संत गाडगेबाबा ‘स्वच्छता महोत्सव’ जलंब माटरगाव येथे संपन्न

Buldana News

शेगाव तालुक्यातील ग्राम जलंब माटरगाव येथे आज दि. १९ नोंव्हेबर रोजी महाराष्ट्र शासन ग्रामविकास व जलसंधारण विभाग यांचा संत गाडगेबाबा स्वच्छता पालखी कार्यक्रम ‘स्वच्छता महोत्सव’ जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या अंतर्गत पार पडला.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक गुरुदेव सेवा मंडळ आणि महालक्ष्मी कनिष्ठ महाविद्यालय, माटरगाव तसेच पूर्णाकला महाविद्यालयाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि शिक्षक, कर्मचारी वृंद यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पंचायत समिती शेगांव येथील श्री. जाधव सर यांच्या निदर्शनाखाली सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. स्थानिक बस स्थानक परिसरात आज सकाळी ११ वाजता ग्राम स्वच्छतेचे प्रणेते संत श्री गाडगेबाबा (डेबूजी झिंगराजी जानोरकर) यांच्या महानिर्वाण प्रसंगीचे स्मृती वाहन लोकांना स्वच्छतेकडे प्रेरित करीत होते. ज्या वाहनामध्ये संत गाडगेबाबा यांनी प्रवास केला ते त्यांचे स्मृतिचिन्ह ट्रकमध्ये सजविण्यात आले होते. ज्याप्रमाणे संत गाडगेबाबा आपल्या हातात खराटा घेऊन गावोगावात स्वच्छता करीत आणि आपल्या गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला या भजनातून स्वच्छतेसह जनजागृती करीत असत. त्याचप्रमाणे आज रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात सर्व सहभागी झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि शिक्षक, कर्मचारी वृंद तसेच स्थानिक नागरिकांनी ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ हे भजन स्मरीत ग्राम स्वच्छ करून स्वच्छतेचा संदेश दिला

गावागावात जाऊन ग्राम स्वच्छतेचा संदेश देणे आणि ग्राम हागणदारीमुक्त करण्यासाठी शासनाने हे अभियान हाती घेतले आहे. त्या अनुषंगाने माटरगाव सह जलंब, पहूरजिरा यांसह इतर छोट्या मोठ्या गावात हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.