व त्याचे विचार पहावेत असे केल्यास तुम्ही महात्मा जोतिबा फुले व सावित्री बाई फुले यांच्या विचारांना पुढे घेऊन जाणार व एका चांगल्या समाजाची निर्मिती होईल. एवढे बोलून त्यांनी आपल्या विचारांना पूर्ण विराम दिला. व इतर मान्यवरांनी हि आपले विचार व्यक्त केले. तसेच ना. श्री. भाऊसाहेब फुंडकर, आ. श्री.आकाशजी फुंडकर व आ. श्री. बळीरामजी सिरस्कार यांनी हि महासंमेलनाला भेट दिली. त्यांनी मार्गदर्शन पर भाषण दिले. माळी समाज सभागृहा साठी १५ लाख रुपये दिलेले असून आ. श्री आकाशजी फुंडकर यांनी आपल्या आमदार निधीतून १० लाख रुपयचा निधी दिला जाईल अशी घोषणा केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या राज्यस्तरीय युवक युवती परिचयास सुरुवात झाली. या महामेळाव्यात चि. राहुल सदानंद खंडारे तसेच दिशा खंडारे यांचा विवाह योग जुळला. या राज्यस्तरीय महामेळाव्यात ८५७ युवक युवतींचा परिचय संपन्न झाला. या महामेळाव्याचे आभार प्रदर्शन श्री अनिल गिऱ्हे यांनी केले. कार्यक्रमाचे उद्घोषण वनिता उंबरकर, नीलिमा इंगळे व कल्पना तायडे यांनी केले. अशा प्रकारे १४ ते १५ जानेवारी २०१७ रोजी चे २३ वे माळी समाज राज्यस्तरीय युवक युवती परिचय महासंमेलन संपन्न झाले.

ज्ञानदीप क्लासेस पातुर्डाचा अभिनव उपक्रम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संग्रामपूर तालुक्यातील ग्राम पातुर्डा बु. येथील “ज्ञानदीप क्लासेस” आणि संघर्ष ग्रुप यांनी एक अभिनव उपक्रम सुरु केला आहे. यामध्ये गावातील गोर-गरीब विद्यार्थी व विद्यार्थिनी, वयोवृद्ध नागरीक आणि ग्रामस्थांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन आणि ग्राम विकास असे उपक्रम राबवल्या जातात.

पातुर्डा येथील ज्ञानदीप क्लासेस चे ‘गजानन उगले’ आणि त्यांचा संघर्ष ग्रुपच्या वतीने गावात वृक्षारोपण, जल सिंचन, स्पर्धा परीक्षा, तसेच लेक वाचवा अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी यांचे ग्रुपचे सदस्य नितीन खंडेराव, आकाश पालेवार, राम वैद्य, श्रीकृष्ण आमझरे, विशाल खोंड, सचिन भट, लखन पवार, कुशल दवे, शंकर अढाऊ, संदीप तायडे इ. परिश्रम घेत आहेत. ‘ज्ञानदीप क्लासेस’ च्या वतीने श्री. गजानन उगले सर हे ज्यांचे पितृछत्र हरवले आहे अशा गरीब मुलांना मोफत शिक्षण देतात आणि उगले सर आणि त्यांचे सहकारी या विद्यार्थ्यांच्या नावे पोस्ट खात्यात काही रक्कम जमा करतात. तसेच त्यांना शैक्षणिक साहित्य आणि गरज असलेल्या वस्तू उपलब्ध करून देतात. याशिवाय गावातील वयोवृद्ध दाम्पत्यास मदत करणे. गावात स्पर्धा परीक्षा, वृक्षारोपण, जल सिंचन असे विविध उपक्रम राबविण्यात येत असतात.

“ज्ञानदीप क्लासेस” आणि संघर्ष ग्रुप सोबत तंटा मुक्ती आणि सरस्वती वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने गावात जनजागृती पर कार्यक्रम राबविण्यात येत असतात. एमएच २८. इन टीमने काल ग्राम पातुर्डा येथे भेट दिली असता ज्ञानदीप क्लासेस चे गजानन उगले यांनी स्वागत केले आणि आपल्या उपक्रम बद्दल माहिती दिली. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना लावलेली शिस्त, निटनेटकेपणा आणि तेथील वातावरण प्रशंसनीय होते.
आपल्या गावाच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असलेल्या या नवयुवकांचे कार्य असेच उत्साहाने व अखंडपणे सुरु राहल्यास लवकरच या गावाचा कायापालट होणार यात तीळ मात्र शंका नाही. एमएच २८.इन तर्फे या सर्व नवयुवकांचे अभिनंदन तसेच यांच्या उपक्रमास हार्दिक शुभेच्छा.

संत गाडगेबाबा ‘स्वच्छता महोत्सव’ जलंब माटरगाव येथे संपन्न

Buldana News

शेगाव तालुक्यातील ग्राम जलंब माटरगाव येथे आज दि. १९ नोंव्हेबर रोजी महाराष्ट्र शासन ग्रामविकास व जलसंधारण विभाग यांचा संत गाडगेबाबा स्वच्छता पालखी कार्यक्रम ‘स्वच्छता महोत्सव’ जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या अंतर्गत पार पडला.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक गुरुदेव सेवा मंडळ आणि महालक्ष्मी कनिष्ठ महाविद्यालय, माटरगाव तसेच पूर्णाकला महाविद्यालयाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि शिक्षक, कर्मचारी वृंद यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पंचायत समिती शेगांव येथील श्री. जाधव सर यांच्या निदर्शनाखाली सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. स्थानिक बस स्थानक परिसरात आज सकाळी ११ वाजता ग्राम स्वच्छतेचे प्रणेते संत श्री गाडगेबाबा (डेबूजी झिंगराजी जानोरकर) यांच्या महानिर्वाण प्रसंगीचे स्मृती वाहन लोकांना स्वच्छतेकडे प्रेरित करीत होते. ज्या वाहनामध्ये संत गाडगेबाबा यांनी प्रवास केला ते त्यांचे स्मृतिचिन्ह ट्रकमध्ये सजविण्यात आले होते. ज्याप्रमाणे संत गाडगेबाबा आपल्या हातात खराटा घेऊन गावोगावात स्वच्छता करीत आणि आपल्या गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला या भजनातून स्वच्छतेसह जनजागृती करीत असत. त्याचप्रमाणे आज रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात सर्व सहभागी झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि शिक्षक, कर्मचारी वृंद तसेच स्थानिक नागरिकांनी ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ हे भजन स्मरीत ग्राम स्वच्छ करून स्वच्छतेचा संदेश दिला

गावागावात जाऊन ग्राम स्वच्छतेचा संदेश देणे आणि ग्राम हागणदारीमुक्त करण्यासाठी शासनाने हे अभियान हाती घेतले आहे. त्या अनुषंगाने माटरगाव सह जलंब, पहूरजिरा यांसह इतर छोट्या मोठ्या गावात हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.