बुलडाणा येथून पुणे ला जाणाऱ्या रात्री ९. १५ च्या बुलडाणा-पुणे बस ला औरंगाबाद जवळ अपघात झाला. अपघातात बसमधील १७ प्रवाशी जखमी झाले आहेत. एम एच १८ बीटी ४२९४ क्रमांकाची बुलडाणा-पुणे ही बस काल नेहमीप्रमाणे बुलडाणा येथून रात्री ९. १५ प्रवाशी घेवून निघाली. रात्री २ वाजे दरम्यान औरंगाबादहून पुण्याकडे सदर बस मार्गस्थ झाली असताना औरंगाबाद ते पुणे मार्गावर वाळूज जवळील चौकात भरधाव येत असलेल्या ट्रकने बुलडाणा-पुणे बस ला वाहकाच्या बाजूने जोरदार धडक दिली. या अपघातात १७ प्रवाशी जखमी झाले आहेत. सर्व प्रवाश्यांना औरंगाबाद च्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गाडीचे भरपूर नुकसान झाले आहे. बुलडाणा-पुणे बसचे चालक व वाहक मात्र या अपघातात बचावले आहेत. हा अपघात झाल्यानंतर लागलीच औरंगाबाद आगाराने तडक घटनास्थळी जावून सहकार्य केले.
पित्यानेच केली सोनालिका ची हत्या
क्रूर पित्यानेच आपल्या ‘सोनालिका’ चा गळा चिरून हत्या केल्याची घटना खामगाव तालुक्यातील नांद्री येथे घडली. काल घडलेल्या या घटनेत पोलिसांनी अवघ्या ६ तासांत आरोपीला जेरबंद केले आहे. खामगाव तालुक्यातील नांद्री येथील लक्ष्मण गायकवाड यांची मुलगी लता हिचा विवाह सारोळा येथील लहू धंदरेसोबत मे २०१५ ला झाला होता. परंतु लहू हा आपल्या पत्नीवर संशय घेत होता. तिचे सातत्याने माहेरी जाणे यामुळे तो लताचा शारीरिक मानसिक छळ करत होता. या त्रासामुळे लता ही मागील पाच ते सहा महिन्यांपासून नांद्री येथे आपल्या माहेरी आईवडिलाकडे राहू लागली. तिथेच लता ने एका मुलीस जन्म दिला. सर्वांनी ‘सोनालिका’ असे तिचे नाव ठेवले. मात्र कित्येक दिवस झाले पत्नी घरी येत नसल्याने संतप्त लहूने २६ एप्रिल रोजी माहेरी जावून २७ एप्रिलच्या पहाटे च्या सुमारास आईजवळ झोपलेल्या ‘सोनालिका’ चा घराजवळ काही अंतरावर नेवून गारगोटीने खून केला. ‘सोनालिका’ दिसत नसल्याने तिचा शोध घेतला असता सकाळी तिचा मृतदेह शेतात आढळला. या प्रकरणी पोलिसांनी आपली तपासचक्रे फिरवीत अवघ्या ६ तासांत आरोपीस पकडले.
हुश्श ! अखेर खामगाव – जालना रेल्वे प्रश्न सुटला
अनेक वर्ष रखडलेला आणि बुलढाणा जिल्ह्याच्या विकासास हातभार लावू शकणारा खामगाव – जालना रेल्वे मार्ग निकालात निघाला आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज रेल्वे बजेट सदर करताना खामगाव – जालना रेल्वे मार्गाची घोषणा केली . सुरेश प्रभू यांनी आपले दुसरे रेल्वे बजेट आज सदर केले. कुठल्याही नवीन योजनांचा किंवा इतर आशेचे किरण न दाखवता सद्य स्थितीत असेलेल्या रेल्वे च्या प्रश्नास सोडवण्यास त्यांचा अधिक कल होता.
खामगाव – जालना रेल्वे झाल्याने विदर्भ आणि मराठवाडा यांस जोडणारा हा एकमेव मार्ग होणार असून जिल्ह्यास विकास कामास मदत होणार आहे. अनेक प्रवाशांनी लावून धरलेली खामगाव – जालना रेल्वे मार्गाची मागणी अखेर पूर्ण झाली असून आनंद व्यक्त होत आहे. अखेर बीजेपीच्या काळात हा प्रश्न मार्गी निघाल्याने खा. प्रतापराव जाधव यांनी जिल्हावासीयांना ही अनोखी भेट दिली आहे. खामगाव – जालना रेल्वे मार्गास साधारण ३००० कोटी खर्च अपेक्षित आहे
महाराष्ट्राच्या वाटेस या वेळी खामगाव – जालना रेल्वे मार्गासह पुणे-नाशिक 265 किमी प्रकल्पाला मान्यता, वैभववाडी-कोल्हापूर 107 किमी, जळगाव-भुसावळ चौपदरीकरण 24 किमी, दौंड-मनमाड दुपदरीकरण, मनमाड-जळगाव तिसरी लाईन 160 किमी, वर्धा-नागपूर चौपदरीकरण 76 किमी इंदौर-मनमाड व्हाया मालेगाव 368 किमी, लातुर-नांदेड व्हाया लोहा, गडचिंदुर-आदिलाबाद 70 किमी आदि मार्गांवर रेल्वे चालू करण्यात आली आहे. मागच्या बजेट प्रमाणेच यंदाही लोकप्रिय घोषणा नाही, पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे. मागील बजेट मधील १३९ योजनांना सुरुवात झालेली आहे.
ऐतिहासिक : बाळापूर किल्ला
आपल्या बुलडाण्यापासून जवळच असेलला बाळापूर किल्ला आपण बघितलाच असेल. अकोला जाताना खामगाव सोडल्यावर किंवा अकोल्यावरून येताना एस टी बाळापूरला थांबते तेव्हा आपल्या दृष्टीस हा गड पडतो. मान आणि महिषी या नद्यांच्या संगमावर वसलेले बाळापूर हे जळगाव ते अकोला या राष्ट्रीय महामार्गावर आहे. मान आणि महिषी या नद्यांच्या संगमावर असलेल्या छोट्याशा उंचवट्यावर बाळापूर येथे हा प्रसिद्ध किल्ला बांधलेला आहे. बाळापूर किल्ल्याला दुहेरी बांधणीची भक्कम तटबंदी आहे. या तटबंदीला जागोजाग बलदंड बुरूज बांधून संरक्षणाची पुरेशी सिद्धता केली आहे.
बाळापूर किल्ल्याचा प्रवेशमार्ग उत्तरेकडून आहे. या प्रवेशमार्गावर तीन दरवाजे आहेत. पहिला दरवाजा चौरस अशा भक्कम बुरुजामध्ये आहे. या उत्तराभिमुख दरवाजातून आत गेल्यावर दुसरा दरवाजा असून तो पश्चिमेकडे तोंड करून आहे. हे लाकडी दरवाजे अजूनही पहायला मिळतात. दारावरच्या कमानीवर महिरप आहे. या दरवाजातून आत शिरल्यावर दोन्ही बाजूला तटबंदी असून समोर उत्तराभिमुख असा तिसरा दरवाजा आहे. यालाही महिरप केलेली आहे. या तिसऱ्या दरवाजातून आत गेल्यावर किल्ल्यामध्ये आपला प्रवेश होतो. आतल्या इमारती जुन्या असून त्यांची जुजबी दुरुस्ती करून त्यामध्ये सध्या काही सरकारी कार्यालये केलेली आहेत.
तटबंदीवर चढण्यासाठी जागोजाग पायऱ्या केलेल्या दिसतात. या पायऱ्यांवरून चढून प्रशस्त रुंदीच्या तटावर पोहोचता येते. तटावरून किल्ल्याला फेरी मारता येते. या तटबंदीवरून बाहेरील तटबंदीचेही दर्शन होते. बलदंड बुरुजांनी वेढलेली तटबंदी किल्ल्याच्या बेलागपणाची जाणीव करून देते.बाळापूर गावाच्या दक्षिणेकडे नदीकाठावर मोगली सरदार मिर्झाराजे जयसिंग यांनी बांधलेली छत्री आहे. बाळापूरच्या किल्ल्याच्या भ्रमंतीमध्ये ही छत्रीही आवर्जून पहावी अशीच आहे
आजूबाजूच्या सपाट प्रदेशामुळे तसेच लहानश्या उंचवट्यावर बांधलेल्या किल्ल्यामुळे दूरपर्यंतच्या प्रदेशावर लक्ष ठेवणे सोपे जाते. पावसाळ्यात किल्ल्याच्या तिन्ही बाजूंनी नद्यांच्या पाण्याचा विळखा पडतो. २००० साली नद्यांना आलेल्या महापुरात तटबंदीचा काही भाग ढासळला आहे.