अमरावती ते पुणे नवीन रेल्वे १ जुलै पासून ?

Buldhana District official website

अनेक प्रस्ताव आणि पाठपुरावा केल्यानंतर अखेर अमरावतीकरांच्या सेवेत १ जुलै पासून पुण्यास जाण्यासाठी एक नवीन रेल्वेगाडी सुरु होणार आहे. तसे दाट संकेत मिळाले असून प्रस्तावित नव्या गाडीचे वेळापत्रक देखील इंटरनेटवर झळकू लागले आहे. ही गाडी सुरु झाल्यास अमरावती ते पुणे रेल्वे हे अंतर ७ तासांनी कमी होणार आहे.

सध्या अमरावतीहून पुण्यास जाण्यासाठी एकच गाडी असून लातूर मार्गे जाणारी ही गाडी १८ तास घेते. परंतु नवी गाडी सुरू झाल्यास अमरावतीहून पुण्याचा प्रवास सुमारे साडेअकरा तासात पूर्ण करता येणार आहे. या आधी अमरावतीहून मनमाडमार्गे दुसरी रेल्वेगाडी सोडण्यात यावी, अशी मागणी सातत्याने होत होती. अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ हे त्यात लक्ष घालून होते. त्यांच्या प्रयत्नांना आता यास आले असून अलीकडेच या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार आनंदराव अडसूळ, अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे, आमदार डॉ. सुनिल देशमुख व रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली. त्यानंतर अमरावतीहून पुण्यासाठी पनवेलमार्गे दुसरी रेल्वेगाडी सोडण्यावर सकारात्मक विचार सुरू झाला.ही नवी रेल्वेगाडी पनवेलमार्गे सोडण्याचा विचार मध्य रेल्वे करीत आहे. लवकरच या नव्या गाडीचा मुहूर्त ठरेल असे संकेत रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेत. मात्र ह्या गाडीची अधिकृत अशी घोषणा झालेली नाही त्यामुळे रुळावरून ही गाडी केव्हा धावेल ह्याची सर्व जन आतुरतेने वाट बघत आहेत.